Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Narmada foothills are filled with thirst, by digging springs!

नर्मदा पायथ्याशी विष ओकते, झरे खोदून तहान भागवली जाते!

नितीन फलटणकर | Update - May 14, 2019, 08:25 AM IST

डोंगरावरून १०० फूट खाली उतरायचे, भरलेल्या हंड्यांनी पुन्हा डोंगर चढायचा

 • Narmada foothills are filled with thirst, by digging springs!

  चिमलखेडी, अक्कलकुवा (जि. नंदुरबार) - महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या ३ राज्यांना जोडणारे चिमलखेडी पाडा (ता. अक्कलकुवा) हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकावरचे पहिले गाव. पायथ्याशीच नर्मदेचे विस्तीर्ण पात्र असूनही गावकऱ्यांना बारमाही भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात नर्मदेची जलपातळी वाढल्याने तसेच हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावकऱ्यांना घराच्या कौलांवरच पाणी साठवून ते प्यावे लागते, तर उन्हाळ्यात जीव धोक्यात घालत उभ्या डोंगरावरून १०० फूट खाली उतरून नर्मदेचे पाणी वर न्यावे लागते. चिमलखेडी पाड्याजवळ ३५० च्या आसपास घरे आहेत. पाड्यावर जवळपास १०३० लोकवस्तीही आहे. परंतु या साऱ्यांनाच नर्मदेच्या पाण्यावर अवलंबून राहता येत नाही. त्यांना नर्मदेच्या काठावर झिरे करून त्यातून पाणी काढावे लागते व ते प्यावे लागते.

  दोन बाजूंनी नर्मदा, मागे डोंगर
  चिमलखेडीला जाण्यासाठी रहिवाशांना गमन पाड्यावरून दोन डोंगर पार करून जावे लागते. दुसरा रस्ता म्हणजे सरदार सरोवरातून नर्मदेचा प्रवास. नर्मदेमध्ये मोठ्या प्रमाणावर मगरी असल्याने हा जोखमीचा रस्ता आहे. गावकऱ्यांना अद्यापही विजेचे दर्शन झालेले नाही. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना पाड्यावर घडतात. परिणामी अनेकांना जीव गमवावे लागले आहेत.

  पिण्यासाठी झिऱ्यांतील पाणी
  नर्मदेमुळे काठालगत तसेच डोंगरावर भूगर्भात मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. हे पाणी पिण्यायोग्य असल्याने नर्मदेच्या काठावर खड्डे केले जातात. हे पाणी कपड्याने गाळून हंड्यात भरले जाते.

  तहानलेल्या महाराष्ट्राच्या व्यथा वाचकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून..
  चिमलखेडी पाड्याची माहिती मिळाल्यानंतर दै. दिव्य मराठीच्या टीमने आधी गमनमार्गे तेथे जाण्याचा प्रयत्न केला. धडगाववरून आम्ही ७५ किलोमीटर मार्गे गमनला पोहोचलो. तेथून जलमार्गाने चिमलखेडी गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, बोट खराब असल्याने आम्ही गमनवरून ९० किलोमीटरवरचे स्टॅच्यू ऑफ युनिटी गाठले. सरदार सरोवरातून बोटीने १० किमीचा प्रवास करत चिमलखेडी गाठले. वाटेत बोटीत पाणी शिरले, बोट बंद पडली. परंतु केवळ ही बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रवासही आम्ही पूर्ण केला.

  आरोग्य सुविधा, शाळा नावापुरतीच
  येथील मुलांसाठी जिल्हा परिषदेची शाळा आहे, मात्र तीही नावालाच आहे. जीवन शाळेच्या माध्यमातूनच येथील मुले शिक्षण घेतात. डेनेल, चिमलखेडी येथील शाळा गावकऱ्यांच्याच घरातच भरवल्या जातात. शिकवायला येणाऱ्या शिक्षकांनाही गावकरीच दोन वेळचे जेवण देतात.
  - नुरजी वसावे, चिमलखेडी

  पावसाळ्यातच शेती नियोजन
  पावसाळ्यातच शेतीच्या पाण्यावर आम्हाला वर्षभराचे नियोजन करावे लागते. पावसाचे जेवढे पाणी पडते तेवढ्यावरच आमची शेती अवलंबून आहे. गावाच्या पायथ्याशी नर्मदा नदी असून त्याचा आम्हाला काहीही ‌उपयोग होत नाही.
  - रमेश वसावे, चिमलखेडी.

Trending