आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'माझी निवड भारतीय संविधानाचा सन्मान' - फादर दिब्रिटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी केलेली निवड माझा वैयक्तिक सन्मान नसून हा भारतीय संविधानाचा गौरव आहे, अशी भावना लेखक, संपादक, पर्यावरणवादी व आंदोलक असलेले फादर फ्रान्सिस दिब्रिटो (वसई) यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली.

संमेलनाचे अध्यक्ष म्हणून तुमची काय प्रतिक्रिया?
उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मला अध्यक्ष केले. हा मी माझा वैयक्तिक सन्मान समजत नाही. हा सन्मान आहे हजारो वर्षांच्या सर्वसमावेशक परंपरेचा, सर्वधर्मसमभावाचा, संविधानाचा व विविधतेत असलेल्या एकतेचा, असे मला मन:पूर्वक वाटते.

बिनविरोध निवड झालीय...
अध्यक्षपदी निवडीइतकाच आनंद मला बिनविरोध निवड झाली, याचा आहे. किमान साहित्यातली तरी सगळी मंडळी एकत्र येतात, बसून चर्चा करतात, एकमताने काहीएक निर्णय घेतात, याचे मोल आजच्या घडीला भारतात फारफार असे आहे.

अध्यक्षांच्या भाषणात काय असेल? तुम्ही काय मांडाल?
संमेलन अध्यक्षाच्या भाषणाची मराठी समाजमनाला मोठी उत्सुकता असते. चांगली गोष्ट आहे. असा सोहळा होणारी माय मराठी देशात एकमेव भाषा आहे. मी भूमिका घेणारा माणूस आहे. देशाची एकात्मता, इथली सहिष्णुतेची परंपरा आणि सर्वसमावेशकता या बाबी माझ्या त्या अध्यक्षीय भाषणात नक्कीच असतील.

आजची पिढी वाचत नाही, असं तुम्हाला वाटतं का?
बिलकुल नाही. हा आरोप चुकीचा आहे. आज अनेक कादंबऱ्यांच्या आवृत्त्यांवर आवृत्त्या निघत आहेत. एक खरं आहे, नव्या पिढीच्या हाती नवी साधनं आहेत. त्यावर ते वाचतात. आज मोठा नववाचक असा आहे, जो वाचनाच्या सुविधेपासून वंचित आहे. खेड्यापाड्यातल्या त्या उपेक्षित वाचकापर्यंत साहित्य पोहोचले पाहिजे.

आजच्या या वातावरणात लेखकावर जबाबदारी आहे?
लेखक कोणी खास नसतो, तोसुद्धा समाजाचा घटक असतो. जेव्हा समाज धोक्यात असतो. तेव्हा लेखकाने संगमरवरी मनोऱ्यात बसणे चूक आहे. आणीबाणीच्या काळात लेखकाने एक तर लढले पाहिजे, नाही तर लढणाऱ्यांच्या बरोबर तरी राहिले पाहिजे. कारण, लढणारे समाज पुढे नेण्याचे काम करत असतात.

तुम्ही चळवळीत सक्रिय कसे?
मी राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला ठाम विरोध केलेला लेखक आहे. वसईत मी पर्यावरण रक्षणासाठी भूमिका घेऊन रस्त्यावर आलेला लेखक आहे. मी फादरही आहे. माझी जबाबदारी मोठी आहे. धर्मासाठी काम करणाऱ्या लोकांनी रस्त्यावर जरूर उतरले पाहिजे. कदाचित म्हणून माझा पिंड सामाजिक भान जपणारा असावा. कारण, ती माझ्या धर्माची शिकवण आहे.

वसईचे तुम्ही मराठवाड्यातल्या संमेलनाचा अध्यक्ष हाेताय?
वसईत महापूर येतो, तर उस्मानाबाद दुष्काळी आहे. ओल्या वसईचा मी कोरड्या उस्मानाबादशी जोडला जातोय. त्याचा मला आनंद आहे. उस्मानाबाद पाण्याने कोरडे असेल; भाषेने, इतिहासाने, वाचनाने समृद्ध आहे. मराठवाड्यातल्या भूमीत मी पोहोचतोय, याचा आनंद आहे.

फादर दिब्रिटोंचे साहित्य योगदान मोलाचे
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीने आनंद वाटला. त्यांचे मराठी साहित्यातील योगदान अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. पद्मश्री डॉ. यु. म. पठाण, माजी साहित्य संमेलनाध्यक्ष