आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद : नारेगाव कचरा नियोजनाचाही मनपाकडून कचरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 औरंगाबाद शहराची कचरा'कोंडी' करणाऱ्या नारेगावच्या २५ लाख टन कचऱ्यावर बायो मायनिंग प्रक्रिया सुरू करण्यासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, निविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी मार्च महिना उजाडणार असून २५ लाख टन कचरा नष्ट करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे, तर येत्या ३१ मार्चपर्यंत नारेगावातील कचरा नष्ट करू, असे शपथपत्र महापालिकेने खंडपीठात दिले अाहे. दरम्यान, शपथपत्राप्रमाणे महापालिकेने दिलेल्या मुदतीत कचरा नष्ट केला नाही तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.


१६ फेब्रुवारीपासून नारेगावकरांनी शहराची कचरा कोंडी केली. गुरुवारी कचरा कोंडीचा २६९ वा दिवस होता. शुक्रवारी बरोबर ९ महिने पूर्ण होताहेत. या ९ महिन्यांत महापालिकेने दररोज निर्माण होणाऱ्या साडेचारशे टन कचऱ्याचे काय करायचे, यावरच भर दिला. राज्य शासनाने कचरा कोंडी सोडण्यासाठी जे ८३ कोटी रुपये दिले होते त्यात नारेगावच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून तो नष्ट करण्याच्या कामाचाही समावेश होता. परंतु प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव, नक्षत्रवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकडेच त्यांनी लक्ष दिले.


समांतर प्रक्रिया चालवली नाही
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच नारेगाव डेपोतील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यासाठी समांतर पातळीवर प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते. परंतु तसे झाले नाही. शहरातील दैनंदिन कचरा कोठे टाकता येईल आणि त्यावर प्रक्रिया लवकरात लवकर कशी सुरू करता येईल, हेच महापौर नंदकुमार घोडेले यांचे एकच लक्ष्य होते. मे महिन्यात रुजू झालेले आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यासमोरही तोच प्रश्न होता. त्यामुळे प्रशासनाने ओघानेच नव्या कचऱ्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे हर्सूल, नारेगाव व पडेगाव येथे तात्पुरते तसेच दीर्घकालीन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यावर त्यांचा भर राहिला. निविदा काढताना तसेच नियोजन करतानाही प्राधान्य अर्थात दैनंदिन कचऱ्याला होता.


१ एप्रिलनंतर अवमान याचिकेच्या तयारीत नारेगावकर; प्रक्रियेनंतर ४० एकर जागा मोकळी
नोव्हेंबर महिनाअखेरीस निविदा निघाल्यास
निविदेचा कालावधी हा किमान ४५ दिवसांचा असतो. म्हणजेच पुढील दीड महिना अर्थात १ जानेवारीपर्यंत या कामाचा ठेकेदार नक्की होऊ शकत नाही. जास्त ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेकेदार नक्की झाला तर त्याला कार्यादेश देण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात काम सुरू होण्याची शक्यता नाही. सर्व काही प्रशासनाच्या मनासारखे झाले तर मार्च महिन्याच्या प्रारंभी येथील काम सुरू होऊ शकते.


न्यायालयात दिलेले शपथपत्र, वस्तुस्थिती
बायोगॅस प्लँट उभारणी- ३१ डिसेंबर २०१८- नुकताच ठेकेदार निश्चित झाला.
मध्यवर्ती प्रक्रिया प्रकल्प- ३१ मार्च- २०१९- काम सुरू आहे.
नारेगाव येथील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने संपवणे- ३१ मार्च २०१९
इंदूरचा आदर्श : २५ लाख टन कचरा नष्ट करण्यासाठी किमान दीड वर्ष तरी लागणार हे निश्चित आहे. कारण ज्या इंदूरचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे. तेथील कचऱ्याचे मायनिंग अजून संपलेले नाही. आपल्या मनपाचा इतिहास लक्षात घेता येथे किमान तीन वर्षे लागू शकतील. थोडक्यात कोणत्याही परिस्थितीत महापालिका न्यायालयात दिलेला शब्द पाळू शकत नाही हे स्पष्ट होते.


प्रक्रिया नेमकी कशी होणार?
येथील कचऱ्यातील प्लास्टिक, काच, इतर घटक बाहेर काढले जातील. कंपोस्ट होणाऱ्या कचऱ्यापासून खत केले जाईल. अन्य कचऱ्यावर तेथे किंवा बाहेर नेऊन प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर ४० एकरची ही जागा मोकळी होईल.


काय आहेत अडचणी
३१ मार्चपर्यंत नारेगाव येथील कचरा संपुष्टात आलेला असेल, असे शपथपत्र देणाऱ्या महापालिकेने प्रत्यक्षात आता निविदा काढायचे ठरवले आहे. या आठवड्यात दोन दिवस आयुक्त सिटी बस पाहण्यासाठी कर्नाटकातील धारवाड येथे गेले होते. ते परतल्यानंतर येथील कचरा बायो मायनिंग करून नष्ट करण्याच्या कामाची निविदा जारी होऊ शकेल.त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास मार्च महिना उजाडेल.


आम्हाला ३१ मार्चची प्रतीक्षा
मनपाने येथे कचरा टाकणे बंद केलेय. मात्र, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. आम्ही ३१ मार्चची प्रतीक्षा करतोय. त्यानंतर पुढील लढाई सुरू होईल. डॉ. विजय डंख, रहिवासी, नारेगाव


लवकरच काम सुरू होईल
शहरातील दैनंदिन कचऱ्याला प्राधान्य होते हे खरे असले तरी आम्ही नारेगावकडे मुळीच दुर्लक्ष केलेले नाही. विलंब झाला हे मान्य, पण प्रक्रिया सुरू आहे. लवकरच काम सुरू होईल. नंदकुमार घोडेले, महापौर.


मुदतीच्या आधीच काम करू
३१ मार्च २०१९ पर्यंत नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचे काम सुरू होईल, असे आम्ही न्यायालयात म्हटले आहे. त्याआधीच काम सुरू होईल. नंदकुमार भोंबे, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख

बातम्या आणखी आहेत...