आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे नाना पटोले बिनविरोध विधानसभा अध्यक्ष; भाजपच्या कथाेरेंची माघार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधानसभा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर भाजपकडून आमदार किसन कथोरे यांचा अर्ज भरण्यात आला होता. मात्र, रविवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेपूर्वी भाजपने किसन कथोरे यांच्या नावे भरण्यात आलेला अर्ज मागे घेतला आणि नाना पटोले यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी हा इतिहास असल्याने अर्ज मागे घेतला असल्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेऊन स्थानापन्न केले. पटोले यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. नाना पटोले यांनी सुरुवातीलाच 'मी सांगतो तेवढेच ऐकायचे' असे म्हटले तेव्हा संपूर्ण सभागृहात हास्याचे कारंजे फुलले.

अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पटाेले म्हणाले, 'डिस्कस', 'डिबेट', 'डायलॉग' आणि 'डू नॉट डिस्टर्ब' या चार 'डी'वर आधारित कामकाज करत असताना सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. राज्यातील वंचित घटकांना न्याय देण्याची माझी भूमिका राहील, शेतकरी तसेच राज्यातील प्रत्येक घटकाला सभागृहाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करीन. संसदीय लोकशाहीत विधानसभेची गौरवास्पद परंपरा आहे. या परंपरेचा गौरव राखण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन, असे उत्तर अभिनंदन ठरावावर बोलताना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'राज्याची विधानसभा ही लोकशाहीतील सर्वोच्च स्थानी आहे. सभागृहात काम करताना कोणावरही अन्याय होणार नाही, अशी भूमिका अध्यक्षांनी घ्यावी. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या पटोले यांचा स्वभाव बंडखोर आणि अन्याय सहन न करणारा आहे. आपले मत मांडत असताना कोणाचीही पर्वा न करता धाडस दाखवणारा हा नेता आहे. त्यांनी समाजातील विविध घटकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आवाज उठवला आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनाही सांभाळून घेत योग्य वेळी समज देऊन कामकाज चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.'

माझे व्यंग आणीबाणीच्या काळातले : बागडे

अध्यक्ष साहेब, केवळ उजव्या बाजूचे एेकू नका, तर डाव्या बाजूचेही एेका, अशी विनंती फडणवीस यांनी केली. त्यावर मंत्री जयंत पाटील यांनी 'तुमचे अध्यक्ष (बागडे) तर फक्त उजव्या बाजूनेच एेकत हाेते, असे म्हटले. त्यावर उत्तर देताना माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, 'अध्यक्ष असताना मी डाव्या बाजूचे ऐकत नव्हतो, असे काही जणांचे म्हणणे अाहे. परंतु माझ्याविषयी अनेकांना खरी माहिती नाही. मला एका कानाने ऐकू येत नाही. माझे हे व्यंग आणीबाणीच्या काळातले आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. माझ्या या व्यंगावर टीका करणारे तेव्हा काय करत होते हे मी आता सांगणार नाही, कारण ही ती वेळ नाही,' अशा शब्दांत अामदार बागडे यांनी विराेधकांचा समाचार घेतला.

अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा : फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'लोकहिताच्या बाबींवर विरोधी पक्ष म्हणून प्रश्न मांडले जात असताना अध्यक्षांकडून सहकार्याची अपेक्षा आहे. अध्यक्षांनी दोन्ही बाजूंना काम केलेले असल्याने दोन्ही बाजूंच्या आशा आणि अपेक्षा त्यांना माहिती आहेत. त्यांच्या अनुभवाचा सभागृहाला फायदा होईल. आतापर्यंत या पदावर काम केलेल्या सर्व अध्यक्षांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. या पदाची गरिमा ते राखतील.'

 

बातम्या आणखी आहेत...