आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - माझ्या पराभवाची हळहळ शेतकऱ्यांनी व्यक्त करणे हीच माझ्या चांगल्या कामाची पावती आहे. मी चळवळीतून आलो, त्यामुळे पराजय झाला म्हणून खचून जाणार नाही. बळीराजाची लढाई अर्ध्यावर सोडणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी मांडली. दरम्यान, शेट्टी यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंची मंगळवारी भेट घेतली.
संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या घटक पक्षाच्या बैठकीला शेट्टी हजर होते. त्यानंतर शेट्टी म्हणाले की, ‘आम्ही राज्यात प्रामाणिकपणे लढलो. पण, लोकशाहीत जय, पराजय चालत असतो. त्यामुळे खचून जाण्याचे कारण नाही. पुन्हा उभे राहू’. ‘राज्यात दुष्काळाने जनता होरपळून जात आहेृ शेतमालाला दर मिळत नाही. बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे संघर्ष तीव्र करायचा आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर काम करायचे आहे. त्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहोत. त्यासाठी दुष्काळाचा दौराही लवकरच काढला जाणार आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले. शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीचे उमेदवार होते. त्यात त्यांचा मोठा पराभव झाला आहे. शेट्टी हे मागच्या वेळी युतीच्या पाठिंब्याने येथून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. नरेंद्र मोदी यांची धोरणे शेतकरी विरोधी आहेत, असा आरोप करत दोन वर्षापासून त्यांनी मोदी सरकार व भाजपाच्या विरोधात मोर्चा उघडला होता.
उमेदवारांना सारखी मते कशी
मतमोजणीसंदर्भात संशय आहे. एकाच मतदारसंघात ७-७ उमेदवारांना सारखी मते कशी पडतात? हातकलंगणेत मतमोजणीवेळी जॅमर लावण्याची मागणी केली होती, परंतु आयोगाने लावला नाही.
मोजणीवेळी सिग्नलचे गूढ
मतमोजणीच्या आदल्या दिवशी शिराळा येथून १०० कि.मी. दूरचे वायफायचे सिग्नल दिसत होते. तसेच इस्लामपूर, शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथीलही सिग्नल दिसत होते, हे सर्व संशयास्पदरीत्या होते. याविषयी मी तक्रार केल्यानंतर ते बंद झाले, त्याची मी आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र, त्यासंदर्भातला कोणताही खुलासा आलेला नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.