आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नांदेड - शहरातील डी-मार्ट मार्गावर शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराला भरधाव महिला तहसीलदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने एका तरुणाला उडवले. त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारचालकाला अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी जवळपास सहा तास मृतदेह जागेवरच ठेवल्याने तणाव निर्माण झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला व त्याच्या जागेवर बनावट कार चालक पाठवण्यात आल्याने तणावात अधिक भर पडली.
डी-मार्ट रस्त्यावर खासगी नोकरी करणारा चांदू रघुनाथ सूर्यवंशी (२३) हा तरुण उभा होता. त्याचवेळी स्विफ्ट डिझायर (क्रमांक एमएच २६ एएफ ३९२ ) कारने चांदूला उडवले. या अपघातानंतर कारचालक फरार झाला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली. जोपर्यंत कारचालकाला अटक करीत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका संतप्त जमावाने घेतली.
तहसीलदाराकडे संशयाची सुई :
अपघातग्रस्त कार नायगावच्या तहसीलदार सुरेखा नांदे यांचे वडील तुळशीराम नांदे यांच्या नावे नोंदणी झालेली आहे. अपघात झाला त्यावेळी सुरेखा नांदे कारमध्ये नव्हत्या. परंतु त्यांचा निकटचा नातेवाइक कार चालवत होता अशी माहिती मिळाली. अपघातानंतर नायगाव येथील मंडळ अधिकारी विजय जाधव पाटील यांनी बिलोली तालुक्यातील बिजूर येथील मोहन श्रीरामे (वय ३०) या काळीपिवळी चालकाला हा अपघात स्वत:च्या नावावर घेण्यासाठी ठाण्यात आणून सोडले. परंतु ठाण्यासमोर जमाव व तणाव पाहून श्रीरामे यांनी पोलिसांना अपघात आपण केला नसल्याचे सांगितले.
त्यामुळे जमाव चिडला
अपघात झाला तेव्हा तो प्रत्यक्ष पाहणारे साक्षीदार आहेत. पोलिस ठाण्यात जेव्हा श्रीरामे याच्या रूपाने बनावट कारचालक उभा करण्यात आला तेव्हा नागरिक व मृताचे नातेवाइक संतप्त झाले. खऱ्या कारचालकाला अटक करा अशी मागणी त्यांनी लावून धरली. अखेर पोलिस ठाण्यात आमदार बालाजी कल्याणकर व शिवसेनेचे इतर पदाधिकाऱ्यांनी खऱ्या आरोपीला पकडण्यात येईल, असे आश्वासन दिले तेव्हा सायंकाळी नातेवाइकांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.