आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्याची-त्याची विचारपद्धती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वेच्या दुसऱ्या डब्यात एका परिवारातले काही लोक आपल्या प्रियजनाचा ताबूत (शवपेटी) घेऊन बसले होते. पेटीत त्यांच्या प्रियजनाचा मृतदेह होता आणि ते त्याला आपल्या गावी घेऊन चालले होते. खूप विनवण्या करून, काही देवघेव करून त्यांनी हा मृतदेह रेल्वेतून नेण्याची परवानगी मिळवली होती. 


ताबूत घेऊन त्यांनी जेव्हा डब्यात प्रवेश केला, तेव्हा अन्य प्रवाशांनी आपला विरोध प्रकट केला. खूप वादावादी झाली, पण स्टेशनमास्तरांनी परवानगी दिल्यामुळे शेवटी ते ताबूत घेऊन डब्यात चढलेच. ते सीटवर बसले आणि आपल्याजवळ खालीच त्यांनी ताबूत ठेवला. आसपासच्या सीटवरील प्रवासी उठून दुसरीकडे जागा शोधू लागले. मृतदेहाजवळ बसणं कुणालाच नको होतं. ज्यांना जागा मिळाली नाही, ते आपल्या पेटीवर, वळकटीवर बसले. 
ताबुताच्या चारी बाजूंच्या सिटा रिकाम्याच राहिल्या. एका छोट्या स्टेशनवर गाडी थांबली. गावातील बेताच्या परिस्थितील मुलाच्या लग्नाची वरात नवऱ्या मुलासहित स्टेशनवर आली होती. ती त्याच डब्यात चढली. सिटा रिकाम्या होत्या.


त्यामुळे सगळे जण खुश होऊन त्या रिकाम्या जागांवर बसले. काही बायकांना जागा मिळाली नाही. त्या ताबुताच्या आसपास उभ्या राहिल्या. एकीने कुतुहलाने विचारले, ‘यात काय आहे?’ परिवारातला एक जण दु:ख-व्याकूळ शब्दात म्हणाला, “आमच्या भवाचा शहरात मृत्यू झाला होता. त्याला आमच्या घरी घेऊन चाललो आहोत.’ 
त्या बायकांनी एकमेकींकडे नजरेच्या कोपऱ्यातून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर दु:खाची छटा पसरली, पण मग दूरवरच्या प्रवासाचा अंदाज घेत, त्या दुसऱ्याच क्षणी ताबूतावर जाऊन बसल्या आणि चेहऱ्यावर घुंघट ओढून, आरामात विवाहप्रसंगी म्हणायची मंगल गाणी गाऊ लागल्या.


अनुवाद : उज्ज्वला केळकर

बातम्या आणखी आहेत...