Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Narendra Modi vidhar manch will allience with shiv sena

असंतुष्ट निष्ठावान हाती घेणार नरेंद्र मोदी विचार मंचचा झेंडा! शिवसेनेशी करणार युती ?

प्रतिनिधी | Update - Sep 11, 2018, 11:53 AM IST

प्रदेश पातळीवर निर्णय होऊनसुद्धा भाजपतील पक्षांतर्गत मतभेद मिटण्याची कुठलीही शक्यता न उरल्याने महापालिकेच्या आगामी

 • Narendra Modi vidhar manch will allience with shiv sena

  नगर- प्रदेश पातळीवर निर्णय होऊनसुद्धा भाजपतील पक्षांतर्गत मतभेद मिटण्याची कुठलीही शक्यता न उरल्याने महापालिकेच्या आगामी निवडणुकीत जुने, निष्ठावान कार्यकर्ते 'नरेंद्र मोदी विचार मंच'ची पताका आपल्या खांद्यावर घेण्याच्या तयारीत असून हा नवा मंच शिवसेनेबरोबर युती करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीतील वातावरण चांगलेच तापणार आहे.


  मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये धुमसत असलेला असंतोष मिटवण्यासाठी गांधी आणि आगरकर गटात समेट घडवून यावा, म्हणून प्रदेश भाजपने मुंबईत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फोर्टी प्लसचे लक्ष्य गाठायचं असेल, तर दोन्ही गटांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार खासदार दिलीप गांधी, ॲड. अभय आगरकर आणि पालकमंत्री राम शिंदे यांना एकत्र बसवून हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु हा प्रश्न स्थानिक पातळीवर सुटण्याची सुतराम शक्यता राहिलेली नाही. कारण यापूर्वीदेखील अनेक वेळा अशाच पद्धतीने प्रदेश भाजप कार्यालयाने हा विषय स्थानिक पातळीवर टोलवला होता. दरम्यानच्या काळात निवडणुकीची तयारी जशीजशी वेग घेऊ लागली, तसं भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांचे प्रमाणही वाढू लागले. परंतु नव्याने पक्षात दाखल होणारी ही सगळी मंडळी केवळ गांधी गटाशी संलग्न राहू लागली आहेत. त्यामुळे आजपर्यंत ज्यांनी पक्षाच्या उभारणीत मोठे योगदान दिले आहे, अशा प्रत्येक प्रभागातील जुन्या जाणत्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष धुमसतो आहे. त्यांना पक्षप्रवेशाबाबत विचारातही घेतले जात नाही.


  तिकीट वाटप करताना गांधी गट कोणालाही विश्वासात घेणार नाही, अशी भावना या सर्व कार्यकर्त्यांमध्ये पसरली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नाराजीदेखील वाढू लागली आहे. मध्यंतरी यासंदर्भात दोन गुप्त बैठकाही झाल्या. त्या बैठकांत ठरल्याप्रमाणे एक निवेदन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पाठवण्यात आले होते. मात्र, त्या निवेदनाची कोणतीच दखल प्रदेश कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आता हतबल झालेल्या या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून 'नरेंद्र मोदी विचार मंच' स्थापन करण्याचे ठरवले आहे. तशा हलचाली वेगाने सुरू झाल्या असून एकेक असंतुष्ट कार्यकर्ता शोधून त्याला मंचला जोडण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे.


  निवडणुकीच्या तोंडावर या विचार मंचची घोषणा होण्याची शक्यता असून हा मंच शिवसेनेबरोबर युती करण्याच्या मानसिकतेत आहे.


  पंतप्रधान मोदींचा करिष्मा आणि राज्यात विविध महापालिकांमधून भाजपला मिळत असलेले बळ, या भांडवलावर हा मंच नगरमध्ये मतांची बेगमी करण्याच्या तयारीत आहे. पक्षाशी वाद नाहीत किंवा पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत कुठलीही शंका नाही. मात्र, नगरमध्ये कोणा एकाच्या तालावर पक्ष नाचतो आहे, याचा निषेध करण्यासाठी म्हणून 'नरेंद्र मोदी विचार मंच' ही चळवळ उभी राहते आहे. दरम्यान, असे झाले तर तो भाजपसाठी फार मोठा फटका ठरू शकतो. याबाबत आता वरिष्ठ पातळीवर नेमका कोणता अंतिम निर्णय घेतला जातो याची उत्सुकता आहे.


  कोपरगावचा प्रयोग नगरमध्ये रंगणार
  कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उभे राहून निवडून आलेले विजय वहाडणे यांनीसुद्धा अशाच कारणांमुळे नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून आपली प्रचार मोहीम राबवली होती आणि त्याचा त्यांना चांगला फायदाही झाला होता. त्याच धर्तीवर तोच प्रयोग नगरमध्ये करण्यासाठी कार्यकर्ते पुढे सरसावले आहेत. त्यासाठी वहाडणे यांचेही मार्गदर्शन घेतले जाणार असून त्यांनी स्वतःची प्रचार यंत्रणा ज्या पद्धतीने राबवली; तशाच पद्धतीने नगर शहरातही मंच आणि शिवसेना या युतीची प्रचार मोहीम आखली जाऊ शकते.

Trending