आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘द लाइव्हज ऑफ अदर्स’ : समृद्ध करणारा अनुभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरामध्ये राज्याची दमनशाही व त्यातून कलाकार किंवा नागरिकांचा होणारा संघर्ष हे प्रकरण फिल्मसाठी काही नवे नाही आहे. आजपर्यंत या विषयावर खूप चित्रपट येऊन गेले आहेत. त्यातील काही क्लासिकपैकी फ्लोरिएन हेनकेल वॉन डॉनर्समार्क या दिग्दर्शकाचा “द लाइव्हज ऑफ अदर्स” हा एक आहे.
 
जगभरामध्ये राज्याची दमनशाही व त्यातून कलाकार किंवा नागरिकांचा होणारा संघर्ष हे प्रकरण फिल्मसाठी काही नवे नाही आहे. आजपर्यंत या विषयावर खूप चित्रपट येऊन गेले आहेत. त्यातील काही क्लासिकपैकी फ्लोरिएन हेनकेल वॉन डॉनर्समार्क या दिग्दर्शकाचा “द लाइव्हज ऑफ अदर्स” हा एक आहे. तो रसिकांना समृद्ध करून जातो.
१९८४, मध्ये रशियाचा प्रभाव असलेल्या पूर्व जर्मनीतील ही  कथा आहे. देशातील जनतेवर लक्ष ठेवण्यासाठी ‘स्टासी’ हा गुप्त पोलिस विभाग स्थापण्यात आला आहे. एक लाख कर्मचारी आणि दोन लाख माहिती जमवणारे खबरे, असा भला मोठा विस्तार. कोणती व्यक्ती सकाळी  किती वाजता उठते, कोणाला भेटते, रात्री घरी किती वाजता परतते याची सगळी माहिती सरकारकडे आहे. बहुतांश सर्वच कलाकार ‘स्टासी’ च्या निगराणीखाली आहेत. लेखक, नाटककार, विचारवंत यांना बोलण्यासाठी दूरच्या उद्यानाचा   आश्रय घ्यावा लागत आहे. घरात बोलायचे झाले तर बोलण्यापेक्षा लिहून संदेश देणे त्यांना सुरक्षित वाटते आहे.  बंदी घातलेल्या कलाकारांची यादीच सरकारने प्रसिद्ध  केली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची कथा घडते. ( दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीची फाळणी होऊन पश्चिम जर्मनी हा नाटो तर पूर्व जर्मनी हा रशियाच्या प्रभावाखाली होता, ही बाब लक्षात घ्यायला हवी.)

जॉर्ज द्रायमन हा पूर्व जर्मनीतील  विख्यात नाटककार आहे. त्याची पश्चिम जर्मनीत आणि इतर ठिकाणीही  मोठ्या प्रमाणावर नाटके वाचली जातात. त्याची नाटके राजकीय भूमिकाविरहित आहेत. त्यामुळे सरकारलाही काही प्रश्न नाही.  तो  ख्रिस्ता मारिया त्सिलांद या त्याच्याच नाटकामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीबरोबर राहत आहे.  तो तिच्या खूप प्रेमातही आहे. ती नावाजलेली अभिनेत्री आहे.  ख्रिस्ता मारियाचे सांस्कृतिक मंत्री हेम्पबरोबर संबंध आहेत. खरे तर हे तिलाही मान्य नाहीय, ती याला विरोधही करून पाहते. मात्र करिअर संपेल ह्या भीतीने ती काहीच करू शकत नाही. मंत्र्यांच्या बेहेरबानीत असल्याने  बदल्यात ती बंदी असलेली औषधेही ती घेते. 

स्टासीचा ‘गर्ड विजलर’ हा अधिकारी जॉर्जवर लक्ष ठेवून आहे. मंत्री हेम्प यांना जॉर्जविषयी काहीसा  आकस आहेच. स्टासीच्या कर्मचाऱ्यांनी जॉर्जच्या घरातही सगळीकडे वायर, टेप बसवले आहेत. त्यामुळे जॉर्जच्या पुस्तकाच्या पानाचा आवाजही ते ऐकू शकत होते. काही दिवस नजर ठेवल्यावर विजलरला जॉर्ज हा काही एवढा वाईट नाही हे त्याच्या लक्षात येतेच. मात्र काही काळातच ही तपासणी ही फसवी वाटू लागते.  त्याच्या मनातला विवेक जागा होऊ लागतो. आयुष्यभर ज्या कामात तो होता, समोर अचूक आणि काळजीपूर्वक गणिताच्या मानसशास्त्रीय तंत्राचा वापर करून पीडितांची चौकशी करण्यात त्याला आनंद होत होता तो त्याला वाटत नाही. याच काळात बंदी घातलेला दिग्दर्शक  अल्बर्ट जरास्का हा नैराश्यात जाऊन आत्महत्या करतो. यामुळे पूर्व जर्मनीतील कलाकार खूप अस्वस्थ होतात. दिवसेंदिवस आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहेच,  मात्र कलाकारही मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करू लागल्याने, एवढ्या  दिवस कोणतीही राजकीय भूमिका न घेणारा जॉर्जही अस्वस्थ होतो. तो पॉलशी चर्चा करून ह्यावर लिहायचे ठरवतो. ते पश्चिम जर्मनीतील ‘स्पीगल ‘ ह्या साप्ताहिकात अज्ञात नावाने लेख लिहून प्रकाशित करायचे ठरवतात. केकमधून तस्करी करून प. जर्मनीतून टाइपरायटर मागवला जातो. कारण पूर्व जर्मनीत मिळणारे सगळे टाइपरायटर हे सरकारकडे नोंदणी केलेले असतात. काम झाल्यानंतर जॉर्जच्या घरामध्येच एका ठिकाणी तो टाइपरायटर लपवला जातो. मध्यंतरानंतर फिल्मचा  बराचसा भाग  ह्याच घटनेभोवती फिरतो.  कदाचित ही फिल्म पाहून तुमचे डोळे पाणावतील. अंधारात एकटे पाहत असाल खूप रडत बसाल. हे आनंदाचे अश्रू आहेत की कशाचे हेही तुम्हाला कळणार नाही. फक्त तो एक भरभरून समृद्ध करणारा तृप्त अनुभव असेल, एवढं मात्र नक्की. 

लेखकाचा संपर्क- ९९२१५२७९०६

बातम्या आणखी आहेत...