आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्पदीदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण आणि शहरी भागात सापांबद्दल खूप गैरसमज आहेत. लोकांमधले हे गैरसमज दूर करण्याचा वसाही जिजाऊंच्या गावचा वारसा सांगणाया या कन्येनं घेतला आहे. सापांचे संरक्षण, त्यांचे संवर्धन व सापांवर संशोधन करणं, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापांचे महत्त्व लोकांना सांगणं, सर्पदंशबाधित व्यक्तींना प्रथमोपचार उपलब्ध करून देणं, प्रतिबंधात्मक औषधोपचाराचा सल्ला देण्याचंही काम वनिताताई करीत असतात.


झुरळं, पाली, कीटक वगैरे पाहिल्यावर सहसा प्रतिक्रिया ई... बापरे, असं म्हणत पळून जाणं अशी असती, बायका आणि पुरुष दोघांच्याही. साप म्हटलं तरी अनेकांची भंबेरी उडते, मग तो प्रत्यक्ष पाहायचं धाडसही दाखवणं कठीण होऊन बसतं. पण, काही व्यक्ती अशाही असतात ज्यांना सर्पांबद्दल आकर्षण असतं, प्रेमही असतं आणि त्यांना वाचवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. अशांना सर्पमित्र म्हटलं जातं. पण या सर्पमित्रांमध्ये एखादी सर्पमैत्रीणही असते. वनिता बोराडे त्यांतल्याच एक. त्यांना साप दिसला की, आनंद होतो आणि त्यांचे हात सापाच्या डोक्यावरून प्रेमाने फिरू लागतात. जणू सापाचे व त्यांचे जन्मोजन्मीचे ऋणानुबंध आहेत की काय असे बघणाऱ्याला वाटते.


तसं बघितलं तर साप पकडण्याच्या क्षेत्रात पुरुषांचीच मक्तेदारी आहे. परंतु आता याही क्षेत्रात महिला मागे नाहीत  हे वनिता बोराडे यांनी महत्प्रयासाने सिद्ध केले आहे. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख या गावी झाला. त्यांच्या गावातील आदिवासी शेतकरी नदीकाठावर मासेमारी करत. जाळ्यामध्ये माशांबरोबर कधी सापसुद्धा येत. मासे पकडणारे सापांना हातात धरून पाण्यामध्ये फेकून देत. मासे पकडणाऱ्यांना सापांची भीती वाटत नाही हे बघून एक-दोनदा बालवयात वनिताताईंनी हातात साप धरून पाहिला. सापाबद्दलची भीती दूर झाली. त्यांच्या परिसरात शेतात मोठ्या प्रमाणावर मांडव जातीचे साप निघायचे. हे मांडव जातीचे साप दोन तोंडाचे साप म्हणून लोक ओळखत असत. या सापांबदल अनेक गैरसमज होते. बालवयातच वनिताताईंनी सापांच्या विविध जातींविषयी बराच अभ्यास केला. मग गावोगावी ही लहान मुलगी बघा कशी साप पकडते, अशी चर्चा हाऊ लागली. लोक कुतूहलाने बोलू लागले. ताईंना साप पकडण्यासाठी निमंत्रणं येऊ लागली. एक मुलगी साप पकडते म्हटल्यावर लोकांच्याही मनातील सापांबद्दलचे गैरसमज हळूहळू दूर होऊ लागले. 


दहावीपर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर वनिताताईंचा भास्कर डवंगे यांच्यासोबत विवाह झाला. विवाहानंतर त्या काही वर्षं नाशिकला राहिल्या. तेथे त्यांनी आठ मार्च २००० रोजी सर्पसंस्था, नाशिक ही संस्था काढली. पर्यावरणाचे अनेक उपक्रम त्यांनी तिथे राबवले. पुढे घरगुती कारणास्तव बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर  गावात त्या परत आल्या. गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून वनिताताई सर्पमित्र म्हणून काम करतात. आता त्यांचे दोन मुलगे आणि एक मुलगी, व त्यांचे पतीसुद्धा या कामात त्यांना मदत करतात. वनिताताईंनी आतापर्यंत ५० हजारापेक्षा जास्त सापांना जीवदान दिले आहे. अनेक वर्षांपासून त्या सफाईदारपणे साप पकडतात. जणू त्या दिसल्या म्हणजे साप त्यांच्यासमोर शरणागती पत्करतो की काय, असं वाटतं. 


भारतात सापांच्या अनेक जाती आहेत पण त्यातल्या फार थोड्या जाती विषारी आहेत, बाकी बहुतेक जाती बिनविषारी आहेत. वनिताताईंच्या मते महाराष्ट्रात ५२ जातीचे साप आढळतात. त्यातील १२ जातीचे साप विषारी व ४० जातींचे साप बिनविषारी आहेत. घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार हे सर्वात जास्त विषारी आहेत.


विषारी साप ओळखायचा कसा? बिनविषारी साप ओळखायचा कसा? याबद्दलची जनजागृती करून वनिताताई पकडलेले साप वनविभागाच्या स्वाधीन करतात किंवा दूर जंगलामध्ये सोडून देतात. आजही साप दिसला की काही लोक त्यांना मारून टाकतात. साप हा विषारीच प्राणी आहे, तो आपल्याला चावणारच, असे अनेकांना वाटत असते. सापाबद्दलच्या अंधश्रद्धा दूर व्हाव्यात यासाठी वनिताताईंचा जनजागृती करण्यावर भर असतो. त्या साप पकडतात आणि ग्रामस्थांना सापाबद्दलची सविस्तर माहिती देऊन साप आपला शत्रू नाही, असं आवर्जून समजावतात. साप शेतकऱ्यांंचा मित्र आहे, शेतामध्ये साप उंदीर, घुशी, पाली, सरडे, किडे खाण्यासाठी येतो. परिणामी शेतीला त्याचा लाभ होतो. परंतु साप दिसला की, अनेकांच्या मनामध्ये भीती उभी राहते आणि या भीतीपोटीच काही अतिउत्साही सापाला मारून टाकतात.


सापांचे संरक्षण, त्यांचे संवर्धन व सापांवर संशोधन करण्यासाठी, सापाविषयीचे गैरसमज दूर करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सापांचे महत्त्व लोकांना सांगणे, सर्पदंशबाधित व्यक्तींना प्रथमोपचार उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक औषधोपचाराचा सल्ला देण्याचेही काम वनिताताई करीत असतात. वनिताताईंच्या या सर्पप्रेमाची महती कळल्यानंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. तसेच समाजसुधारक डॉ. प्रकाश आमटे यांनीसुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. अनेक छोटे-मोठे पुरस्कार तथा मानसन्मान वनिताताईंना मिळाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सापांबद्दलचे प्रेम असेच जिवंत राहून पर्यावरण रक्षणासाठी आपल्या आयुष्य खर्ची व्हावं असं वनिताताईंना वाटत असते.


नागपंचमीला अनेक गारुडी ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या गरीब जनतेला लुबाडतात. सापाबद्दलची अंधश्रद्धा पसरतात व साप दूध पितो, सापाला दूध पाजा, त्याची पूजा करा असे सांगून ही देवता आहे ही तुमचे भले करील, त्यासाठी दानधर्म करा, असं म्हणून अनेक लोक भीतीपोटी पैसे देतात. नागपंचमीला पूजा करण्यासाठी अनेक लोक साप पकडतात. काहींच्या कुंडलीत नागबळी आहे, त्याची शांती सांगितली जाते. मुळात साप हा मांसाहारी प्राणी आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. ते नागपंचमीला नागाची पूजा करताना त्याला दूध, लाह्या, फुटाणे, नारळ, पेढे देतात. गारुडी सापांना उपाशी ठेवतात. सापांचे वेळोवेळी प्रदर्शन करताना त्यांना इजा करतात. त्यांना बरण्यांमध्ये बंद करून ठेवतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर साप मरून जातात. कधी विषारी साप ओळखता न आल्यामुळेसुद्धा मोठे अपघात होतात. अशा सापांबद्दलची जनजागृती करण्याचा वसा या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात, एका सावित्रीच्या लेकीने सापाच्या बाबतीत प्रबोधनाची व संवर्धनाची जी मोहीम सुरू केली आहे तिच्या धाडस आणि जिद्दीच्या कार्याला आपण सलाम केला पाहिजे. सापाबद्दलची जिज्ञासा समजून घेऊन, सापाबद्दलचे गैरसमज दूर करू या आणि शक्य असेल तर आपल्याही घरातील स्त्रीवर्गाला वनिताताईंसारखी जिगरबाज सर्पमित्र किंवा सर्पदीदी बनण्यासाठी प्रोत्साहन देऊ या.

- नरेंद्र लांजेवार, बुलडाणा
l_narendra2001@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...