आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर सिनेमांचे दक्षिणायन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रेन्च आणि जपानमध्ये ज्या काळात समांतर सिनेमांची एक नवीन लाट निर्माण झाली त्या काळात भारतीय सिनेमाही मागे नव्हता. समांतर सिनेमा हे एकप्रकारे व्यवस्थेविरुद्धचे आंदोलन होते. सामाजिक-राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्ध जगभरात समांतर सिनेमाने एल्गार पुकारला होता. हा काळ होता १९६० ते ७० दरम्यानचा... बासू चॅटर्जी, मृणाल सेन आणि मणी कौल यांचे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील पहिले म्हणता येईल असे तीन समांतर सिनेमा १९५९ साली प्रदर्शित झाले. समांतर सिनेमाच्या ५० वर्षांच्या या वाटचालीकडे पाहिल्यानंतर सत्यजित रे, मृणाल सेन, ऋत्विक घटक यांच्या बंगाली सिनेमाचे प्रभुत्वच ठळकपणे दिसते. मात्र बंगालप्रमाणेच दक्षिणेकडेही ही चळवळ उभी राहत होती. सदर लेखात म्हणूनच दक्षिणेकडच्या या समांतर सिनेमाचा आढावा घेण्यात आला आहे.
 

 

भारतीय सिनेमा क्षेत्रात १९६० च्या आसपास दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. प्रसिध्द बंगाली सिने-दिग्दर्शक सत्यजित रे यांनी स्थापन केलेल्या फिल्म सोसायटी चळवळीनं पुढचं पाऊल टाकलं. बॉम्बे (आत्ताची मुंबई), कोलकाता, मद्रास (आत्ताचं चेन्न‌ई) आणि पाटना इथल्या सर्व फिल्म सोसायटींना एका छत्रछायेत आणत 'फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया'ची स्थापना झाली... हे वर्ष होतं १९५९. त्याच्या अगदी पुढच्या वर्षी म्हणजे १९६० ला "फिल्म एन्ड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया'ची स्थापना दिल्लीत झाली. या दोन्ही गोष्टी भारतीय सिनेमा क्षेत्रातल्या क्रांतीकारक घटना म्हणाव्या लागतील. फिल्म सोसायट्यांमुळं सिनेमा महत्वाच्या शहरांच्या मार्गे गावाखेड्यात पोचला. एफटीआयआयमुळं सिनेमा निर्मितीच्या शास्रशुध्द शिक्षणाची सोय झाली. इथं तयार झालेले हे दिग्दर्शक नवा सिनेमा घेऊन आपापल्या राज्यात गेले. तिथं त्यांनी फिल्म सोसायटींच्या माध्यमातून आपला सिनेमा रुजवायला सुरुवात केली. याचं उदाहरण द्यायचं झालं तर केरळ आणि तिथल्या मल्याळम सिनेमाचं देता येईल. 


केरळात एफटीआयआयच्या माध्यमातून तयार झालेल्या अदूर गोपालकृष्णन, गिरीश कासारवल्ली, शाजी करुण सारख्या दिग्दर्शकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. इथं आधी फिल्म सोसायटीच्या माध्यमातून प्रेक्षक तयार करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर त्याअनुषंंगानं सिनेमाच्या निर्मितीकडे सिनेमा दिग्दर्शक वळले. ७० च्या दशकात तयार झालेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसारणाचा पुरेपुर फायदा उचलत या दिग्दर्शकांनी नव्या विषयांचा कलात्मक सिनेमा तयार केला. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला हे विशेष.


७० च्या दशकात केरळात जवळपास चार पध्दतीचा सिनेमा प्रचलित होता. अदूर गोपालकृष्णन, जी अरविंदन, शाजी करुण यांचा परिपूर्ण आर्ट सिनेमा,के पी कुमारन आणि के. जी जॉर्ज आदि दिग्दर्शकांचा आर्ट आणि कमर्शियल सिनेमांच्या मध्य रेषेवर उभा ठाकलेला मिड लाईन आर्ट सिनेमा (हा प्रकार फार कमी कालावधीसाठी प्रचलित होता), भारतन आणि पी पद्मराजन यांचा परिपूर्ण कमर्शियल पण कलात्मक बाजू वरचढ असलेला सिनेमा, सर्वात शेवटी चौथा म्हणजे सिध्दीक लाल आणि पुढे प्रियदर्शनचा फुल्ल टू एंटरटेनमेन्ट असलेला सिनेमा. ही अशी चौफेर स्पर्धा असल्यानं समांतर सिनेमा केरळात वाढीस लागण्यासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा मार्ग तयार व्हावा लागला. 


हे समजावून सांगण्यासाठी अदूर गोपालकृष्णन यांचा पहिला सिनेमा स्वयंवरम (१९७२) हे चांगलं उदाहरण आहे. त्यावेळी फक्त अडीच लाख बजेट असलेल्या या सिनेमावर पैसे लावायला कोण तयार होत नव्हतं. अखेर अनेक डॉक्युमेन्ट्रीमधून मिळालेले स्वत:च्या खिशातले एक लाख आणि फिल्म डिव्हिजनकडून मिळालेलं दीड लाखाचं अर्थसहाय्य यातून स्वयंमवरम तयार झाला. हा सिनेमा वितरित ही त्यांनी स्वत:च केला. कुठला थिएटरवाला तो लावायला तयार नव्हता. अखेर जुगाडनं सिनेमा थिएटरमध्ये लागला खरा पण अगदी आठ दिवसांत काढण्यात आला. प्रेक्षकांनी त्याची दखलच घेतली नाही. पुढे काही महिन्यात या सिनेमाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळाला. अगदी उत्कृष्ट सिनेमापासून दिग्दर्शक, संगीत, कलाकार सर्वांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानं सिनेमाची हवा झाली. हे पाहता अदूर गोलापकृष्णन यांनी सिनेमा पुन्हा रिलीज केला आणि तुफान चालला. सिनेमाला लागलेली रक्कम वसूल झाली.


अदूर गोपालकृष्णन सांगतात की "आजही एखादा समांतर सिनेमा थिएटरमध्ये चालवायचा असेल तर तो आधी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळून आला तर बरं पडतं. नाही तर असा सिनेमा करणं हा आजही घाटे का सौदाच आहे.” 


समांतर सिनेमाची ही स्थिती १९८५ नंतर फारच बिकट बनत गेली. गल्लेभरु सिनेमाची संख्या वाढली आणि तो मागे पडू लागला. तरीही शाजी करुण,अदूर गोपालकृष्णन आणि गिरीश कासारवल्ली यांनी केरळमधील समांतर सिनेमाचा झेंडा फडकवत ठेवला हे विशेष. ही परंपरा पुढे नेणारा नव्या दमाचा दिग्दर्शक सनल कुमार ससीधरण म्हणतो की "जी अरविंदन, जॉन अब्राहम, शाजी करुण, केपी कुमारन, के जी जॉर्ज आणि टी व्ही चंद्रन सारख्या दिग्दर्शकांनी दिलेल्या समांतर सिनेमानं कमर्शियल सिनेमात कधी न दिसलेले विषय निवडलेले, यातून सिनेमाचा आर्टिस्टिक माहौल तयार झाला. जो आजही मल्याळम सिनेमात नवीन प्रयोग करायला प्रेरणा देतोय. 
तामीळनाडूत समांतर सिनेमाचा हा प्रवास कमर्शियल सिनेमाच्या माध्यमातूनच झालाय. गल्लेभरु सिनेमांच्या भाऊगर्दीत तात्कालिन सामाजिक स्थितीवर भाष्य करणारे सिनेमे देण्याचं श्रेय प्रामुख्यानं दोन तामीळ दिग्दर्शकांकडे जातं. पहिलं म्हणजे के बालचंद्रन आणि दुसरं बालू मेहेंद्रा. कमला हसन आणि रजनीकांतसारख्या त्यावेळच्या नवख्या पण कसदार अभिनेत्यांना घेऊन दोघांनी नवी गोष्ट सांगितली.  के बालचंद्रनचा अरंग्रेतम (१९७३)अपुर्वा रागंगल (१९७५) या सिनेमांनी शहरी अस्वस्थ समाज दाखवला. रजनीकांतला अँग्री यंग मॅन बनवला. तर बालू महेंद्रानं मुंदरम पीरई (१९८२) विदू(१९८८) सारखे वेगळ्या विषयांवरच्या सिनेमाची मांडणी केली आणि प्रेक्षकांना तिकिट खिडकीवर खेचलं. तामीळी समाजावर चित्रपटाचा प्रभाव जास्त आहे, पण तिथं कमर्शियल सिनेमाची चलती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इंडी सिनेमाच्या माध्यमातून समांतर सिनेमाचं नवी लाट तामीळ भाषेत आली. पा रंजिथ, वेत्री मारण, के स्लेवा राघवन यांनी विषयांची विविधता हाताळली पण त्यात सामाजिक जाणीवांपेक्षा हिरोपण जास्त होतं. इथं आणखी एक नाव नमूद करणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे संगीतम श्रीनिवासा राव. संगीतम यांनी कमला हासन या अभिनेत्याचा वापर सिनेमातल्या वेगळ्या प्रयोगांसाठी केला. हे समांतर सिनेमाच्या पठडीत येत नसले तरी ते कमर्शियल सिनेमांच्या चौकटीत न बसणारे होते.


जी गत तामीळ सिनेमांची होती तशीच तेलुगु सिनेमाची. इथं ही गल्लेभरु आणि मसाला सिनेमांची रेलचेल होती. अश्यावेळी बंगाली भाषेतले मृणाल सेन आणि गौतम घोष यासारख्या दिग्दर्शकांनी समांतर सिनेमांची मुहुर्तमेढ केली. मृणाल सेन यांचा ओका उरी कथा (1977) हा तेलुगु पहिला समांतर सिनेमा म्हणून प्रसिध्द आहे. प्रेमचंदच्या कफन या कथेचं तेलुगु वर्जन असलेला ओका उरी कथा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलमध्ये इतका गाजला की आंध्रातल्या प्रेक्षकांना त्याची दखल घ्यावी लागली. दुसरीकडे गौतम घोष यांच्या माँ भूमी (1979) सिनेमानं आंध्रातल्या शेतकऱ्यांचा ब्रिटीशांविरोधातला उठाव पडद्यावर आणला. के.विश्वनाथ सारख्या दिग्दर्शकांनी कमर्शियल सिनेमांच्या माध्यमातून समांतर सिनेमाला पुढे घेऊन जाण्यास सुरुवात केली. पण ती फक्त विषयांपुरती मर्यादीत होती. बाकी मांडणी कमर्शियल होती.


दुसरीकडे कर्नाटकामध्ये साहित्य आणि नाटक हे कानडी भाषेतल्या समातंर सिनेमाचा गाभा ठरले. उत्तमोत्तम साहित्य आणि नाटकांवर आधारीत सिनेमांनी इथल्या समांतर सिनेमा चळवळींना हात दिला. केवी कारंथ आणि गिरीश कर्नाड या दोन नाटकातल्या दिग्गजांनी कानडी समांतर सिनेमा समृध्द केला.


प्रसिध्द सिने समीक्षक एम के राघवेंद्र यांनी म्हटलंय की "दक्षिण भारतातल्या समांतर सिनेमांचा जेव्हा विचार होई तेव्हा मल्याळम आणि कानडी भाषांतल्या सिनेमांची सर्वात जास्त चर्चा होईल. या दोन्ही भाषेतल्या दिग्दर्शकांनी आपल्या भाषेतला सिनेमा आधी जागतिक पातळीवर नेला आणि त्यानंतर तो भारतात प्रसिध्द झाला. हे समांतर भारतीय सिनेमे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्स गाजवत असताना आपल्या देशात मात्र त्याबद्दल उदासीनता होती. देशात हिंदी सिनेमांची व्याप्ती मोठी होती. पण बंगाळी, तमीळ, मल्याळम आणि कन्नड सिनेमा त्या-त्या राज्यात अडकला. पण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून त्यानं जगाला आपली दखल घ्यायला लावली.”


गेल्या साठ वर्षांमध्ये समांतर सिनेमाच्या परीभाषेत ही बदल झालाय. ७०च्या दशकात राजकीय आणि सामाजिक जाणिवेतून तयार झालेला सिनेमा आता उरलेला नाही. वेगळ्या विषयांची मांडणी वाढलेय पण दिग्दर्शक वैयक्तिक गोष्ट सांगण्यावर जास्त भर देतायत. यामुळं व्यक्तीकेंद्रीत सिनेमा नवा समांतर सिनेमा म्हणून पुढे आलाय. याला जागतिकीकरणाचे वारे ही तितकेच जबाबदार आहेत. समांतर सिनेमांची चळवळ मागे पडण्याची अनेक कारणे होती. पुढे पुढे हे सिनेमे जास्तीत जास्त उपदेशक आणि त्याच त्याच गोष्टींवर भर देणारे ठरु लागले. विषयांच्या बाबतीत प्रयोगशीलता उरली नाही. या सिनेमांमध्ये नवं काही सांगण्यासारखं काहीही उरलं नाही. यामुळे हा फक्त काही प्रेक्षकांपुरता मर्यादीत झाला. तरीही सध्याच्या इंडी सिनेमांना जरा जास्त बरे दिवस आहेत. पण त्याचाही भारतात प्रचलित होण्याचा मार्ग आंतररराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमधूनच जातोय.

 

नरेंद्र बंडबे
narendrabandabe@gmail.com

लेखकाचा संपर्क - ९८२०४७००७२