Home | Magazine | Madhurima | Nandini Desai write about 'Ham Bane Tum Bane Serial' 

तुमच्यामाझ्या घरातील गोष्ट 

नंदिनी देसाई | Update - Jan 15, 2019, 12:04 AM IST

एका साध्यासुध्या बऱ्यापैकी सुस्थितीमधल्या घराची ही कहाणी.

 • Nandini Desai write about 'Ham Bane Tum Bane Serial' 

  मासिक पाळी हा अजूनही कुजबुजला जाणारा विषय, तोही बायकाबायकांत. बहुतांश कुटुंबांत ते असतं मायलेकीचं गुपित. पण मुलीची पहिली पाळी येते आणि तेव्हा सावरायला फक्त बाबाच असतो घरी, तेव्हा काय होऊ शकतं, याची लोभस जाणीव दूरचित्रवाणीवरच्या एका मालिकेतून होते, तेव्हा प्रेक्षकांना काहीतरी वेगळंच पाहिल्याचा छान अनुभव येतो. कारण आता हळुहळू का होईना, असा बाबा घराघरांत तयार होतोय...

  फार कमी वेळा मालिका किंवा चित्रपट वगैरे पाहताना माझे डोळे भरून येतात. पुस्तकं वाचताना अनेकदा मी एकटीच रडलेय, पण मालिका पाहताना कधीच नाही. तशातच हल्लीच्या बौद्धिक दिवाळखोरीला कंटाळून मी मराठी मालिका पाहणंही सोडलं आहे. बहुतेकशा मालिका या नायिकेचं लग्न आणि आदर्श बायको किंवा सून या तिच्या व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत राहतात. यशस्वी नोकरदार गृहिणी, समजूतदार पण आपल्या मतांवर ठाम सून, मुलांची आई वगैरे व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे दिसूनच येत नाही या नायिकांमध्ये. कारखान्याचे छाप असल्यासारख्या सर्वच नायिका एकसारख्या सोज्वळतेच्या साबणाच्या गुळगुळीत कृत्रिम वड्या. शिवाय या मालिकांमध्ये नायक तर केवळ ताटाची डावी बाजू असावी म्हणून आपला तोंडी लावण्यापुरता! नायिकेच्या आणि खलनायिकेच्या प्रत्येक वाक्यावर “बोंबला, झाला मॅटर!” असं तोंड करून ढ्याण ढ्याण ढ्याण असे भाव दाखवायचे इतकेच त्याचे काम.

  पण कित्येकदा काही सुखद अपवादही आढळतात. परवा मैत्रिणीने एका व्हिडिओची लिंक पाठवून “हा एपिसोड नक्की पाहा, तुला आवडेल,” असा मेसेज पाठवला. अगदी खरं सांगायचं तर, मालिकेचा एखादा भाग असा “नक्की पाहा” म्हणून आल्यानंतर तो आठवड्याभराच्या मनोरंजनाचा कोटा भरून निघणारा असणार याची खात्रीच. नवऱ्याचा लॅपटॉप घासणीने स्वच्छ घासून नळाखाली धुऊन दोरीवर वाळत घालणारी नायिका किंवा दोन्ही भुवयांच्या बरोब्बर मध्ये गोळी लागलेली असूनदेखील नवऱ्याकडून गजरा माळून देवाचे दर्शन वगैरे घेऊन मग निवांत जीव सोडणारी नायिका वगैरे प्रकार म्हणजे क्लासिक मनोरंजनाची खात्रीच. त्यामुळे सुरुवातीला हाही व्हिडिओ त्यातलाच प्रकार वाटला. हम बने तुम बने हे मालिकेचे नावही अनोखेच वाटले. एक कबूल करते की, मी या मालिकेबद्दल कधी ऐकलंसुद्धा नव्हतं. सध्या मराठी मालिकाविश्वामध्ये (काय तर भारदस्त शब्द) केवळ विकिशाचे लग्न हाच एक मुद्दा शिल्लक राहिला असावा. अर्धं मराठी फेसबूक जगत सध्या त्या लग्नाच्या विनोदांनी भरून वाहतंय. पण या असल्या तर्कशून्य आणि विचारशून्य मालिकांच्या भाऊगर्दीतही एखादी मालिका काहीतरी वेगळं सादर करायचा प्रयत्न करतेय हे सुदैव.

  तर, विषय चालू आहे हम बने तुम बने या सोनी मराठीवरच्या मालिकेच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागाचा. एका साध्यासुध्या बऱ्यापैकी सुस्थितीमधल्या घराची ही कहाणी. दोन भाऊ, त्यांच्या बायका, आज्जीआजोबा वगैरे नेहमीचं कुटुंब. या कुटुंबामधल्या टीनेज मुलीची पहिल्यांदाच पाळी येते, आणि घरामध्ये बाबा आणि आजोबांखेरीज कुणीही नाही. धास्तावलेली, भांबावलेली शाळेतून घरी परत आलेली मुलगी बाबाला काय सांगणार म्हणत आईची वाट पाहत बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेते आणि इकडे बाथरूमबाहेर बाबा मात्र लेकीच्या काळजीत तगमगलेला. तिची नाजूक अवस्था न सांगता त्याला कळते आणि मग सुरू होते ती लेकीला अधिकाधिक आराम मिळावा, तिची भीती जावी म्हणून त्याची धडपड. अगदी साधीशी कहाणी, कुठे विनाकारण आरडाओरडा, कटकारस्थानं किंवा ओव्हर द टॉप वागण्याची कृत्रिम हौस नाही. तो, त्याचे वडील आणि धाकटा भाऊ अशा तिघा पुरुषांनीच मिळून घेतलेली ही जबाबदारी. अगदी आई घरी पोचेपर्यंत थोड्याच वेळासाठी. पण तरीही, समजून उमजून वावरणारी हे पुरूष खऱ्या अर्थाने मला कुठंतरी आजच्या समाजाचा एक दिलासादायक चेहरा दाखवून गेले. कुठंही अतिरंजित किंवा भडकपणा न दाखवता अतिशय आश्वासक आणि प्रेक्षकांना तसंच त्या मुलीलाही कुठंही कसनुसं न होईल अशा पद्धतीने दाखवलेलं संयत चित्रीकरण दिग्दर्शकाने केले आहे म्हणूनच या भागाचं मला विशेष कौतुक वाटलं. त्यात परत विनोदी दाखवण्याचा अट्टाहास करत विचित्र शाब्दिक कोट्या आणि काहीही अर्थहीन संवाद टाळत परफेक्टली नेहमीच्या बोलण्यावागण्यामधले संवाद बघून जरा बरंही वाटलं. मालिकेमधला हा बाबा लेकीला देण्यासाठी सॅनिटरी पॅड कपाटामध्ये धुंडाळत असताना बोलून जातो, “आता पॅड ही काय अशी लपवायची गोष्ट आहे का?” त्या क्षणी या भागाच्या लेखकाला माझ्याकडून तरी कौतुकाची थाप गेली. नंतर इंटरनेटवरून काहीबाही शोधून लेकीला आराम पडावा म्हणून पाणी गरम करणारा बाबा, तिचं दुखणं समजून घेताना तिला कविता ऐकवत ऐकवत खुलवणारा बाबा बघताना हे विसरूनच गेले की हा मालिकेमधला बाबा आहे.

  कारण, माझ्या आजूबाजूला जितेजागते वावरणारे बाबा असेच तर आहेत. नोकरी करणाऱ्या बायकोला घरात मदत करणारे, मुलांना सांभाळणारे असे बाबा आज आपण खरंच आपल्या भवताली पाहतच आहोत ना. पण आज पहिल्यांदा हे चित्रण मालिकेमध्ये पाहिलं म्हणून जरा अप्रूप वाटलं.


  पाळीचा स्टिग्मा हा आजही आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, मग पहिल्यांदा पाळी आलेल्या मुलींचा तर विचारच सोडून द्या. अगदी त्याबद्दल लिहायचंच झालं तर भर म्हणून न्हाण आल्यावरची कौतुकास्पद गाणी किंवा आज मैं जवान हो गयी म्हणत घरभर हुंदडणाऱ्या चित्रपटनायिका हे आणि इतकंच काही आपण आजवर पाहत आलोय. थोडक्यात, मुलगी आता “रीप्रॉडक्शन”ला योग्य झाली इतकीच समजूत असलेलं चित्रण प्रसारमाध्यमे करत आलेली आहेत. याहून अधिक होणारी मानसिक, शारीरिक आणि कौटुंबिक बदल आजवर कुणी मेनस्ट्रीम मीडियामध्ये टिपल्याचे पाहिले-वाचले नव्हतेच. मध्यंतरी एका कथेमध्ये पहिल्यांदा पाळी आल्यावर तर लेखकाने “तिचे अंग मोहरून आले” वगैरे काहीही लालित्यपूर्ण वर्णनं टाकली होती. पाळी येणं हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यामधला अनुभव वेगवेगळा असतो. त्यातही बापाच्या नजरेतून लेकीच्या आयुष्यामधला हा प्रसंग कितीजणांनी मांडण्याचा प्रयत्न केलाय देव जाणे.

  मराठी मालिकांचा वास्तव जीवनाशी काहीही संबंध राहून आता अनेक वर्षे लोटली आहेत. अधूनमधून येणारी एखादी लग्नाची गोष्ट, रात्रीस खेळ चाले किंवा दिल दोस्ती दुनियादारीसारख्या काही थोडेफार अपवाद वगळता बाकी सर्व मालिका या एकाच छापाच्या असतात. त्यामधली दाखवलेली मूल्ये, घटना, प्रसंग हे सारं वरकरणी आधुनिक वाटताना प्रत्यक्षामध्ये कसल्या तरी जुनाट आणि मागास वळणाची मते प्रेक्षकांवर ठसवत असतात. आजच्या समाजाचा बदलाचा वेग प्रचंड आहे. एकाच पिढीमध्ये आज किती परिवर्तन घडताना आपण पाहतोय. समाजाची मूल्यं बदलतात तसे नातेसंबंधदेखील बदलत आहेत. दुर्दैवाने, याचे चित्रण आपल्या प्रसारमाध्यमांमधून दिसतच नाही. सतत आदर्शवादी भूमिका घेऊच नका, ती मागणी नाहीच पण किमान काही सकारात्मक आणि प्रेक्षकांना बघताना कुठेतरी स्वत:शी जोडता येऊ शकेल असं काहीतरी दाखवत जा, ही मागणीही टीआरपीच्या रेट्यामध्ये अवास्तव ठरत चालली आहे.

  प्रश्न पडतो की, या अशा काही विखुरलेल्या एक दोन मालिकांच्या प्रसंगामधल्या मालिकांचा काही परिणाम होतो का? ज्या पद्धतीने अमुक नायिकेचं मंगळसूत्र तमुक नायुकेची कुर्ती अशा फॅशन्स रूढ होतात तसं काही या तथाकथित “सकारात्मक” मालिकांचं होताना दिसत नाही ना. आज आपण सारं त्याचं कौतुक करतो आहोत, अजून काही वर्षांनी विसरूनही जाऊ. मग काय उपेग?

  काही वर्षांपूर्वी अल्फा मराठीवर एक कथांवर आधारित असलेली मालिका पाहिली होती. त्यामध्ये एक नवविवाहित जोडपं त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री एकमेकांच्या जवळ जात सेक्स अनुभवू पाहत आहे, आणि त्याच वेळी नायिकेची आई तिच्या त्या वेळच्या भावना आठवताना दाखवली होती. किमान वीसेक वर्षांपूर्वी नायिकेच्या दृष्टिकोनामधून पहिला सेक्स हा अनुभव अतिशय सुरेख आणि कुठेही बीभत्स न करता दाखवलेला होता. आज मालिकेचं नाव आठवत नाही, पण प्रसंग आठवतात. एक वेगळाच दृष्टिकोन मांडताना कुठंही आक्रस्ताळेपणा न आणता दोन्ही नायिका सामोऱ्या येतात. नुकतीच लग्न झालेली, ठरवून केलेलं लग्न असूनही नवऱ्याला आधीपासून ओळखणारी आणि तिच्याहून किमान दशकं जुनी असणारी तिची आई ज्या वेळी पहिल्या रात्रीचा प्रसंग स्वत:शी आठवते तेव्हाची तिची घालमेल हे खरोखर इतक्या कमी शब्दांमध्ये आणि प्रभावीपणे मांडली होती की, तेव्हा टीनेजर असताना पाहिलेला हा एपिसोड अजून माझ्या लक्षात आहे. यामध्ये स्त्रीच्या दृष्टिकोनामधून पहिल्या शारीरिक संबंधांचा केलेला विचार मी पहिल्यांदा ऐकला होता, त्यानंतर यावर बरंच काही वाचलं, स्वत:च्या कथांमध्ये असे प्रसंगही लिहिले तरीही हा एपिसोड अजूनही लक्षात राहिला आहे. कदाचित त्या वयात तो पूर्ण समजलाही नसेल तरीही, मनावर प्रभाव करून गेला हे निश्चित.

  त्यामुळे किमान अशा दोनतीन मालिका तरी सत्याला धरून समाजाचे हे चित्रण मांडत असतील तरी आपल्याकडे उत्तम कंटेंटसाठी काहीतरी आशा अजूनही शिल्लक आहे असं मी मानेन. कारण, या मालिकेमधला बाबा आज केवळ टीव्हीच्या त्या आडव्या बॉक्समधला काल्पनिक बाबा नाही, तर तुमच्याआमच्या भोवताली वावरणारा खराखुरा बाबा आहे. मुलीची पाळी आल्यावर तिला काय हवं नको ते पाहणारा बाबा. बायको कॉन्फरन्सला गेली, आणि तिचा फोन बंद आहे हे समजून घेऊन तिच्यावर न वैतागणारा बाबा हे सारे आपल्या घरामधले आहेत. नोकरदार महिला असूनही घराकडे नीट लक्ष देणारी, कदाचित त्या क्षणी लेकीसाठी घरी नसणारी, पण तरीही घरी आल्यावर लेकीला जवळ घेणारी आई आपल्या घरातली आहे. अकृत्रिम न जगता येणाऱ्या प्रत्येक दिवसाला समरसून जगणारं कुटुंब हे आपलं आहे. टीनेज मुलीला सांभाळून तिच्यासाठी धडपडणारं घर हे आपलं आहे. पाळी म्हणजे काहीतरी भयंकर लपवण्यासारखं आणि ओशाळण्यासारखं आहे असं न मानता ती आयुष्याची एक पायरी आहे असं मानून चालणारं घर हे तुमचंमाझं आहे. आणि म्हणूनच कदाचित अशा काही मालिका आपल्याला अधिकच जवळच्या वाटू लागतात.

Trending