आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा बाेलबाला, काँग्रेसकडे मात्र सक्षम उमेदवारांची वानवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोज व्हटकर | नागपूर  एकीकडे मेट्राे, चकाचक रस्ते, उड्डाणपुल यासारखी विकासाची कामे तर दुसरीकडे वाढत चाललेली गुन्हेगारी, रोजगाराची समस्या आणि पावसाळ्यातही होत असलेला दिवसाआड पाणीपुरवठा, अशी राज्याची उपराजधानी म्हणून आेळख असलेल्या संत्रानगरी  नागपूरची अवस्था आहे. याच नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. पायाभूत सुविधांची कामे, भाजप- संघाच्या स्वयंसेवकांचे भक्कम नेटवर्क ही भाजपची बलस्थाने असल्याने फडणवीस निश्चिंत आहेत. तर दुसरीकडे गटबाजीने पुरती बेजार काँग्रेस सक्षम उमेदवाराचा शाेधात आहे. फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे नेते. त्यांच्यामुळे या पाच वर्षात अनेक विकासकामे मार्गी लागल्याचा दावा भाजपचे नेते करतात. त्यातील मेट्राेसारखे काही कामे दिसूनही येतात. मिहान प्रकल्पात काही उद्योग सुरू झाले. आयआयएमसारख्या संस्थाही मंजूर झाल्या.  पतंजली, अनिल अंबानींचा विमानाचे पार्ट बनवण्याचा कारखाना उभारणीच्या पातळीवर आहे.  उपराजधानीत विकासाला वेग, मात्र गुन्हेगारी राेखण्यात अपयश नागपुरात वाढत चालेल्या गुन्हेगारीचा प्रश्न खूप मोठा बनला आहे. दररोज येथे गुन्ह्यांच्या गंभीर घटना घडतात. मुख्यमंत्र्यांच्या गृहखाते असूनही गुन्ह्यांवर वचक आणण्यात अपयश आल्याचे दिसते. नागपूरचा पाणी पुरवठा मध्य प्रदेशातील पेंच धरणातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे.  येथे कायमस्वरूपी पाण्याचा स्रोत निर्माण झाला नाही. त्यामुळे ३५ वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विरोधकही हेच मुद्दे मांडत आहेत. वेगळा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भाचा विकास झाला नाही हे कळीचे मुद्दे असल्याचे दिसते.  काँग्रेस अजूनही गटबाजीतच  २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल गुडदे यांना उमेदवारी दिली होती. आता पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा आहे. पण गटबाजीला वैतागून त्यांनी अजूनही तयारी केलेली नाही. विलास मुत्तेमवार हे फडणवीसांना आव्हान देऊ शकतील, अशी आशा असल्याने त्यांच्या नावाची चर्चा आहे. मुत्तेमवार यांच्याकडे विचारणा केली तर त्यांनी ‘शहराध्यक्षांना विचारा’, असे सांगून हात झटकले. एखादा सेलिब्रिटी उमेदवार देता येईल का, याची चाचपणी होऊ शकते असे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.

विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांची यंत्रणा तैनात
दक्षिण- पश्चिम मतदारसंघात शहराच्या विस्तारित परिसराचाही समावेश आहे. विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी फडणवीस यांनी आमदार म्हणून वेगळी यंत्रणा लावलेली आहे.  आमदारांना केवळ २ कोटीचा निधी असतो, पण देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघात सुमारे ३५० कोटींची कामे आमदार म्हणून मार्गी लावली आहेत. ६० ग्रीन पार्क, १८ मोठे पार्क, सोनेगाल तलावाची खोली वाढविणे, वर्धा रोड बायपासचे रुंदीकरण, मिहान आैद्योगिक क्षेत्रात १७ नवीन प्रोजेक्ट सुरू केले. कॅन्सर हॉस्पिटल विस्तार, अशी अनेक कामे मतदारसंघात झाली आहेत. फडणवीस गेल्यावेळी ५५ हजार मताधिक्याने निवडून आले होते. यावेळी त्यांचे मताधिक्य किती वाढते, याचीच उत्सुकता आहे. 

बातम्या आणखी आहेत...