Home | Business | Business Special | Naresh Goyal back steps from Jet deal

एतिहाद-टीपीजीच्या आक्षेपानंतर जेटच्या लिलाव प्रक्रियेतून संस्थापक नरेश गोयल यांची माघार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 11:10 AM IST

गोयल सहभागी झाल्यास बाहेर पडण्याचा एतिहाद-टीपीजीचा इशारा

 • Naresh Goyal back steps from Jet deal

  मुंबई- जेट एअरवेजच्या लिलाव प्रक्रियेतून कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांनी माघार घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरलाइनसाठी बोली लावणाऱ्या कंपन्या एतिहाद एअरवेज आणि टीपीजी कॅपिटल यांनी गोयल यांच्या सहभागावर आक्षेप घेतला होता. गोयल लिलाव प्रक्रियेत सहभागी होत असतील, तर आम्ही माघार घेणार असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे. त्यानंतर गाेयल यांनी त्यांचा प्रस्ताव माघारी घेतला. त्यांनी अमेरिकेची “फ्यूचर ट्रेड कॅपिटल’ आणि लंडनच्या “आदी पार्टनर्स’ यांच्यासोबत मिळून बोली लावली होती. बोली प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल रोजी त्यांनी बोली जमा केली होती. त्यांनी एअरलाइनच्या अध्यक्षपदाचा आणि संचालक मंडळाचा आधीच राजीनामा दिला आहे.


  सध्या जेटमध्ये गाेयल यांची ५१ टक्के आणि एतिहादची २४ टक्के भागीदारी आहे. वास्तविक गोयल यांच्याकडील सुमारे ३१.२ टक्के शेअर बँकांकडे गहाण ठेवलेले आहेत. एतिहादने आधीदेखील जेटमध्ये नवीन गुंतवणूक करण्याआधी गोयल यांनी बाहेर जाण्याची अट घातली होती. आता एतिहाद या कंपनीला ओपन ऑफरची सूट हवी आहे. कंपनीमध्ये कोणाची भागीदारी २५ टक्के झाली तर त्याला आणखी २० टक्के शेअर खरेदी करण्यासाठी अोपन ऑफर अनिवार्य आहे.


  दरम्यान, अस्थायी स्वरूपात उड्डाण सेवा बंद होणार असल्याचे वृत्त आल्याने जेटच्या शेअरमध्ये मंगळवारी १८.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात शेअर ७.६ टक्क्यांच्या घसरणीसह २४१.८५ रुपयांवर बंद झाले.

  काही दिवसांसाठी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव
  मंगळवारी सकाळी जेटच्या संचालक मंडळाची बैठक झाली. बँकांची मदत मिळाली नसल्याने जेटच्या व्यवस्थापनाने संचालक मंडळासमोर काही दिवसांसाठी सेवा पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संचालक मंडळाने अंतिम निर्णय सीईओ विनय दुबे यांच्यावर सोडला आहे. दुबे यांनी बँकांकडे तत्काळ ४०० कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. पैसे मिळाले नाहीत तर सेवा बंद होण्याची शक्यता आहे. एअरलाइनच्या वतीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात डीजीसीए आणि मंत्रालय यांच्याशी चर्चा सुरू आहे.


Trending