आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरद पवारांमुळेच माझा राजकीय पुनर्जन्म : भुजबळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : महात्मा फुले यांच्याबरोबर सर्व जाती-धर्माचे लोक काम करत होते, कारण सत्य हीच त्यांची जात होती आणि सत्य हाच त्यांचा धर्म होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आई-वडील देखील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. त्यामुळेच शरद पवार यांनी देखील जाती-धर्माचा भेद बाजूला सारून समाजकारण आणि राजकारण केले. त्यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला, असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांना समता पुरस्कार छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माजी आमदार पंकज भुजबळ, बापू भुजबळ, कमल व्यवहारे, साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, प्रा. हरी नरके, मनीषा लडकत, आरती कोंढरे आदी या वेळी उपस्थित होते.

छगन भुजबळ म्हणाले, महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि जातीविरहित समाजाचा विचार दिला. हे विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी साहित्य आणि कृतीमधून पुढे नेले. प्रबोधनकार ठाकरे यांनी जातीभेद न मानता मानवतेचे रक्षण करण्यासाठी काम केले. त्यांनी खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचे विचार पुढे नेण्यासाठी विविध माध्यमांतून काम केले. आमचे नवे सरकार शेतकरी, बेरोजगार, महिला, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातील सर्व तत्त्वे हीच आमच्या समान कार्यक्रमातील प्राधान्यक्रम असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

'शेतकऱ्याचा अासूड' परकीय भाषेत अनुवादित व्हावा
 
फादर फ्रान्सिस दिब्रेटो म्हणाले, महात्मा फुलेंनी यांनी १८८३ मध्ये शेतकऱ्यांचा आसूड ओढला. शेतकरी आजही त्याच अवस्थेत आहेत. महाराष्ट्र आत्महत्यामुक्त झाला पाहिजे. महात्मा फुले यांचे 'शेतकऱ्याचा आसूड' हे जागतिक दर्जाचे अभिजात साहित्य असून त्याचा इंग्रजीसह विविध परकीय भाषांमध्ये देखील अनुवाद झाला पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री यांच्या मासिक भत्त्यातील अर्धा भाग शेतकऱ्यांना मिळाला असता तर ही स्थिती आली नसती. प्रजा भिकारी, राजा शिकारी' अशी आजची अवस्था आहे,' शोषित, दुर्बल व शेतकरी हे घटक नवीन सरकारच्या प्राधान्यावर असावेत. तहानलेल्यांना पाणी द्या. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राला भूषणास्पद नाहीत. शेतकरी नवीन मंत्रिमंडळाचा लाभार्थी व्हावा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
 

बातम्या आणखी आहेत...