आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरात रंगणार गडकरी विरुद्ध पटोले सामना; श्रेष्ठींचाही होकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे नाना पटोले उभे राहणार असल्याचे स्पष्ट  झाले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे तसेच संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याशी शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर नाना पटाेले यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरींविरोधात लढण्यास होकार दिला. नाना पटोले यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात आजवर तब्बल ११ वेळा काँग्रेसचा खासदार निवडून आलेला आहे, हे विशेष.


काही महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका करत नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना तिथे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्षपद देण्यात आले. “आपण पूर्ण ताकद लावून लढू. गडकरी व देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातच बांधून ठेवू आणि जिंकू’, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. अधिकृत घोषणा येत्या एक दोन दिवसात होईल, असे ते म्हणाले. दरम्यान, नागपूरमधून वंचित बहुजन आघाडीचे आव्हान देखील गडकरींना मिळू शकते, असेही राजकीय क्षेत्रातील  जाणकरांना वाटत आहे. 


गडकरींविरुद्ध पटोलेंना उमेदवारी का?
जात फॅक्टर :  विदर्भात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असून राजकीय दृष्टीनेही हा समाज प्रभावशाली व संवेदनशील आहे. पटोले यांच्या माध्यमातून कुणबी कार्ड खेळून गडकरी यांच्यापुढे मोठे आव्हान उभे करण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत.


स्वसामर्थ्य : भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने मधुकर कुकडे यांना उभे करून पटोलेंच्या मदतीने हा मतदारसंघ खेचून आणला होता. पटोले हे नागपुरातही गडकरींपुढे तगडे आव्हान देऊ शकतात, याची काँग्रेसला खात्री वाटते.


मात्र, अशा अडचणीही : 
पटोलेंच्या उमेदवारीमुळे नागपुरात काँग्रेसच्या संघटनेत सत्ताधारी असलेला मुत्तेमवार गट नाराज होऊ शकतो. पटोले यांचा नागपूरशी तसा संबंध राहिलेला नाही. पटोले यांच्याकडे नागपुरात कार्यकर्त्यांचे कुठलेही नेटवर्क नाही. त्यामुळे ते आयात केलेले उमेदवार ठरू शकतात, असा सूरही व्यक्त होत आहे. एकूणच संत्रानगरीतील हा सामना रंगण्याची शक्यता असून याकडे राज्यासह देशाच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...