आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी हे तर अंबानी, अदानींचे लाऊडस्पीकर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी : देशाची सत्ता १५-२० धनदांडगे सांभाळत आहेत. त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. यापुढे देशातील कंपन्या त्यांच्या मालकीच्या होणार आहेत. गरीब, सर्वसामान्य नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम सुरू आहे. लघुउद्योजक उद्ध्वस्त झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी बेहाल आहेत. असे असताना नरेंद्र मोदी हे अंबानी व अदानींचे लाऊडस्पीकर म्हणून वावरत असल्याची घणाघाती टीका करत राहुल गांधी यांनी सरकारवर ताशेरे ओढले.

यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत राहुल गांधी बोलत होते. भाजप सरकारच्या धोरणाची खिल्ली उडवत ते म्हणाले, मोदींनी मागील निवडणुकीत १५ लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले का? शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा झाले का? असे विचारत हे खोटारड्यांचे सरकार असल्याचे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे काय झाले? : राहुल म्हणाले, तुमचे लक्ष विचलित करून कलम ३७०, चंद्रयान, पुलवामा यावर मोदी भर देत असून बेरोजगारी, शेतकरी समस्या यावर चकार शब्द काढताना दिसत नाही. तुमच्या खिशातील पैसा धनदांडग्याच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. श्रीमंत व्यावसायिकांचे १ लाख ३५ हजार कोटी रुपये माफ करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात आले नाही.

रोजगार, उद्योगधंदे बंद पडल्यामुळे अर्थव्यवस्थेवर संकट : वर्ध्यातील सभेत राहुल म्हणाले, देशासह महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना रोजगार नाही. सोबतच या सरकारने उद्योगधंदे बंद पाडल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट उभे राहत आहे. काँग्रेस सरकारने मनरेगा योजना सुरू केली होती. त्यात अनेक शेतकरी तसेच सामान्यांच्या खिशात पैसे जमा व्हायचे. त्या पैशांमधून उद्योगधंद्यात तेजी आली होती. सामान्यांच्या हिताच्या योजना या मोदी सरकारने बंद पाडल्या. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे.

काँग्रेसच्या पायावरच भाजपची इमारत : खरगे
नागपुरातील सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, काँग्रेसने ७० वर्षात काय केले, असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. पण, काँग्रेसने उभ्या केलेल्या पायावरच आज भाजपची इमारत उभी आहे. आम्ही काहीच केले नसते तर भाजपचा डोलारा कधीचाच कोसळला असता. आम्ही लोकांचे प्रश्न मांडून मते मागतो. तर भाजप भूलथापा देऊन भावनिक राजकारण करून मते मागते. केंद्र असो वा राज्य भाजप सरकारचा संपूर्ण भर मार्केटिंगवर आहे. त्याच्या भरवशावरच ते लोकांना भूलथापा देतात, असे ते म्हणाले.