आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नत 'नागा क्लबची' ऐतिहासिक शताब्दी!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक समुदाय आपले अस्तित्व जपण्यासाठी धडपड असतो. पण, हे सारे उन्नत मूल्यांसाठी असते, तेव्हा त्या धडपडीला अर्थ प्राप्त होतो. त्या समुदायाचे एका विशिष्ट रूपात असणे इतिहासाला नवे वळण देणारे ठरते. ज्याकडे आपण फारसे लक्ष पुरवत नाही, अशा ईशान्येकडच्या नागालँडमध्ये अशीच एक घटना साजरी झाली.  त्याची ही दखल...


नागांचे हिंदू अथवा मुसलमानांशी कसलेही संबंध नाहीत. नागा गोमांस आणि डुकरांचे मांस सेवन करतात, त्यामुळे दोन्ही धर्मांचे लोक आम्हाला हीन नजरेने बघतात, दोघेही आम्हाला ‘शिकवण्याचा’ प्रयत्न करतात, यात आमचा कसला दोष आहे, असा सवाल ते विचारतात...


कोणत्याही मोठ्या गोष्टीचा आरंभ हा ठरवून होतोच, असे नाही. ‘नागा क्लब’ची ‘सुरुवात’ पण (स्थापना नव्हे!) सहजपणे झाली होती. नागा क्लबची सुरुवात १९१८ मध्ये झाली; यावर नागा लोकांचे एकमत असले, तरी नागा क्लबच्या आरंभामागे दोन टोकाची मते मांडली जातात. यावरून नागा क्लबची शताब्दी साजरी केली जाईल की नाही इथपर्यंत मतभिन्नता होती आणि आहे. अखेर २९ नोव्हेंबर २०१८ ला शताब्दी सोहळा साजरा झाला.

 

नागा क्लबच्या ‘स्थापनेमागची’ एक कहाणी सांगितली जाते, ती अशी आहे की : पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात ( २९ जुलै १९१४ ते ११ नोव्हेंबर १९१८) युद्धभूमीवर काम करण्यासाठी ब्रिटिशांच्या अमलाखालील नागा हिल्समधून दोन हजार नागांना ‘पोर्टर’ म्हणून फ्रान्समध्ये नेले. युरोपमधील लोकशाही, स्वातंत्र्य पाहिलेल्या काही नागांनी नागालँडमध्ये परतल्यावर ‘सामाजिक आणि राजकीय क्रियाकलापांसाठी’ नागा क्लबची स्थापना केली. दुसऱ्या कहाणीनुसार: इ.स.१८२४-२६मध्ये ब्रिटिश आणि बर्मीज यांच्यातील पहिल्या युद्धाच्या काळात ब्रिटिशांची नागांच्या प्रदेशाशी ओळख झाली. १८३२मध्ये पहिले काही ब्रिटिश अधिकारी इकडे पोहोचले. दरम्यानच्या काळात युद्ध, चकमकी होऊन ब्रिटिशांनी  १८८१ मध्ये ‘नगा हिल्स जिल्ह्याची’ निर्मिती केली. कोहिमामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी युरोपियन क्लब स्थापन केला होता. तिथे ब्रिटिश अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय दररोज संध्याकाळी एकत्र येत असत, आणि आपला वेळ खाण्या-पिण्यात, नृत्यादी कार्यक्रमात वेळ  व्यतीत करत असत. त्यांच्या या क्लबमध्ये नागा आणि भारतीयांना प्रवेश नव्हता. त्यांचे पाहून एतद्देशीय सरकारी कर्मचाऱ्यांनी असा क्लब स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यातून नागा क्लबची सुरुवात झाली. 

 

नागा क्लबची ‘छोटा बस्तीत’ असलेली  पहिली इमारत जपान्यांनी केलेल्या हल्ल्यात दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झाली. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४६ मध्ये सध्याची इमारत फिलिप अॅडम्स या ब्रिटिश जिल्हाधिकाऱ्याच्या  विनंतीवरून विनामूल्य बांधून दिली. ते गुत्तेदार होते पंजाबी. त्यांचं नाव होतं ‘जोधू सिंग’!  हा नागा क्लब स्थापन करण्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यात दुसऱ्या महायुद्धाहून परतलेल्या पोर्टर नागांचा सहभाग नव्हता. युरोपमधून जे पोर्टर परतले होते; ते बहुतेक खेड्यांतून आलेले होते आणि ते आपापल्या गावी परतले होते. त्यामुळे नागा क्लबच्या वतीने जे सामाजिक, राजकीय उपक्रम राबवले गेले, त्यात युरोपमधून परतलेल्या नागांचा सहभाग असल्याचे पुरावे आढळत नाहीत.

 

नागा क्लबच्या स्थापनेसंबंधी मतभिन्नता असली तरी क्लबच्या निमित्ताने अपवादानेच सख्य असलेल्या नागांच्या विविध जमातींतील लोक एकत्र येण्यास सुरुवात झाली. त्यातून नागांच्या नव्या इतिहासाला सुरुवात झाली. नागा क्लबची सुरुवात झाली, तेव्हा तिथे येणारे सदस्य पेपर वाचीत,गप्पा होत  आणि एकमेकांची विचारपूस करत. नागांमध्ये शिक्षणाचे प्रमाण खूपच कमी होते. तशात नागा जमातींमध्ये अपवादानेच सख्य होते. त्यांच्या भाषा, चालीरीती, परंपरा, सण, उत्सव वेगवेगळे होते. नागांची गावं म्हणजे, लोकशाही पद्धतीचे सार्वभौम देश होते. आणि एका गावात एकाच जमातीचे लोक राहंत असल्याने त्यांच्यात एकजीवता होती. आसामच्या अहोम साम्राज्याशी आणि दक्षिणेकडच्या मणिपुरी राजांशी नागांचे संघर्ष होत. पण नागांवर दोन्ही साम्राज्यांना कधीच विजय मिळवता आला नाही. ब्रिटिशांनी मात्र  १८८० मध्ये नागांच्या काही भागावर अंमल स्थापित केला. ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय सोयींसाठी गावांमध्ये ‘गांवबुरा किंवा कामबुरा’ नेमले (महाराष्ट्रातील पोलिस पाटलांप्रमाणे, पण यांना स्थानिक न्यायनिवाडा करण्याचेही अधिकार होते).तसेच स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी ‘दुभाषी’ नेमले. तोवर अमेरिकन ख्रिश्चन मिशनऱ्यांनी आसामच्या बाजूने आरोग्य, शिक्षण आणि ‘प्रबोधनाचे’ काम सुरू केले होते. आणि मिशनरींच्या ‘प्रबोधनाला’यश येऊन १८७२ मध्ये नऊ आओ नागांनी धर्मदीक्षा घेतली. ब्रिटिश आणि मिशनरींमुळे परदेशी आणि मैदानी प्रदेशातील भारतीयांशी नागांचा संपर्क होऊ लागला. हा पूर्वेतिहास समजून घेतल्याशिवाय नागा क्लबमुळे पुढच्या घटना कसकशा घडत गेल्या हे उमगणे सोपे होते. पाहिलं म्हणजे नागा स्वतःला नागा म्हणवून घेत नव्हते. तर ते एकमेकांना, आपापसांना जमातीच्या नावांनी ओळखत असत. नागांना आसामी लोक असमियामध्ये ‘नोगा’ म्हणून संबोधित असत. ब्रिटिशांनी जगभरात शब्दांचे अपभ्रंश करण्याचा जो घोळ घातला तो, इथेपण! त्यांनी ‘नोगा’चे ‘नागा’ केले. ब्रिटिशांचा अंमल भारतभर होता. तरी ईशान्य भारतातील काही जमातींचे वांशिक, सांस्कृतिक वेगळेपण अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आलेले असावे; म्हणून त्यांनी नागांच्या विभागाला वेगळा दर्जा दिला. परिणामी, ३ फेब्रुवारी १९२८ ला भारतात आलेले ‘सायमन कमिशन’ जानेवारी १९२९ मध्ये कोहिमाला आले होते. नागा हिल्सच्या मागण्यांचे निवेदन ‘नागा क्लबने’ १० जानेवारी १९२९ रोजी  सायमन कमिशनला सादर केले. सायमन कमिशनकडे तत्कालीन भारतभरातून जितकी निवेदने दिली गेली असतील; त्यातील सर्वात कमी मागण्या असणारे आणि सामाजिक, राजकीय वा शासकीय पदांवर सर्वात खालच्या पायरीवर असलेल्या लोकांचे हे निवेदन असावे! त्यातील मागण्या थोड्या असल्या तरी, त्या भविष्यात नागांच्या राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या ठरल्याचे सिद्ध झाले. निवेदनातील ठळक बाबी म्हणजे, ब्रिटिशांमुळे वैविध्य असलेल्या  नागांतर्गत सलोखा निर्माण झाला. मैदानी प्रदेशातील भारतीयांपेक्षा नागांच्या भाषा वेगळ्या आहेत.

 

नागांच्या परंपरागत  चालीरीती आहेत, परंपरागत कायदे आहेत, सामाजिक निर्बंध आहेत. नागाआपल्या सामाजिक चालीरीतींमध्ये आनंदी आहेत.नागांचे हिंदू अथवा मुसलमानांशी कसलेही संबंध नाहीत. नागा गोमांस आणि डुकरांचे मांस सेवन करतात, त्यामुळे दोन्ही धर्माचे लोक आम्हाला हीन नजरेने बघतात, दोघेही आम्हाला ‘शिकवण्याचा’ प्रयत्न करतात, यात आमचा कसला दोष आहे, असा सवाल ते विचारतात.


निवेदनात नागा हिल्सचा उल्लेख ते ‘OUR COUNTRY’ असा करतात. या निवेदनावर वीस जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. त्यात मुख्य-दुभाषी, नऊ दुभाषे, एक पेशकार, तीन मास्तर, एक डॉक्टर, एक पोतदार, एक कारकून, एक ट्रेझरर, एक सब-ओव्हरसीयर आणि एका चपराशाचा समावेश होता. त्यात बाराजण ‘अंगामी’ असणे नैसर्गिक होते. त्याचे कारण दिमापूरहून कोहिमाकडे याल तेव्हा कळते. त्यात सेमा, लोथा, रेंगमा, काचा आणि कुकी यांचाही समावेश होता. सायमन कमिशनला दिलेल्या या साध्या वाटणाऱ्या छोट्या निवेदनाने भारतीय राजकारणावर कोणते परिणाम झाले; याची नोंद इतिहासाने घेतलेली आहेच. १९८२ मध्ये पुनर्जिवित केलेला  नागा क्लब आजही कुण्या एका विशेष नागा जमातीचा अथवा धर्मियांचा नाही ! हे त्याचे मूळ उद्दिष्ट कायम ठेवलेले आहे.

 

(हा लेख लिहिण्यासाठी अनेक नागा मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून त्यांना भंडावून सोडले. त्या सर्वांचे आभार.)

बातम्या आणखी आहेत...