आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळेधारकांना रेडीरेकनरचा ताप, जुन्या दरांच्या तुलनेत वाढलेत चौपट भाडे 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील गाळेधारकांच्या प्रश्नांवर जुलैमध्ये विशेष सभा बोलावली होती, तथापि गाळेधारकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. रेडीरेकनरनुसार सर्वेक्षण करून प्रतिचौरस मीटर दर निश्चित करण्यात आले आहे. प्रचलित जुन्या दराच्या तुलनेत रेडीरेकनरनुसार चौपट भाडेवाढीचा बोजा गाळेधारकांवर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. यावर तोडगा काढण्याचे आव्हान महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसमोर तसेच प्रशासनासमोर आहे. 


महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार कलम ७९ 'ड' मधील तरतुदीनुसार मोबदला घेऊन महापालिकेच्या मालकीची स्थावर मालमत्ता किंवा कोणताही हक्क विकता येईल किंवा भाडेपट्ट्याने देता येतो. भाडे किंवा अन्य मोबदला बाजार किमतीपेक्षा कमी असू नये, असेही त्यात स्पष्ट केले आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०१५ च्या महासभेत रेडीरेकरनप्रमाणे डिपॉझिट व भाडे निश्चित करण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर १६ मार्च २०१६ मध्ये किरकोळ दुरुस्ती झाली होती. दराबाबत प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ५ जुलै २०१८ रोजी नगर रचना विभागाचा अभिप्राय घेण्यात आला होता. त्यावेळी भाडे कमी करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर तत्कालीन उपायुक्तांनी (कर) वसुलीसाठी कारवाईची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला. तथापि, ही भाडेवाढ अन्यायकारक असून नगरसारख्या शहरात परवडणारी नाही, तसेच रस्त्या लगतचे गाळे व रस्त्याच्या आतील बाजुचे गाळे यांचे दरही ठरवणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन महापौर सुरेखा कदम यांच्या कार्यकाळात मनपात जुलै २०१८ मध्ये विशेष महासभा बोलावण्यात आली. 


मनपाचे शहरातील विविध ३३ व्यापारी संकुल असून सुमारे ८८४ गाळेधारक आहेत. त्यावेळी सभेत या प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांची कार्यवाही थांबवून दोन महिन्यांत फेरसर्वेक्षण करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तथापि, गाळेप्रश्नी सर्वेक्षणानंतर भाडेआकारणी दर कसा असेल, याबाबत गाळेधारकांत धाकधूक होती. प्रचलित जुन्या दरानुसार मनपाच्या सुमारे २०० चाैरस फुटांच्या गाळ्याला दोन ते अडीच हजार रुपये भाडेआकारणी केली होती. त्याच पद्धतीने गाळेधारकांनी ही रक्कम भरलेली आहे. पण आता सर्वेक्षणानंतर समोर आलेल्या रेडीरेकनरच्या दरानुसार एका गाळ्याच्या भाड्यात सुमारे चार ते पाचपट वाढ होत आहे. ही वाढ गाळेधारकांना मान्य नाही, मुंबई-पुण्याच्या धर्तीवर भाव वाढ न करता योग्य दरवाढ केली, तर त्याप्रमाणात भाडे भरण्यास गाळेधारक तयार आहेत. या प्रश्नी सोमवारी गाळेधारकांनी महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी नियमांच्या चौकटीत राहून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, मार्चअखेरपूर्वी वसुलीसाठी मार्केट विभागाकडून नोटिसा बजावल्या जाणार असल्याने गाळेधारक अस्वस्थ झाले आहेत. 


नियमानुसार तोडगा 
नगर शहरातील गाळेधारकांचा प्रश्न भिजत ठेवायचा नाही, त्यावर मार्ग काढायचा आहे. केवळ आश्वासन न देता हा प्रश्न कायमचा निकाली काढायचा आहे. गाळ्याच्या भाड्याचा प्रश्न नियमांच्या चौकटीत बसवून सोडवावा लागणार आहे. त्यानुसार तोडगा काढू.'' बाबासाहेब वाकळे, महापौर. 


शहरातील गाळेधारकांसाठी असे आहेत नवीन दर 
दोन ते अडीच हजार रुपये भाडे भरणाऱ्या गाळेधारकांना आता प्रतिचौरस फूट दराने भाडे आकारणी होणार आहे. त्यानुसार नवीन दराप्रमाणे प्रियदर्शनी शॉपिंग सेंटर ३५० रुपये प्रतिचौरस फूट, िचत्रा टॉकिज परिसरात मनपा शाळेजवळील गाळ्यांना २६०, छाया टॉकिज शॉपिंग सेंटर ६३०, अमरधाम कंपाउंडजवळ ३०४, गाडगीळ पटांगण २१९, छत्रपती संभाजी महाराज संकुल २४१, सिद्धार्थनगर ३०१, तर जनरल पोस्टाजवळील गाळ्यांना प्रतिचौरस फूट ३६० रुपये दर आकारणी होणार आहे. 


पुणे धर्तीवर वाढ नको 
महापालिकेने योग्य भाडेवाढ करून करारनामे करून द्यावेत आम्ही भाडे भरण्यास तयार आहोत. जुन्या दराप्रमाणे जास्तीचे भाडे आम्ही जमा केले आहे. गाळ्यांसाठी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर आकारणी करू नये. 'ड' वर्ग मनपाप्रमाणे आकारणी करावी.'' लक्ष्मीकांत हेडा, गाळेधारक. 


दुर्लक्षाने मनपाचे नुकसान 
महापालिकेच्या सर्जेपुरा येथील गाळ्यांवर तीनशे ते चारशे चौरस फुटाचे हॉल किंवा गाळे आहेत. परंतु भाडे आकारणीच्या घोळात हे गाळे आजतागायत रिकामे राहिले. त्यामुळे मनपाचे आतापर्यंत लाखोंचे नुकसान झाले. या रिकाम्या गाळ्यांची अवस्था आता बिकट झाली असून दुरुस्तीची आवश्यकता आहे. 

बातम्या आणखी आहेत...