Home | Magazine | Rasik | Namdev Koli writes about Marathi literature's 'goodwill'!

मराठी साहित्याचं ‘चांगभलं’!

नामदेव कोळी, | Update - Jul 14, 2019, 12:20 AM IST

आजवर कधी नव्हे तर पहिल्यांदाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर हा मराठी लेखक वर्ग संघटीतही झाला आहे

 • Namdev Koli writes about Marathi literature's 'goodwill'!

  मराठी साहित्यात काही घडतच नाही असं अनेकदा ऐकायला मिळतं. साहित्यिक उपक्रम, पुरस्कार, पुस्तक परीक्षण, अभ्यासक्रमात साहित्यकृती लागल्याच्या बातम्या, वर्तमानपत्रात सदर लेखन, सोशल मीडियावर चालणारे वाद-विवाद, यापलीकडे सध्या मराठी साहित्यात काय चाललंय, यासंबंधीचा हा धांडोळा … हा धांडोळा परिपूर्ण नाही तरी प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेली ही उदाहरणे पाहता, ‘मराठी साहित्यात काहीच घडत नाही’ असं म्हणणाऱ्यांना नक्कीच आपलं विधान मागे घेण्यास भाग पाडणारं आहे.

  आजवर कधी नव्हे तर पहिल्यांदाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर हा मराठी लेखक वर्ग संघटीतही झाला आहे. ‘मराठी कवी लेखक संघटने’ची स्थापना करण्यात आलेली आहे. साहित्य चळवळी थांबलेल्या असताना ही संघटना स्थापित होणं हीदेखील आपल्या मराठीतली महत्वपूर्ण वाङ्मयीन घटना आहे हे मान्य करावं लागेल.

  लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक, समीक्षक, नियत-अनियतकालिके हे वाङ्मय व्यवहारातील महत्त्वाचे घटक आहेत, यावर आपले साहित्यविश्व उभे आहे. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दोन दशकांतल्या मराठी साहित्याचा विचार केला तर आधीच्या कालखंडांच्या तुलनेत खूप बदल झालेला आढळून येईल. पूर्वी लिहिणाऱ्यांची संख्या मर्यादित होती, त्यांचं केंद्र महानगरांमध्ये होते, प्रकाशकही मोजके होते. त्यामुळे त्यांची मुजोरी वाढली होती. वितरण व्यवस्थेलाही फारशी गती नव्हती. आजच्या सारखे जाहिरातीचे बहुपर्याय उपलब्ध नव्हते. बड्या लेखकांचीच पुस्तकं छापली जायची, खेड्यापाड्यातले याबाबत दुर्लक्षित आणि वंचित राहिले. बऱ्याच कवींची पुस्तकं त्यांच्या हयातभर निघू शकली नाहीत, तर काहींच्या पुस्तकांची एकच आवृत्ती पूर्णपणे संपली नाही. बरेच लेखक समीक्षकांकडून दुर्लक्षित राहिले, म्हणून ते वाचकांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. आज मात्र चित्र फारच वेगळं आहे.


  अलीकडेच ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या संग्रहासाठी सुशीलकुमार शिंदे या तरुणाला युवा साहित्य अकादमी, तर ‘जंगल खजिन्याचा शोध’ या बालकादंबरीसाठी सलीम मुल्ला यांना बालसाहित्य गटातला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. तशी ही दोन्ही माणसं साहित्य वर्तुळात फार परिचित नाहीत. सुशील हा मूळचा इंदापूरचा... तो शेतकीत पदवीधर आहे, एमबीए करून मार्केटिंगमध्ये काम करतो तर सलीम मुल्ला हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या तलंदगे गावचे वन विभागात रक्षकाची नोकरी सांभाळून लेखन करतात. असे किती तरी लेखक-कवी प्रसिद्धीपासून दूर राहत निष्ठेने आपलं सकस लेखन करीत आहेत. नवनाथ गोरे हा सांगली जिल्ह्यातला जत तालुक्यातल्या उमदी गावचा... आपलं अभावग्रस्त जगणं ‘फेसाटी’ कादंबरीतून त्याने प्रामाणिकपणे मांडलेलं आहे. त्याची दखल मराठी साहित्यविश्वाला घ्यावी लागली. २०१८च्या युवा साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार "फेसाटी'ने मिळवले. नांदेड जिल्ह्यातल्या अंबुलगा गावाचा कवी अमृत तेलंग सातत्याने चांगली कविता लिहितोय. त्याच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ या संग्रहाला शासनाचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचा "विशाखा' काव्य पुरस्कार मिळाला. अकादमीच्या ‘साहित्योत्सवात’ "कविता की नई फसल'मध्ये मराठीचे प्रतिनिधित्व त्याने केले. सुदाम राठोड याला नुकताच त्याच्या ‘आमच्यात कुणी युद्धखोर नव्हते’ या काव्यसंग्रहासाठी मानाचा "अरुण काळे अजातशत्रू' पुरस्कार मिळाला. खान्देशातील कडगावसारख्या छोट्या गावातला गोपीचंद धनगर त्याच्या कथेतून आपला भोवताल मोठ्या ताकदीने मांडतोय. त्याची दखल घेऊन त्याला आगरताळा येथील राष्ट्रीय युवा संमेलनात कथा वाचनासाठी निमंत्रण मिळालं. धुळे जिल्ह्यातल्या साक्रीतले रावसाहेब कुवर यांच्या कविता सोलापूर विद्यापीठात बीएच्या अभ्यासक्रमात, विनायक येवले याची कविता नांदेड विद्यापीठात, सत्यपालसिंग राजपूत आणि महादेव कांबळे या तरुणांच्या कविता मुंबई विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमात, तर कल्पना दुधाळ यांच्या कविता विविध विद्यापीठांमध्ये समाविष्ट झाल्या आहेत. आनंद विंगकर यांची ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’ ही कादंबरी क्रमाने अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासली जातेय. अनिल साबळे हा मुथाळणेसारख्या आदिवासी पाड्यावर राहून तिथल्या आदिवासींच्या वेदना आपल्या लेखनात प्रभावीपणे मांडतोय, मराठीतल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या नियतकालिकांतून सातत्याने तो लेखन करतोय. खरं तर पुरस्कार प्राप्त होणे किंवा अभ्यासक्रमात साहित्यकृतींचा समावेश होणे ही तशी साधारण बाब आहे. पण परीघाबाहेरच्या दुर्लक्षित लेखक कवींच्या प्रतीभेचा हा सन्मान आहे. मराठी साहित्यासाठी हे चित्र नक्कीच आश्वासक आहे.


  यापलीकडेही मराठी साहित्यात बरंच काही घडतंय. साहित्य अकादमीच्या ‘इंडियन लिटरेचर’ या इंग्रजी नियतकालिकाने ३०१ वा अंक हा मराठी कवितेचा विशेषांक म्हणून संपादित केला. यात जवळपास समकालीन ३८ कवींच्या कविता इंग्रजीत अनुवाद केल्या आहेत. प्रकाश भातंब्रेकर यांनी तर विजया बुक्ससाठी ‘मराठी कविता का समकाल’ आणि ‘समानांतर मराठी कहानी’ अशी दोन महत्त्वपूर्ण पुस्तकं संपादित आणि अनुवाद करून समकालीन मराठी कथा कविता हिंदी वाचकांपर्यंत पोहोचवली. ‘सदानीरा’ या हिंदीतल्या महत्वाच्या नियतकालिकेने ‘समकालीन मराठी स्त्री कविता’ हा निवडक मराठी कवयित्रींच्या कवितांचा विशेषांक नुकताच प्रकाशित केला असून जवळपास २० कवयित्रींच्या कवितांचा हिंदी अनुवाद समाविष्ट आहे. हेमंत दिवटे, सचिन केतकर ही मंडळी भारताबाहेर साहित्यिक उपक्रमांमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व करत असतात.


  आजवर कधी नव्हे तर पहिल्यांदाच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर हा मराठी लेखक वर्ग संघटितही झाला आहे. ‘मराठी कवी लेखक संघटने’ची स्थापना करण्यात आलेली आहे. कादंबरीकार दिनकर दाभाडे तिचे अध्यक्ष आहेत. संघटना लेखकांच्या बाजूने उभी राहते आहे. साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना उपचारासाठी व घरासाठी संघटनेमार्फत आवाहन केले असता समाजातून सर्व स्तरातून भरभरून मदत आली. आज त्यांना योग्य उपचार मिळत असून हक्काचं नवं घरही मिळालं. साहित्य चळवळी थांबलेल्या असताना ही संघटना स्थापित होणं हीदेखील आपल्या मराठीतली महत्त्वपूर्ण वाङ्मयीन घटना आहे हे मान्य करावं लागेल. आज माहिती तंत्रज्ञानाच्या वेगवान काळात साहित्य क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले आहेत. प्रगत प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमुळे गावपातळीवरील प्रकाशकही कमी वेळेत उत्तम पुस्तक छपाई करत आहेत. प्रसंगी पुस्तकाची मांडणी करून ते दिल्ली, चेन्नई, कोलकाता यासारख्या महानगरातून छापून आणणं आता सहज शक्य झालं आहे. कॉपर कॉइन आणि पोएट्रीवाला आदी प्रकाशकांनी आजवर उत्तम पुस्तकं केलेली आहे ती याच मार्गाने. पुस्तकांची वितरण व्यवस्था आता अॅमेझॉन, बुक गंगा, स्नॅपडील, फ्लिपकार्ड यामुळे फार गतीशील झाली आहे. प्रकाशकांनाही स्वतः ऑनलाइन पुस्तकं विक्री सुरु केलेली आहे. लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने तर भारतभरात कुठेही पोस्टेज खर्चाशिवाय पुस्तकं पाठवण्याची योजना सुरू केली आहे, या योजनेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. काही प्रकाशकांनी तर आपली पुस्तके केवळ ऑनलाइन विकण्याचा निर्धार केला आहे. एकूणच ऑनलाइन पुस्तकं खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. याशिवाय पुस्तकाचे ई-बुक तसेच किंडल आवृत्तीचाही प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतो आहे. पुस्तकं विकली जात नाही, अशी तक्रार करणाऱ्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनातील ग्रंथविक्रीतून होणाऱ्या उलाढालीची आकडेवारी पाहावी. तर आता चित्र असं आहे की कारणे सांगणाऱ्यांनी आपली दुकाने बंद केलीत आणि ज्यांना या व्यवसायात यश हवे आहे त्यांनी बदलायला सुरुवात केलेली आहे.


  सोशल मीडियाचा भाग या सर्व प्रकारच्या बदलांमध्ये फार महत्त्वाचा आहे. फेसबुकवर अवघे साहित्यविश्व सामावले आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. साहित्यासंदर्भातील अशी कोणतीही गोष्ट नसेल जी फेसबुकवर उपलब्ध होणार नाही. सर्वच जुन्या-नव्या पिढीतले लेखक-समीक्षक, संपादक आणि वाचक फेसबुकवर आहेत. काहींचे फेसबुक पेज आहेत. आपल्या साहित्यिक घडामोडींचा लेखाजोखा फेसबुककडे आहे. आपलं बरंचसं लेखन, पुस्तकाचे जाहिरात, प्रकाशन, समीक्षण आधी सर्व इथेच मिळू लागलं आहे. रा.रं.बोराडे, वसंत आबाजी डहाके, सतीश तांबे, राजन खान, राजन गवस, चं. प्र. देशपांडे, जी. के. ऐनापुरे, दा.गो.काळे यांसारख्या जुन्या-जाणत्या लेखकांपासून ते मंगेश नारायणराव काळे, दिनकर मनवर, प्रवीण बांदेकर, श्रीकांत देशमुख, केशव सखाराम देशमुख, अशोक कोतवाल, रणधीर शिंदे, गणेश कनाटे, प्रफुल्ल शिलेदार, प्रमोद मुनघाटे, संतोष पद्माकर पवार, अजय कांडर, प्रज्ञा पवार, कल्पना दुधाळ, संजय भास्कर जोशी यांसारखे कितीतरी दिग्गज साहित्यिक फेसबुकवर सक्रिय असतात. निखिलेश चित्रे, नितीन रिंढे, गणेश विसपुते, गणेश मतकरी, विजय बेंद्रे, अभिषेक धनगर, प्रदीप कोकरे, मेघना भुस्कुटे यांच्याकडून नवनवीन मराठीतर भाषेतल्या महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती मिळते. प्रकाशकही यात मागे नाही, येशू पाटील, अशोक कोठवळे, अस्मिता मोहिते, मनोज पाठक, सुदेश हिंगलासपुरकर, प्रदीप पाटील, युवराज माळी, सुशील धसकटे, बाळासाहेब घोंगळे, अरुण जाखडे, संजय शिंदे यांसारख्या प्रकाशकांचा सक्रिय सहभाग असतो. अक्षरधारा, पुस्तकपेठ पुणे, पुस्तक पेठ नाशिक, पपायरस, शब्द गॅलरी, साकेत बुक गॅलरी ही लोकप्रिय पुस्तक विक्रेते मंडळी सोशल मीडियावरून तथा प्रत्यक्ष वाचकांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स, उपक्रम राबवत असतात. आजच्या काळात वाचनसंस्कृती टिकवून ठेवणारं हे चित्र नक्कीच आश्वासक आहे. अवघी तरुणाई आज या सोशल मीडियाचा वापर करते, साहित्यात रुची असणाऱ्यांना आपलं वाचन, लेखन विकसित करण्यास खूप वाव आहे.


  फेसबुकच्या वापराबाबत चिंता करणाऱ्यांना दोन उदाहरणे सांगतो, एक - बालाजी सुतार हे मराठीतील नव्या दमाचे कवी-कथाकार. त्यांचा स्वतःचा वाचक वर्ग तर आहेच, शिवाय फेसबुकवर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या प्रत्येक पोस्टची हे फेसबुक फ्रेंड्स आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच त्यांचा ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा पहिला कथासंग्रह शब्द प्रकाशनकडून प्रकाशित झाला. बालाजी सुतार यांच्या काही चाहत्यांनी हा संग्रह अॅडव्हान्स बुकिंग करून मिळवला, काहींनी पटापट ऑनलाईन खरेदी केला. वाचून भरभरून लिहिलं गेलं, ते सर्वदूर शेअर होत गेलं. परिणामस्वरूप या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ दोन महिन्यात संपली. दुसरं उदाहरण मराठीतल्या पहिल्या ई-प्रकाशन सोहळ्याचं... महेश लोंढे यांनी आपला पहिला कवितासंग्रह ‘निद्रानाशाची रोजनिशी’ बारलोणी प्रकाशनाखाली स्वतःच उत्तम प्रकारे काढला. या संग्रहाचे प्रकाशन त्यांच्या मित्रांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले. संग्रहाविषयी कुणी बोललं, कुणी या संग्रहातल्या कवितांचं वाचन केलं, फेसबुकवरून शेकडो लोकांनी हा आगळावेगळा ई- प्रकाशन सोहळा अनुभवला. मराठी साहित्य व्यवहारात सकारात्मक बदल घडवून आणणारी अशी किती तरी उदाहरणे देता येतील. ज्यात 'कवितेच्या जगात' सारखी समकालीन कवितेची यूट्यूब मालिका आहे, "क-कवितेचा' नावाचा निखळ कविताच्या प्रचार प्रसारासाठी जामनेरच्या गणेश राऊत यांनी एडिट केलेले युट्युबवरील व्हिडिओ आहेत, याच नावाने मेघराज मेश्राम या तरुण कवीने सुरु केलेलं फेसबुक पेजही फार लोकप्रिय आहे. मधुराणी प्रभुलकर यांचा "कवितेचं पान' हा उपक्रम असेल, वृषाली विनायक हिचा साहित्यिक गप्पांचा 'झिम्माड काव्यसमूह' हे सगळंच कौतुकास्पद आहे.


  शासनामार्फत साहित्यासंदर्भात अनेक योजना वर्षभरात यशस्वीपणे सुरु आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि त्यात समाविष्ट असलेल्या व नसलेल्या सर्व घटकसंस्था महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात आपले साहित्यिक उपक्रम राबवत आहेतच. याशिवाय नाशिकचे कुसुमाग्रज प्रतिष्ठान, जळगावचे परिवर्तन, कणकवलीचे आवानओल प्रतिष्ठान, बहिणाबाई मेमोरिअल ट्रस्ट यांच्या वतीने राबवण्यात येणारे साहित्यिक उपक्रम मराठी साहित्याकडे लोकांना आकर्षित करणारे आहे आणि हे सगळं नक्कीच आश्वस्त करणारे आहे. हा धांडोळा परिपूर्ण नाही तरी प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेली ही उदाहरणे पाहता, ‘मराठी साहित्यात काहीच घडत नाही' असं म्हणणाऱ्यांना नक्कीच आपलं विधान मागे घेण्यास भाग पडणार आहे.


  लेखकाचा संपर्क : ९४०४०५१५४३

Trending