आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अहंकारी राजकारणाला ठोकर', झारखंडच्या निकालानंतर शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'झारखंडमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव करून तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या अहंकारी राजकारणाला ठोकर दिली आहे. झारखंडच्या निकालाने देशांतर्गत भाजपविरोधी मोहीम तीव्र होणार असून आगामी निवडणुकांवर त्याचा मोठा परिणाम होईल', असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले.

झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- झारखंड मुक्ती माेर्चाला स्पष्ट बहुमत मिळताच पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मोदी, शहा व भाजप यांच्यावर हल्ला चढवला. भाजपला धूळ चारण्याची सुरुवात महाराष्ट्रातून झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. पवार म्हणाले, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व झारखंड अशा पाच राज्यांतून भाजप आता हद्दपार झाली आहे. झारखंडच्या निकालाने इतर राज्यांना भाजपचा सामना करायला बळ मिळेल.

झारखंड आदिवासीबहुल राज्य आहे. तेथे दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे. भाजपने येथे आर्थिक ताकद व केंद्रीय सत्तेची शक्ती पणाला लावली होती. त्याला न जुमानता झारखंडच्या गरीब जनतेने भाजपला नाकारून मोठा इतिहास घडवला आहे. झारखंडच्या जनतेचे त्यांनी अभिनंदन केले. सत्तेत असलेल्या मंडळींनी शांततेने पावले टाकायची असतात, परंतु सध्याचे केंद्रातले मोदी सरकार समाजासमाजात धार्मिक अंतर वाढवत आहे. त्यामुळे देशाच्या एकात्मतेला ठेच पोहोचेल, असा इशारा पवार यांनी दिला.

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर शरद पवार यांनी तोफ डागली. या कायद्यातील सुधारणांच्या तरतुदींबाबत जनतेची नाराजी समजू शकते, परंतु तुमचे आंदोलन शांततेत करा. देशाच्या संपत्तीचे नुकसान करू नका. कोणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रिमंडळ बैठक व संसदेमध्ये या कायद्याला विरोध झाला नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य असत्य आहे, असे ते म्हणाले. संसदेत मी व प्रफुल्ल पटेल यांनी या कायद्याचे दुष्परिणाम सांगितले होते. या कायद्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता.

यापूर्वी महत्त्वाच्या विधेयकांवर सर्वपक्षीय बैठका होत असत. त्यात विरोधकांची मते सत्ताधारी जाणून घेत असत. परंतु, ही प्रथा मोदी सरकारने बंद केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

पवार म्हणाले

१ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भाजपला उतरती कळा लागली आहे.
२ नागरिकत्व कायदा आणून नरेंद्र मोदी सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे.
३ भारतात श्रीलंका, नेपाळमधूनही लोक येतात. केवळ मुस्लिम येतात असे नाही.
४ एनआरसीविषयीचा तुमचा संताप शांततेने दाखवा. जाळपोळ, हिंसा कर नका.
५ भाजप अशीच वागत राहिली तर लोक मोदी सरकारला झारखंडसारखे उत्तर देतील.

झारखंड पराभव भाजपच्या जनविरोधी धोरणाचा परिपाक : थाेरात

खोट्या राष्ट्रवादाची अफूची गोळी, कलम ३७० चे भांडवल, नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि पाकिस्तान या सगळ्या मुद्द्यांवर राजकारण करून निवडणूक जिंकण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने हाणून पाडला आहे. झारखंडमधील भाजपचा पराभव हा त्यांच्या जनविरोधी राजकारणाचा परिपाक आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी झारखंडमध्ये १६ ठिकाणी सभा घेतल्या, परंतु या सभांमध्ये राज्याच्या मूळ प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न केला. तोही अयशस्वी ठरला आहे, असे ते म्हणाले.