आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गलितगात्र' राणेंना भाजपचा ऑक्सिजन 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : दोन वर्षांपूर्वी काँग्रेसला साेडचिठ्ठी दिल्यानंतर १ ऑक्टोबर २०१७ ला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, 'मी दुकान उघडले असून जो ग्राहक येईल त्याला माल विकेन..' आणि भाजपला पाठिंबा दिला. भाजपने त्यांना राज्यसभेवरही पाठवले, परंतु राणे यांचा पक्ष अबाधित होता. आता मात्र दोन वर्षांतच त्यांनी आपले दुकान गुंडाळून भाजपच्या मॉलमध्ये विलीन करून टाकले. येत्या १ सप्टेंबर राेजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. २०१४ मध्ये विधानसभा व पाेटनिवडणुकीत सहा महिन्यांत दाेन वेळा पराभूत झालेले राणे, लाेकसभा निवडणुकीत सलग दाेन टर्म मुलाच्या पराभवाची नामुष्की सहन करावे लागलेले राणेंचे राजकीय करिअर संपल्यात जमा हाेते. मात्र भाजपने आधी खासदारकी देऊन व नंतर थेट पक्षात प्रवेश करण्याची संधी देऊन त्यांना एक प्रकारे 'राजकीय जीवदान' दिल्याचीच चर्चा आहे. 


राणेंच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र आता राणेंच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला या भागात ताकद वाढण्याची आशा आहे. या जिल्ह्यात विधानसभेच्या तीन जागा आहेत. राणे यांचे येथे अजूनही बऱ्यापैकी सामर्थ्य आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी 'स्वाभिमान'च्या माध्यमातून युतीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे केले असते तर चुरशीची लढत झाली असती. परंतु आता राणेंच पक्षात आल्यामुळे या तीनही जागा युतीच्या पारड्यात पडतील, यात शंका नाही. 


नारायण राणे यांना सध्या स्वत:पेक्षा मुलांच्या भवितव्याची चिंता अाहे. त्यांचे पुत्र डाॅ. नीलेश हे २०१४ व २०१९ या दाेन्ही लाेकसभा निवडणुकांत सिंधुदुर्गमधून पराभूत झाले. दुसरा मुलगा नितेश सध्या काॅंग्रेसतर्फे आमदार आहे, मात्र आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर ते निवडून येतील का, याविषयीही शंका उपस्थित केली जात आहे. या अडचणीच्या काळात व वारसदारांचे पुनर्वसन करण्यासाठी राणेेंनी 'कमळ' हाती धरल्याचा निर्णय घेतला आहे. 


राणे तुमचे, भुजबळ आमचे 
'राणे तुमचे तर भुजबळ आमचे' असा सेना-भाजपत फाॅर्म्युला ठरल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच राणेंच्या भाजप प्रवेशाला सेनेकडून विराेध झाला नसल्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेतील अनेक नेते भुजबळांना पक्षात घेण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी तसे उद्धव ठाकरे यांनाही कळवले आहे. त्यामुळे आता भुजबळांना पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत ठाकरेच संभ्रमात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी 'भुजबळांना नाे एंट्री' असे सांगितले हाेते. 


मुख्यमंत्र्यांनी घातली उद्धव ठाकरेंची 'समजूत' 
नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप अध्यक्ष अमित शहा आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली होती. त्या वेळी या दोघांनीही त्यांना भाजपमध्ये प्रवेशाची ग्वाही दिली हाेती, मात्र तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे 'ना हरकत' घ्यावी लागेल, अशी अट घातली हाेती. दुसरीकडे शिवसेनेतूनही राणेंच्या भाजप प्रवेशाला विराेध हाेत हाेता. उद्धव ठाकरे यांची नाराजी अाेढवून युतीत वितुष्ट नकाे, म्हणून राणे यांना भाजपमध्ये घेण्यास मुख्यमंत्री तयार नव्हते. याच कारणावरून त्यांनी राणे यांच्या आत्मचरित्र प्रकाशनालाही हजेरी लावली नव्हती. परंतु काही दिवसांत 'वातावरण' बदलल्याने आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची 'समजूत' घातल्याची माहिती आहे. त्यामुळेच राणेंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे सांगितले जाते. 

बातम्या आणखी आहेत...