आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Narayan Rane's BJP's Entry Stops Because Of Malvan; Shiv Sena's Opposition Also Obstructed

नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचं घोडं अडलंय मालवणच्याच जागेवर; शिवसेेनेच्या विराेधाचाही अडसर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी एकाच पक्षात असलेले नारायण राणे व राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून चार हात दूर आहेत. - Divya Marathi
एकेकाळी एकाच पक्षात असलेले नारायण राणे व राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंपासून चार हात दूर आहेत.

विवेक ताम्हणकर 

रायगड - कोकणच्या राजकीय पटलावर एक काळ असा होता की नारायण राणे म्हणजे शिवसेना. मात्र राणेंनी जसजसे पक्ष बदलले तशी परिस्थितीही बदलली. आज राणे भाजपात जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत. मात्र भाजपश्रेष्ठी काही त्यांना प्रतिसाद देत नाही. शिवसेनेच्या विराेधामुळे राणेंचा भाजप प्रवेश रखडल्याचे सांगितले जात असले तरी मालवण मतदारसंघावरील त्यांचा दावा हेही एक कारण आहे.

मालवण- कुडाळ हा राणेंचा पारंपरिक मतदारसंघ. १९९० मध्ये प्रथम ते इथून शिवसेनेचे आमदार झाले. २०१४ मध्ये मात्र शिवसेनेच्या वैभव नाईकांनी त्यांचा पराभव केला आणि इथूनच राणेंच्या वर्चस्वाला आेहाेटी लागली. दुसरीकडे राणेंचे पुत्र नितेश हे मात्र कणकवली- देवगड मतदारसंघातून काँग्रेसतर्फे निवडून आले. हा मतदारसंघ भाजपला बालेकिल्ला समजला जायचा. तिथे राणेंनी वर्चस्व मिळवले. सध्या राणे भाजपच्या मदतीने राज्यसभेवर गेलेले आहेत. ते आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपत विलीन करण्यास तयार आहेत. त्या बदल्यात त्यांना कणकवली व मालवण हे दाेन मतदारसंघ हवे आहेत. तसेच राज्यात शिवसेना- भाजपची युती झालीच तर या दाेन जागांसाठी राणेंना इतर मतदारसंघात शिवसेनेचा प्रचार करावा लागेल. आणि राणे त्यासाठी तयार हाेणार नाहीत. याचे कारण म्हणजे गेल्या वेळी ज्या वैभव नाईकांनी पराभव केला त्यांचा प्रचार राणे कसे करणार? तसेच राणेंचे कट्टर विराेधक असलेले शिवसेनेेचे मंत्री दीपक केसरकर हे सावंतवाडीतून उमेदवारी करतात. त्यांच्याही प्रचाराला राणे जाणार नाहीत.

रत्नागिरीतील गुहागर मतदारसंघातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे भास्कर जाधव भाजपच्या विजय नातूंचा पराभव करुन विजयी झाले हाेते. जाधव आता शिवसेनेत गेलेत. रत्नागिरीत भाजपच्या बाळ मानेंचा पराभव करणारे उदय सामंत शिवसेनेचे उमेदवार असतील. 

सध्या पनवेलची जागा सोडली तर भाजपकडे कोकणात एकही आमदार नाही. त्यामुळे राणेंच्या रूपाने कोकणात शिरकाव करण्याचे भाजपचेही धोरण आहे. सुरुवातीला विराेध करणाऱ्या काेकणातील भाजपच्या नेत्यांनीही आता राणेंना स्वीकारण्याची मानसिकता केलेली दिसते. जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पक्षातील वरिष्ठांचा आदेश मानू आणि राणेंना भाजपच्या मुशीत तयार करू, असे सांगतात, तर सावंतवाडीच्या जागेवर नजर असलेले राजन तेली हे राणे भाजपत येणे कसे फायद्याचे आहे, असे सांगत आहेत.
 

राणेंना हवी अशी डील : दाेन जागा साेडल्यास भाजपला काेकणात सर्वत्र मदत
सलग दाेन लाेकसभा निवडणुकीत राणेंचे ज्येष्ठ पुत्र नीलेश यांचा सिंधुदुर्गमधून पराभव झालेला आहे. या पराभवाचे त्यांच्या काैटुंबिक संबंधावरही परिणाम झाल्याचे राणेंचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळे आता नीलेश यांचे पुनर्वसन करणे याला नारायण राणेंचे प्राधान्य आहे. त्यासाठी त्यांना मालवण विधानसभा मतदारसंघ हवा आहे, तर कणकवलीवर विद्यमान आमदार नितेश यांचा दावा आहे. या दाेन जागांच्या बदल्यात काेकणात इतर मतदारसंघात सर्वताेपरी मदत करण्याचा शब्द राणेंनी भाजपला दिल्याची माहिती आहे. मात्र युती झाल्यास एकापेक्षा जास्त जागा राणेंना मिळण्याची शाश्वती नाही.

राणे भाजपत गेले तर...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, जिल्हा बँकेवर सध्या राणेंचे वर्चस्व आहे. राणे भाजपत गेले तर सिंधुदुर्गात गावागावात कमळ फुलेल. शिवसेनेला शह देणेही भाजपला शक्य हाेईल. मात्र राणे आल्यास भाजपच्या स्थानिक नेत्यांचे महत्त्व कमी हाेईल. अतुल रावराणे, संदेश पारकर हे निवडणूक लढवू इच्छिणारे नेते मागे पडतील.
 

समर्थकांनाही आमदारकीची स्वप्ने
राणेंच्या अनेक समर्थकांनाहीआता आमदारकीची स्वप्ने पडू लागलीत. त्यांचे समाधान करण्याचे आव्हान राणेंसमाेर असेल. राणेंचा भाजपप्रवेश झाला नाही तरी एनडीएत असल्याने कणकवलीची जागा त्यांना भाजप देईल. सावंतवाडी, मालवण येथे राणेंचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील. राणे त्यांना छुपी मदत करू शकतील.