अधिवेशन / 'सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची..?' अधिवेशनाक भाजप आक्रमक

  • सत्तेसाठी शिवसेनेनं लाचारी पत्करली

दिव्य मराठी वेब टीम

Dec 16,2019 03:04:30 PM IST

नागपूर- सावरकरांविषयी बोलण्यास आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. आजपासून नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या विधानावरुन विधानसभेत प्रचंड गोंधळ झाला. भाजपने अधिवेशनात राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. विधानसभेत फडणवीसांनी सावरकरांबद्दल बोलताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे म्हणने पटलावरुन काढून टाकले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला.

पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, "सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची? हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचे आणि देशाचे दैवत आहेत. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, पण सावरकरांवर बोलणारच. राहुल गांधी माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील."

"सभागृहात सावरकरांविषयी बोललेला तो भाग कामकाजातून काढून टाकला, सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा अपमान सरकारने केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत सावरकरांवर बोलू दिलं जात नाही, याचा आम्ही निषेध करतो. ही विधानसभा ब्रिटिशांची नाही, तर महाराष्ट्राची आहे, ही लाचारी कशासाठी? आम्ही सावरकरांवर बोलणारच, आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल."

"16 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या आल्या. त्यात शेतकऱ्यांना फक्त 4500 कोटींचा निधी आहे. पूरग्रस्तांसाठी आकस्मिक निधी ठेवण्यात आला, ते परत देण्याचा उल्लेख दिसला. शेतकऱ्यांना 750 कोटी रुपयांचा निधी असल्याचा उल्लेख दिसला. सरकारच्या कृतीचा निषेध करतो, शेतकऱ्यांना 25 हजारांची हेक्टरी मदत तात्काळ द्यावी," अशीही मागणी फडणवीसांनी केली.


दरम्यान, भाजपच्या आमदारांनी सभागृहात ‘मी सावरकर’चा नावाच्या टोप्या घालून विधानसभेत प्रवेश केला. यावेळी सर्व आमदार विधानसभेबाहेर "राहुल गांधीनी माफी मागावी...उद्धव ठाकरे होशमे आओ...इंधिरा गांधींचा धिक्कार असो..." अशा घोषणा दिल्या. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.


नागपूरचे अधिवेशन हे राजकीय दृष्ट्या नेहमी आक्रमक आणि खळबळजनक ठरलं आहे. त्यामुळे हे अधिवेशन कसे पार पडणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्यात मतभेद आहेत हे आता काही नवीन नाही. त्यातच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीसांनी रणनीती तयार केली असून त्याचे पडसाद आता विधिमंडळात बघायला मिळत आहेत.

X
COMMENT