आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या निरोपासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - गेल्या दहा दिवसांपासून घराघरांत विराजमान झालेल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नगरकर सज्ज झाले आहेत. शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात रविवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उत्थापनाची पूजा होईल. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास विशाल गणपतीची मिरवणूक निघेल. बाप्पाला निरोप देण्यासाठी नगरकर हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरणार आहेत. त्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात राहणार आहे. संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोन व छुप्या कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. 

 

गणेशोत्सवात दरवर्षी डीजेला फाटा देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, तरुणाईच्या हट्टापायी काही मंडळे डीजे लावतातच. यंदा मात्र दिसता क्षणीच डीजे जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार अाहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या निगराणीखाली स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक रामचंद्र खुंट, आडते बाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापडबाजार, अर्बन बँक चौक, नवीपेठ, खामकर चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेटमार्गे येऊन अमरधामजवळील बाळाजी बुवा बारवेत श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होईल. यंदा १५ मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक मंडळासाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. 

 

ग्रामदैवत विशाल गणपतीचे सायंकाळी ७ वाजता विसर्जन होणार अाहे. प्रत्येक मंडळासाठी वेळेचे बंधन ठेवण्यात आलेे आहे. रात्री बाराच्या सुमारास शेवटच्या मंडळाचे गणेश विसर्जन होणार आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी नियोजन केले आहे. मिरवणूक मार्गावरील प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष असेल. त्यासाठी १६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल आहेत. चार ड्रोन व काही छुपे कॅमेरे आहेत. मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी शनिवारी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेऊन मंडळांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मोहरम विसर्जन मिरवणुकीप्रमाणेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडेल, असा पोलिसांचा विश्वास आहे.
 
वॉच टॉवर उभारले 
यंदा मिरवणुकीवर आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी साध्या वेशातील पथके नेमलेली आहेत. कॅमेरे आणि दुर्बिणीतूनही नजर असणार आहे. त्यासाठी जागोजागी वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. शहराच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात येणार असून वाहनांची कडक तपासणी करूनच त्यांना शहरात प्रवेश दिला जाईल. संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

 

मंडळांचा डीजेचा आग्रह 
डीजेवर रात्री १२ च्या आत कारवाई केल्यास रस्त्यावरच गणेश विसर्जन करण्याचा इशारा माळीवाडा परिसरातील मंडळांनी दिला आहे. िवसर्जन िमरवणुकीत सहभागी होण्यासाठी परवानगी घेतलेल्या, तसेच अन्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांंची पाेलिसांनी शनिवारी सायंकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात बैठक घेतली. यावेळी माजी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
शांततेच्या मार्गाने विसर्जन िमरवणूक काढण्याचे आवाहन यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप िमटके यांनी पदाधिकाऱ्यांना केले. मात्र, आम्ही डीजे लावणारच, रात्री १२ च्या आत डीजेवर कारवाई करू नका, अशी मागणी या पदािधकऱ्यांनी केली. 

 

सावेडीत स्वतंत्र मिरवणूक 
सावेडीत लक्ष्मीआई मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात होईल. दुपारी बारा वाजता मिरवणूक सुरू होईल. ढोल-ताशे हे या मिरवणुकीचे आकर्षण असेल. गल्लीबोळातील, सोसायट्यांमधील बाप्पांच्या मिरवणुकाही निघतील. काही सोसायट्यांमधील बाप्पांचे विसर्जन मुळा धरणावर होते. त्यामुळे दिवसभर धांदल असेल. शाळा-महाविद्यांलयांतील बाप्पांचेही दुपारपर्यंत विसर्जन होईल. 

पंधरा गणेश मंडळांना िमरवणुकीसाठी परवानगी 
विशाल गणपती (माळीवाडा), संगम तरुण मंडळ (जुनी वसंत टॉकिज, माळीवाडा), माळीवाडा तरुण मंडळ (माळीवाडा वेस), आदिनाथ मंडळ (फुलसौंदर चौक, माळीवाडा), दोस्ती तरुण मंडळ (शेरकर गल्ली, माळीवाडा), नवजवान तरुण मंडळ (फुलसौंदर चौक माळीवाडा), महालक्ष्मी तरुण मंडळ (माळीवाडा), कपिलेश्वर तरुण मंडळ (माळीवाडा), नवरत्न तरुण मंडळ (माळीवाडा), समझोता तरुण मंडळ (माळीवाडा), निलकमल तरुण मंडळ (ब्राह्मण गल्ली), शिवशंकर तरुण मंडळ (पंचपीर चावडी), नेता सुभाष मंडळ (चितळे रोड), अनंत तरुण मंडळ (आझाद चौक), दोस्ती तरुण मंडळ (बारातोटी कारंजा). 

कडेकोट बंदोबस्त 
तीन आयपीएस अधिकारी, ४ पोलिस उपअधीक्षक, ५१ पोलिस निरीक्षक व सहायक निरीक्षक, दीड हजार पोलिस, ३ महिला अधिकारी, २२० होमगार्ड, आरसी प्लाटून, ४ स्ट्रायकिंग फोर्स, एक हजार स्वयंसेवक, चौकाचौकांत ८ दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...