आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मनाेहरी' विक्रम : एकाच कढईत चार तासांत शिजवली 3 हजार किलो खिचडी, जागतिक खाद्यदिनी नागपुरात भव्य उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - जागतिक खाद्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी रविवारी एकाच अवाढव्य कढईत केवळ चार तासांत सुमारे तीन हजार किलो खिचडी तयार करत आणखी एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला. नागपुरातील महाल परिसरातील चिटणीस पार्क स्टेडियममध्ये मैत्री परिवार संस्थेच्या वतीने हा उपक्रम अायाेजित केला हाेता. 

 

मनोहर यांनी तांदूळ, डाळ, भाज्या, तेल आणि तुपाचा वापर करून रविवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास खिचडी तयार करण्यास सुरुवात केली. नियोजनाप्रमाणे कढईत आवश्यक जिन्नस घालून सकाळी ९.३० च्या सुमारास प्रक्रिया पूर्ण केली.या प्रक्रियेवर पंच म्हणून पाच गॅझेटेड अधिकारी लक्ष ठेवून होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळेही हजर हाेते. या विक्रमाची गिनीज बुक, लिमका बुक, एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी मनोहर यांनी दावा सादर केला होता. आता या विक्रमाशी संबंधित दस्तऐवज व व्हिडिओ चित्रीकरण या संस्थांना पाठवण्यात येणार असून काही महिन्यांत या दाव्याला अधिकृत मान्यता मिळू शकेल.अवाढव्य कढई कोल्हापूरची : या खिचडीसाठी मनोहर यांनी कोल्हापूर येथील स्फूर्ती इंडस्ट्रीजचे नीलेश पै यांच्याकडून खास कढई तयार करून घेतली होती. तीन हजार किलो खिचडी तयार करण्यासाठी चार सराट्यांचा वापर करण्यात आला. या सराट्यांची लांबी तब्बल ११ फूट आहे. सराटे वेगवेगळ्या वजनाचे वापरण्यात आले. 

 

असे वापरले जिन्नस.. देशी तुपापासून दही, मसालेही... 
100 किलो देशी तूप 
50 किलो शेंगदाणा तेल 
575 किलो डाळ आणि तांदूळ 
2500 लिटर पाणी 
30 किलो भरडलेले धणे 
15 किलो मेथीचे दाणे 
30 किलो शेंगदाणे 
100 किलो गाजर 
50 किलो आले 
30 किलो मीठ 
50 लिटर दही 
40 किलो कोथिंबीर 
02 किलो काळे मसाले 
30 किलो गूळ 
50 किलो मटारचे दाणे 
200 किलो लाकूड भट्टीसाठी 

 

यापूर्वीचा विक्रम संजीव कपूर यांच्या नावे 
दिल्लीत एकाच वेळी सुमारे ९०० किलो खिचडी तयार करण्याचा विश्वविक्रम सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. मात्र, गेल्याच वर्षी शेफ विष्णू मनोहर यांनी १२०० किलो खिचडी तयार केली होती. मात्र, त्या वेळी त्यांनी एकाही अधिकृत संस्थेकडे विश्वविक्रमाचा दावा केला नव्हता, हे विशेष. 

 

पुढील लक्ष्य : २५०० किलो वांग्याचे भरीत 
५३ तास कुकिंग मॅरेथॉनचा विक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. हा विक्रम त्यांनी २१ एप्रिल २०१७ रोजी केला होता. गिनीज बुककडून त्यांना लवकरच प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित आहे. अाता त्यांनी विक्रमी खिचडी शिजवली असून येत्या २१ डिसेंबरला जळगाव येथे ते अडीच हजार किलो वांग्याचे भरीत तयार करण्याचे नियोजन केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...