आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्त पठारे व माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यात खडाजंगी; काळे फासण्याचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ठेकेदारांच्या थकीत बिलांवरून मंगळवारी महापालिकेत उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे व बहुजन समाज पक्षाच्या नगरसेविका अश्विनी जाधव यांचे पती माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्यात खडाजंगी झाली. दोघांनी एकमेकांना खडे बोल सुनावले. जाधव यांनी काळे फासण्याचा इशारा पठारे यांना दिला आहे. 


निवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध फरकांपोटी उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता. सचिन जाधव यांनी उपायुक्तांच्या दालनात जाऊन थकीत बिलांबाबत चर्चा केली. दरम्यान, बाहेर बसलेले पेन्शनर घोषणाबाजी करत आत आले. तोपर्यंत जाधव व पठारे यांनी एकमेकांना अर्वाच्च भाषा वापरण्यास सुरुवात केली होती. दोघेही मोठ्या आवाजात एकमेकांना नीट बोलण्याचा सल्ला देत होते. पठारे यांनी तुम्ही नीट बोला असे सुनावले. त्यावर जाधव यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी तुम्ही नीट बोला. काम करायला आलात, इथं कामच करा असा सल्ला िदला. पठारेंनी हे तुम्ही सांगू नका असे पुन्हा सुनावले. जाधव म्हणाले, कोणी सांगायचे तुम्हाला? ही अशी भाषा वापरू नका. तुमची खुर्ची आमची कामे करण्यासाठीच आहे, असे सांगत साचलेल्या फायलींकडे बोट दाखवत हे मोकळे करा असे त्यांनी सांगितले.त्याचवेळी पेन्शनरांनी घोषणाबाजीही सुरू केल्याने गोंधळ उडाला. पठारे म्हणाले, तुम्हाला काही पण बोलायची परवानगी आहे का? त्यावर जाधव यांनी अशी परवानगी तुम्हाला दिली का? नीट बोला. सगळ्यांच्याच तुमच्या विरोधात तक्रारी आहेत. जे आजपर्यंत इतिहासात झाले नाही, त्या पद्धतीने तुम्ही अडवून करणार असाल, तर आम्हालाही अडवणूक करता येते, असे सांगितले. 


गोंधळानंतर जाधव म्हणाले, झेंडीगेट येथील एका पेन्शनरचे प्रकरण होते. ते पंधरा दिवसांपासून फेऱ्या मारत होते. म्हणून मी उपायुक्तांकडे गेलो. त्यावेळी लेखा व वित्त अधिकारी प्रवीण मानकर उपस्थित होते. प्रलंबित बिलाप्रकरणी चर्चा झाली. आयुक्तांनी अधिकारानुसार बिले काढायला सांगितले आहे. त्यानुसार आम्ही पठारेंना त्यांच्या अधिकारातील बिले काढण्यास सांगत होतो. पण पठारेंनी मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो, असे म्हणत अरेरावीची भाषा केली. 


नियमबाह्य काम मी करणार नाही 
विकासभार व चटई क्षेत्रासह आदी कामांचे धनादेश काढताना त्याची टिप्पणी करून आयुक्तांकडून मान्यता घ्यावी लागते. विकासभाराचा धनादेश काढण्यासाठी टिप्पणी आम्ही आयुक्तांकडे ठेवली असून अद्याप त्यास मान्यता आलेली नाही. तथापि, जाधव यांनी वाद घालायला सुरुवात केली. नियमबाह्य काम मी करणार नाही. नियमबाह्य काम अपेक्षित असणारेच आरोप करतात.'' प्रदीप पठारे, उपायुक्त.

बातम्या आणखी आहेत...