आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेश गोयल यांचा जेटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; आता जेटच्या विरोधात कारवाईची शक्यता कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे प्रवर्तक आणि अध्यक्ष नरेश गोयल यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. नरेश यांची पत्नी अनिता आणि एतिहाद एअरवेजच्या एका प्रतिनिधीने कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला. आता या विमान वाहतूक कंपनीला वाचवण्यासाठी बँकांकडून १५०० कोटी रुपये मिळतील. संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

 

गोयल यांनी अध्यक्षपदाचा तर, त्यांची पत्नी यांच्यासह एतिहाद एअरवेजचे केविन नाइट यांनी संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. कर्जदात्यांच्या योजनेला अनुमोदन देतानाच संचालक मंडळाने ऋणकोच्या दोन प्रतिनिधींना संचालक मंडळावर घेण्यास मंजुरी दिली आहे. एसबीआयच्या नेतृत्वात देशातील ऋणकोंनी जेटसाठी मदत योजना तयार केली होती. त्यानुसार सर्व ऋणकोंना एक रु. दराने ११.४ कोटी शेअर्स जारी केले जातील. त्यामुळे जेटचे प्रवर्तक गोयल यांची ५१% हिस्सेदारी कमी होऊन २५.५% वर,तर एतिहादची हिस्सेदारी १२%वर येईल.

 

नरेश गोयल यांनी जेट एअरवेजच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता दोन आठवड्यांत स्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. भाडे न भरल्यामुळे जेटची ५० पेक्षा विमाने उभी आहेत. त्यामुळे दररोज अनेक नियोजित उड्डाणे रद्द होत आहेत. या घटनाक्रमाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ही स्थिती १५ दिवसांत सामान्य होईल. बँकांकडून पैसे मिळाल्यानंतर उभी राहिलेली अनेक विमाने उड्डाणाला तयार होतील. जेट संकटामुळे तिकिटातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही स्थिती केव्हा सामान्य होईल, याविषयी विचारल्यानंतर ते म्हणाले की, हे मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असेल. ही समस्या केवळ जेटमुळे आलेली नाही. ही समस्या ३१ मार्चपर्यंत संपायला हवी. त्यांनी सांगितले की, उभी करण्यात आलेली विमाने पुन्हा घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या ४० विमाने उड्डाण करत आहेत. बँका तत्काळ पैसे देत असल्याने महिनाभरात आणखी ३० विमाने येण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे आता एकही नवे विमान उभे राहणार नाही, ही चांगली बाब आहे. जेटच्या रिव्हायव्हल प्लॅनसंदर्भात त्यांनी सांगितले की, बँका त्यांची भागीदारी विक्री करण्याची प्रक्रिया ९ एप्रिलपासून सुरू करतील. ती ३१ मे रोजी पूर्ण होईल. जी बोली मिळेल, त्यावर विचार करून जूनमध्ये खरेदीदार निश्चित केला जाईल. एअरलाइनचे व्यवस्थापन सामान्य होण्यासाठी ४,००० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. वास्तविक बँका १,५०० कोटी रुपयेच देत आहेत. ही रक्कम कंपनीला पाच आठवड्यांसाठी पुरेशी आहे. तोपर्यंत नवीन खरेदीदार येण्याची अपेक्षा आहे. ते आणखी पैसे गुंतवतील. 

 

मुलाचा संचालक मंडळात समावेश करण्याची होती इच्छा 
नरेश गोयल यांनी एक एप्रिल १९९२ रोजी जेट एअरवेजची स्थापना केली होती. त्यांनी कंपनी स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता. ते सुरुवातीला अध्यक्षपद सोडण्यास तयार झाले होते. मात्र, मुलगा निवान याला संचालक मंडळात घेण्याची अट घातली होती. एसबीआयने काही दिवसांपूर्वीच नवीन कर्ज हवे असल्यास गोयल यांना पद सोडावे लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. कंपनीतील भागीदार एतिहादने ७५० कोटी रुपयांचा फंड देण्यास नकार दिल्याने गाेयल यांची स्थिती अधिक खराब झाली. कंपनी त्यांची भागीदारीदेखील १५० रुपये प्रति शेअरच्या भावावर बँकांना विक्री करण्यास तयार होती. वास्तविक याला बँकांनी सहमती दर्शवली नाही. स्वस्तातील विमानसेवा देणाऱ्या इंडिगो आणि स्पाइसजेटमुळे कंपनीची स्थिती खराब होण्यास सुरुवात झाली होती. मागील वर्षी विमानाच्या इंधनाचे दरही वाढले. नोव्हेंबर २०१८ मध्ये दर एका वर्षाच्या तुलनेमध्ये ४० टक्क्यांनी वाढून ७६,००० रुपये प्रति किलोलिटरपर्यंत पोहोचले होते. 

 

 

एसबीआय बँकेचेच माजी प्रमुख पुरवार असतील अ-कार्यकारी अध्यक्ष  
एसबीआयच्या सर्व शाखांना ऑनलाइन करण्याचे श्रेय ज्यांना जाते, ते एसबीआयचे माजी अध्यक्ष ए.के. पुरवार जेटचे अ-कार्यकारी अध्यक्ष असतील. जेटला कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये एसबीआय प्रमुख आहेत. यात पुरवार यांच्याव्यतिरिक्त माजी अध्यक्ष जानकी वल्लभ आणि माजी एमडी एस. विश्वनाथन यांच्या नावाचाही प्रस्ताव होता. आधी जानकी वल्लभ यांच्या नावाची जास्त चर्चा होती. मात्र, त्यांच्या वयामुळे ते मागे पडले. ते ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. जानकी २००० ते २००२ पर्यंत आणि पुरवार २००२ ते २००६ पर्यंत एसबीआयचे अध्यक्ष होते. विश्वनाथन २०१२ ते २०१४ पर्यंत एमडी होते.  

 


एसबीआयचे माजी डीजीएम नरेश मल्होत्रा यांनी सांगितले की, सध्याचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि माजी अध्यक्ष पुरवार आणि वल्लभ, तिघांच्याही नोकरीची सुरुवात लखनऊ विभागातून झाली होती. त्यांच्या निवडीमागचे हेदेखील एक कारण असू शकते. एसबीआयच्या सर्व शाखांना ऑनलाइन (सीबीएस) करण्याचे श्रेय पुरवार यांनाच जाते. ते गेल्यानंतर बँकिंग प्रणालीमध्ये अनेक बदल झाले आहेत, ही एकमेव समस्या आहे. यात ते कसे बसतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

 

आता जेटच्या विरोधात कारवाईची शक्यता कमी

नरेश गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आणि बँकांनी मदत दिल्यानंतर जेट एअरवेजच्या विरोधात दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाईची शक्यता आता राहिलेली नाही. एसबीआय अध्यक्ष रजनीश कुमार यांनी मागील आठवड्यातच दिवाळखोरी कारवाई हा अंतिम पर्याय असल्याचे सांगितले होते. गोयल यांच्या राजीनाम्याचे वृत्त येण्याआधी सोमवारी सकाळी कंपनी प्रकरण विभागाचे सचिव इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले होते की, कर्ज देणारे आणि घेणारे चर्चा करत आहेत. ही चांगली बाब आहे. मात्र, जर दिवाळखोरी कारवाई करण्याचाच पर्याय राहिला तर बँका निर्णय घेतील. 

 

 कारवाईमधील अडचणी 

 दिवाळखोरी कारवाईमध्ये कर्ज देणारे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये अपील करतात. त्या ठिकाणी आधी कंपनी विकून कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये अयशस्वी ठरल्यास कंपनी भंग करून संपत्ती विकण्याचा निर्णय घेतला जातो. जेटकडील सर्वाधिक विमाने भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. बँका ती विमाने विकू शकत नाहीत. बँकांकडे जेटचा ब्रँड आणि फ्लाइटचे शेड्यूल राहील. ब्रँडला कदाचित खरेदीदार मिळेल. 

 

जेटच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांपर्यंत वाढ 

 गोयल यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर जेट एअरवेजच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मुंबई शेअर बाजारात शेअर १२.६९ टक्क्यांनी वाढून २५४.५० रुपयांवर बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात यामध्ये १५.४६ टक्क्यांची वाढ झाली. दोन्ही बाजारांत जेटच्या एकूण सुमारे ४.३ कोटी शेअरची खरेदी-विक्री झाली. सेन्सेक्समध्ये ०.९३ टक्क्यांची घसरण झाली.

 

 

दु:खद दिवस : अजय सिंह

जेटच्या संचालक मंडळातून नरेश गोयल यांनी राजीनामा दिल्याने स्पाइसजेटचे सीएमडी अजय सिंह यांनी हा भारतीय एव्हिएशनसाठी दुःखद दिवस असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, “जागतिक पातळीवरील एअरलाइन सुरू करून नरेश आणि अनिता गोयल यांनी भारताचा गौरव वाढवला होता. आजचा दिवस धोरण ठरवणाऱ्यांसाठीही इशाराच आहे. आव्हानांमुळे देशांतर्गत एअरलाइन कंपन्या तोट्यामध्ये जात आहेत.