आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नानावटी आयोगाची मोदी, त्यांच्या तीन मंत्र्यांना क्लीन चिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर : गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्राकांडानंतर उसळलेल्या दंगलीवर नानावटी आयोगाचा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आला. गुजरातचे गृह राज्यमंत्री प्रदीपसिंग जाडेजा यांनी अहवाल सादर केल्यानंतर सांगितले की, आयोगाने आपल्या अहवालात दंगलीच्या वेळी मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी, तत्कालीन गृहमंत्री दिवंगत हरेन पंड्या आणि दोन इतर मंत्र्यांना क्लीन चिट दिली आहे.

हल्ल्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे काेणत्याही मंत्र्याविरोधात आयोगाला पुरावे आढळले नसल्याचेही जाडेजा यांनी सांगितले. ही मोदी आणि भाजपला बदनाम करण्याची काँग्रेस व काही गैरसरकारी संस्थांची चाल असल्याचेही जाडेजा यांनी सांगितले.

माेदींनी दिले नव्हते निर्देश

गृह राज्यमंत्री जाडेजा यांनी सांगितले की, अहवालात नमूद करण्यात आले आहे की, २७ फेब्रुवारी २००२ च्या बैठकीत मोदींनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अल्पसंख्याकांविरोधातील लोकांचा राग शांत करण्यासाठी २४ तास देण्यात यावेत असे कोणतेही निर्देश दिले नव्हते. अहवालात २७ फेब्रुवारी २००२ राेजी साबरमती एक्स्प्रेसच्या जळालेल्या डब्याची पाहणी करताना पुराव्यांसोबत छेडछाड केल्याच्या आरोपही चुकीचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांची नकारात्मक भूमिका


जाडेजा यांनी सांगितले की, तत्कालीन तीन आयपीएस अधिकारी आर. पी. श्रीकुमार, संजीव भट्ट आणि राहुल शर्मा यांनी सरकारवर लावलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांची भूमिका नकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. दंगल शमवण्यासाठी पोलिसांनी पूर्ण ताकद व तत्परता दाखवली नसल्याचे म्हटले आहे.आयोगाने दोन एनजीओ दिवंगत मुकुल सिन्हा यांचे जन संघर्ष मंच आणि ितस्ता सेटलवाड यांच्या सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस यांची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

पाच वर्षांपूर्वी अहवाल केला होता सादर


गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जी. टी. नानावटी आणि उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अक्षय एच. मेहता आयोगाने दोन भागात अहवाल तयार केला होता. पहिला भाग २००९ मध्ये विधानसभेत सादर करण्यात आला होता. हा अहवाल साबरमती एक्स्प्रेसमधील ५९ कारसेवकांची हत्येशी संबंधित होता. दुसरा भाग पाच वर्षांपूर्वी सोपवण्यात आला होता.

दंगल पूर्वनियोजित नसल्याचे अहवालात नमूद

दंगलीत कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय पक्षाची भूमिका नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. संपूर्ण गुजरातमध्ये पसरलेली ही दंगल पूर्वनियोजित कटाचा भाग नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. आयोगाने भाजप नेते दिवंगत हरेन पंड्या, अशोक भट्ट, भारत बरोट यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे अहवालात म्हटल्याचे जाडेजा यांनी सांगितले. मात्र, आयोगाने भाजप नेत्या माया कोडनानी यांच्या भूमिकेबाबत काहीही निष्कर्ष काढलेला नाही. नरोडा पाटिया नरसंहारात सहभागी असल्याचा आरोप कोडनानी यांच्यावर आहे.