आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मोहल्ला अस्सी'चं राजकीय रामायण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जो सिनेमा २०१५ मध्येच तयार होता, ज्या सिनेमाला २०१७मध्येच सेन्सॉरचं प्रमाणपत्र मिळालं होतं आणि जो ‘लीक’ होऊन कधीचाच व्हायरल झाला  होता, तो चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित "मोहल्ला अस्सी' देशात राम मंदिर निर्माणाचा माहोल तयार होत असताना प्रदर्शित व्हावा, हा योगायोग नक्कीच नाही. मूळ कादंबरी राम मंदिर निर्माणाविरोधातला मतप्रवाह पुढे आणत असताना सिनेमा मात्र राम मंदिराच्या बाजूने मांडणी करणारा असावा हाही योगयोग नक्कीच नाही. धर्म, राजकारण आणि व्यवसाय यातले अंत:प्रवाह टिपणारा हा समयोचित लेख...

 

देशात पुन्हा एकदा आक्रमकपणे "चलो अयोध्या' हा नारा दिला जात असताना "मोहल्ला अस्सी' हा  सिनेमा प्रदर्शित होणं हा योगायोग नक्कीच नाही.  खरं तर सेन्सॉरच्या कात्रीत अडकलेला हा सिनेमा २०१५ लाच वेगवेगळ्या टोरंट साइट आणि यूट्यूबवर लीक झाला होता. डिसेंबर २०१७ मध्ये या सिनेमाला सेन्सॉरचं "ए' सर्टिफिकेट मिळालं होतं. त्यानंतरही जवळपास वर्षभर हा सिनेमा डब्यात पडून होता. दुनियेनं आधीच पाहून झालेला हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित होणार नाही, असंच सर्वांना वाटत होतं. पण  न्यायालयीन प्रक्रियांनी राम मंदिर निर्माण मुद्द्याला हवा दिली. राजकीय वक्तव्यांना उधाण आलं. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर नेहमीच भाजपवर रुसलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी राम मंदिरासाठी थेट अयोध्या गाठण्याची तयारी केली आणि त्याच दिवशी विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत भव्य सभेचाही घाट घातला.


या सर्व राजकीय घडामोडींच्या आठवडाभर आधी "मोहल्ला अस्सी' ज्यात राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख आहे हा सिनेमा प्रदर्शित होणं ही गोष्ट नक्कीच योगायोगाची बाब नाही. दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी चाणक्यनीतीचा वापर करून सिनेमा प्रदर्शित केला आहे.   उत्तर प्रदेशात "मोहल्ला' पाहण्यासाठी सोशल मीडियावरून एक मोठी मोहीम राबवण्यात आली. अनेकांनी फेसबुक लाइव्ह केलं. ट्विटरवरून ट्रेंड सुरू केला. "मोहल्ला अस्सी' पाहायलाच हवा, असा आग्रह यातून लावून धरण्यात आलाय. 


 मोहल्ला अस्सी हा सिनेमा प्रसिद्ध हिंदी साहित्यिक काशीनाथ सिंह यांच्या "काशी का अस्सी' या कादंबरीवर आधारित आहे. १९८८ ते १९९८ या दशकात वाराणसीत झालेल्या बदलांचा वेध ही कादंबरी घेते. हे बदल प्रामुख्यानं सामाजिक आणि राजकीय स्वरूपाचे आहेत. जागतिकीकरणाची सुरुवात होत असताना मंडल आयोगानं देशाला कसं सामाजिक संघर्षात लोटलं याची झडझडून चर्चा लेखक काशीनाथ सिंह यांनी आपल्या या पुस्तकात केली आहे. त्याच वेळी भारतीय अध्यात्माचं परदेशी नागरिकांना लागलेलं अवाजवी वेड, वाराणसीत वाढत चाललेली त्यांची संख्या आणि त्यातून निर्माण झालेला वाराणसीतला आर्थिक संघर्ष, हा मुख्यत: या कादंबरीचा गाभा आहे. हा आर्थिक संघर्ष इथल्या सवर्ण अर्थात ब्राह्मण समाजाचा आहे. 
मूळ कादंबरी आणि सिनेमा यात महत्अंतर आहे. कादंबरीत राम मंदिर आंदोलनाचा उल्लेख काही परिच्छेदांपुरता  मर्यादित आहे. पण सिनेमात राम मंदिर मुद्द्याला जास्त जागा मिळालीय. त्यामुळे कादंबरीत अगदी छोटा असलेला हा भाग सिनेमात भडक  स्वरूपात पेश होतो आणि डायलॉगबाजीला उधाण येतं.


पप्पू की दुकान "काशी का अस्सी'तलं राजकीय चर्चा करण्याचं हक्काचं ठिकाण आहे. इथं चहा पिताना आणि भांगेचे सुट्टे मारताना देशाच्या राजकारणावर जोरदार चर्चा झडते. मंडल आयोगामुळे इथला बहुसंख्य ब्राह्मण समाज अस्वस्थ आहे. आरक्षणानं इथलं सर्व वातावरण ढवळून निघालंय. त्याच वेळी आलेला राम मंदिर जन्मभूमीच्या आंदोलनानं चर्चेचा नूर बदलतो, पण तो जास्त काळ टिकत नाही.

 

चौथीराम, तन्नी गुरू, बर्फीवाले सीताराम, रामवचन पांडे, वीरेंद्र श्रीवास्तव, हरिद्वार अशा या पात्रांमध्ये खास बनारसी शैलीत मंडल आयोगाला टार्गेट करताना, टोकाचे वाद होतात. हमरी-तुमरीची वेळही येते,पण सर्व काही त्याच वेगानं शांतही होतं.  खरं तर पप्पू की दुकान हा राजकीय चर्चेचा आखाडा आहे. देशात संसद दोन ठिकाणी भरते,एक दिल्लीत आणि दुसरी ‘अस्सी’त पप्पू की दुकान पर असं काशीनाथ सिंह लिहितात आणि त्याच वेळी घोषितही करतात की, या देशात जर कुठे लोकशाही असेल तर ती फक्त ‘पप्पू की चाय की दुकान’वर आहे. 

 

‘देख तमाशा लकडी का’ या कादंबरीच्या अगदी पहिल्या भागात राम मंदिर आंदोलना संदर्भातल्या चर्चेचे काही प्रसंग आहेत. ‘हर हर महादेव’च्या नामघोषात दुमदुमणाऱ्या या शहरात अचानक ‘जय श्रीराम’च्या घोषणा होऊ लागतात. पप्पू की दुकानवर चहा आणि भांगेची मागणी वाढते. कादंबरीत काशीनाथ सिंग यांनी म्हटलंय की, ‘अस्सी’चे सर्व आदिवासी रामभक्त झाले आणि कारसेवा तयारीला लागले. रामवचन पांडे आणि हरिद्वार या दोन पात्रांमध्ये कारसेवा करण्यासाठी अयोध्येत जायचं की नाही, असा हा प्रसंग आहे. हरिद्वारच्या या प्रश्नावर रामवचन पांडे अगदी साधा सिद्धांत मांडतात. कारसेवेसाठी अयोध्येत जाण्याची गरज नाही, जेव्हा दीड-दोन कोटी लोक “जय श्रीराम’चा नारा देतील तेव्हा, आपल्या मुखातून आपसुकच “जय श्रीराम’ची घोषणा निघेल, तिथं अश्रुधूर, लाठीचार्ज आणि गोळीबार सुरू होईल, तेव्हा  तेव्हा सर्व रामभक्त भारतीय जनता वाटू लागतील आणि डोक्यावर दोन-चार लाठ्या पडल्यावर आपण धर्मनिरपेक्ष होऊ. यामुळेच वाराणसीतूनच कारसेवा करू, असा हा सिद्धांत. जेव्हा वाराणसीत साखरेचे भाव वाढले, तेव्हा आज ओरडणारे कुणीही रस्त्यावर का नाही उतरलं, असा कारसेवकांना खडा सवाल रामवचन पांडे करतात. 

 

राम मंदिराविरोधातला स्वर ‘काशी का अस्सी’ कादंबरीत जास्त तीव्र आहे. मात्र, सिनेमात तसं नाही. सिनेमाचं कथानक ‘पांडे कौन कुमति तोहें लागी’ या कादंबरीतल्या अगदी छोट्या भागावर आधारित आहे. संस्कृत पंडित असलेला पांडेय धर्मनाथ शास्त्री हा या भागाचा हीरो. अख्खा सिनेमा या धर्मनाथ पांडेभोवती फिरतो. राम मंदिराची ही चर्चा ही धर्मनाथ पांडे करतो, अयोध्येत जातो. कादंबरीत तसं काहीच घडत नाही. तिथं धर्मनाथ शास्त्रीच्या प्रसंगात राम मंदिराचा उल्लेखच नाही. 


सिनेमात राम मंदिराची चर्चा प्रामुख्यानं दोन ठिकाणी होते. पहिली  पप्पू की चाय की दुकान वर, जिथं  मंदिर श्रद्धेनं बनतं, असं धर्मनाथ गयासिंगला ठणकावून सांगतात, देशभरातून विटा आणून अयोध्येत मंदिर बनवण्याची गयासिंग टर खेचत असतात. आणि दुसऱ्यांना धर्मनाथ आपल्या पत्नीसमोर अयोध्येत कारसेवेसाठी जाण्याची घोषणा करतो, तेव्हा. राम मंदिर निर्माण हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्याविषयी कुठलाही समझोता करणार नाही, असे स्पष्टपणे पत्नी सरिताला तो सांगतो आणि कारसेवेत सहभागी होतो.  राम मंदिर निर्माणाचा मुद्दा अस्सी घाटावरून पप्पू की दुकानवर आणि तिथून थेट ब्राह्मण समाजाच्या घरात येतो. वाद होतात. कादंबरीतली पात्रं पुढे पप्पू की दुकानवर रामजन्मभूमी आणि शिलापूजनाला तमाशा  म्हणतात. आज कहेंगे की अयोध्या में मंदिर बनाएंगे और कल कहेंगे हम कोर्ट को नही मानते, साले कोई दिन-इमान है क्या नही... अशी त्यांची टरही उडवतात. हा भाग सिनेमात नाही. राजकिशोर वीरेंद्र नावाचं पात्र भाजपच्या राजकीय मनसुब्यांवर भाष्य करतं - और कहते हो राजतिलक की तैयारी करों,आ रहें है अटल बिहारी,  राजतिलक राजतंत्र में होता है,लोकतंत्र में नहीं, तुम्हारे दिमाग में आज भी राजतंत्र है...अशी थेट मंदिर निर्माणावर डावी भूमिका घेणारी दृश्ये आणि पात्रे सिनेमातून गायब झालीत. चंद्रप्रकाश द्विवेदींनी सत्ताधार्जिणी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेतलीय...

 

सिनेमाचा सूर कडवा...
सिनेमातला मंदिर निर्माणाचा काशीतला संघर्ष जेवढा भडक दाखवला गेलाय, तेवढा तो कादंबरीत नाही. यावर लेखक  काशिनाथ सिंह सांगतात की “पहिली गोष्ट, कादंबरीत राम मंदिराचा उल्लेख आहे, पण तिथलं आंदोलन नाही. दुसरी गोष्ट, आता राम मंदिरावर वातावरण तापलेलं असताना हा सिनेमा येणं हा योगायोग मानायला हरकत नाही. निर्माता आणि दिग्दर्शकाची विचारशैली वेगळी असू शकते.  कादंबरी लेखकाची असते आणि सिनेमा दिग्दर्शकाचा असतो. यामुळं सिनेमाची तुलना कादंबरीशी केली गेली, तर त्यात खूप फरक तुम्हाला दिसेल. कादंबरीत राम मंदिराच्या विरोधातला स्वर कडवा आहे. तिथली पात्रं मंदिर निर्माणाच्या विरोधात बोलतात. अनेक जण तर प्रखरपणे आपलं म्हणणं मांडतात. जोरदार टीका करतात. पण सिनेमात हे असं घडलेलं नाही. 

 

नरेंद्र बंडबे 

narendrabandabe@gmail.com

 

 

बातम्या आणखी आहेत...