आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे जीवन आणि लेखन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात मी जन्मलो. मराठवाड्यातील शेतकरी- शेतमजुरांची विदारक अवस्था आमच्याही पाचवीलाच पुजलेली. घरात अठराविश्वे दारिद्र्य. कोरडवाहू शेती बेभरवशाची. कधी ओला तर ब-याचदा कोरडा दुष्काळ. सभोवतालचे बारोमास भयाण वास्तव जसजसं कळू लागलं, हे लिहावंसं वाटलं. मात्र, शब्दात बांधता येत नव्हतं. शालेय जीवनात काही रचना केल्या. काही गोष्टी लिहिल्या, पण मनाजोगत्या जमल्या नाहीत. नाही तरी छापणार कोण? बरंचसं लिहून फाडून टाकलं.अनुभूतीच्या कक्षा ख-या अर्थानं रुंदावत गेल्या ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना. औरंगाबाद येथे नागसेनवन परिसरात मिलिंद कॅम्पसमध्ये शिकत होतो. हा परिसर म्हणजे शैक्षणिक व सामाजिक चळवळीचे केंद्र.

इथं अनेक पुस्तकं वाचून काढली. अनेक चळवळी जवळून पाहिल्या, अनुभवल्या. माझ्या लेखणीस नवा बहर आणि बळ मिळाले ते याच कॅम्पसमध्ये. निखळ वाङ्मयीन चळवळीस वाहिलेल्या नियतकालिकात, वर्तमानपत्रात लिहू लागलो. आकाशवाणीवर भाषणं प्रसारित होऊ लागली. पदव्युत्तर शिक्षणानंतर औरंगाबाद सोडलं. ‘स्वप्नपहाट’ हा पहिलावहिला कवितासंग्रह लिहिला. त्यास महाराष्ट राज्य शासनाच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला. आणखीही पुरस्कार मिळाले. पुढे झपाटल्यासारख्या पंधरा-सोळा पुस्तिका लिहिल्या. कथा, कविता, ललित, संपादन आदी क्षेत्रात वावरलो. तडजोड न करता लिहू लागलो. अनेक दिग्गज मंडळींची पाठीवर कौतुकाची थाप पडली. अभ्यासाच्या निमित्ताने परदेश प्रवास घडला. शिकल्या-सवरल्यातही जातीयतेची भावना खोलवर रुजलेली असते, हेही अनुभवांती कळू लागलं. त्यावरही लिहायचंय भविष्यात. बघूया त्यास कधी मूर्त स्वरूप येईल ते!