आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझं हिंदुत्व विरोधकांपेक्षा मोठं अन् शुद्ध : ऊर्मिला मातोंडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘माझं लग्न, माझ्या पतीचा धर्म काढून वाद उपस्थित करणाऱ्यांना मला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. कारण, छोटं राजकारण करणाऱ्यांपेक्षा माझं हिंदुत्व मोठं आणि शुद्ध आहे. मी पोपटपंची करणारी नाही, तर कर्माच्या सिद्धांताला म्हणजे कृतीने विकासाच्या गोष्टी सिद्धीस जातात याला मानणारी आहे,’ असा भाजपवर वार करत रंगीला गर्ल अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकरने शुक्रवारी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात आपल्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला.  


बोरिवली येथील साईबाबा मंदिरात ऊर्मिलाने सकाळी दर्शन घेतले. त्यानंतर बोरिवली आजच उघडलेल्या आपल्या प्रचार कार्यालयाचे तिने उद्घाटन केले. या वेळी तिच्यासोबत मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा, संजय निरुपम, स्थानिक आमदार अस्लम शेख, आमदार नसीम खान आदी काँग्रेसचे नेते होते.

 
ऊर्मिला म्हणाली , मी मुंबईकर आहे. मात्र, मला ते सांगण्यासाठी कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. या निवडणुकीत मी मराठी कार्ड अजिबात वापरणार नाही. सध्या प्रचंड उष्णता आहे. यामुळे  वितळून जाईन असे विरोधकांना वाटले. पण, पुढचा एक महिना मी येथेच असणार आहे, असेही ती म्हणाली. 


‘तुम्हा सर्वांचे मला आशीर्वाद हवे आहेत. हल्ली भाषणबाजी फार होत आहे. त्याने काही होणार नाही, असे सांगून ‘मुंबई काँग्रेसची होती आणि यापुढेही राहील’ असा विश्वास तिने व्यक्त केला.  ‘तुमच्या हाताची मूठ केली तर आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आपल्यातले मतभेद दूर ठेवले तर आमच्यासमोर कोणीही उभे राहू शकणार नाही.  दरम्यान, ऊर्मिलाविरोधात असलेले भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी विजय आपलाच असल्याची प्रतिक्रिया दिव्य मराठीला दिली.