Drought / नर्मदा, तापीचा काठ लाभूनही पाणी गुजरातला वाहून जात असल्यामुळे सिंचनाला मोठा फटका

नंदुरबारमध्ये निसर्गासोबतच राजकीय इच्छाशक्तीचाही दुष्काळ

नितीन फलटणकर

May 15,2019 10:34:00 AM IST

नंदुरबार | सिंचनाचा अभाव, आदिवासी भागांतील प्रचंड वृक्षतोड, खडतर मार्गामुळे वाहतुकीची व्यवस्था नसल्याने नंदुरबारच्या ६ तालुक्यांना पाणीप्रश्नाने ग्रासले आहे. शहादा, अक्कलकुवा, नंदुरबार, धडगाव तालुके यात सर्वाधिक होरपळून निघत आहेत. दुर्गम रस्त्यांमुळे नंदुरबारमध्ये दोन आदिवासी पाड्यांवर केवळ एकच टँकर सुरू आहे. वैयक्तिक बोअर व हातपंपांच्या माध्यमातून येथील नागरिक तहान भागवत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातून ५३ किलोमीटरचा प्रवास करून नर्मदा वाहते. याचा फारसा फायदा येथील आदिवासी पाड्यांना होत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे नर्मदा व तापी नदीचे पात्र असूनही नंदुरबारला पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. या दोनही नद्यांचे पाणी पावसाळ्यात गुजरातेत वाहून जाते. शहादात सारंगखेडा व प्रकाशात तापी नदीवर बॅरेजेस बांधले असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा काहीही उपयोग होत नाही. मागील पाच वर्षांच्या काळात जिल्ह्याला भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.


धडगावात १५० वरून ८०० फुटांवर पाणी
धडगावात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जिल्हा परिषद शाळा आहे. १६५ गावांत १५०० वर पाडे आहेत. दुर्गम भागामुळे येथे टँकरच पोहचू शकत नाही. आदिवासींना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. तेलखेडीचे रेहमल फाड्या पावड्या सांगतात, पावसाळ्यात पाण्याचे आणि अन्न-धान्याचे नियोजन केले नाही तर जगणे कठीण आहे. उन्हाळ्यात स्थलांतरही करावे लागते. येथून जवळच हरणपुरी गावात एक तलाव होता. त्यामुळे भूगर्भात चांगले पाणी होते. आता त्या तलावावर कुणीतरी कब्जा केल्याने पाणी तर आटलेच आहे, शिवाय भूगर्भाखालील पाणीही कमी झाले आहे. पाड्यांवर जाण्यासाठी रस्तेच नसल्याने गावकऱ्यांना जेथपर्यंत रस्ता जातो तिथपर्यंत मिळेल त्या वाहनाने जावे लागते.

वेलखेडी गावात वाटलीपाड्याच्या आदिवासींना पाण्यासाठी कसरत करावी लागते. ८ दिवसांपूर्वी गावात वीज आली. गावकऱ्यांनी वर्षभर श्रमदान करत स्वखर्चातून ७ किमीचा रस्ताही खोदला. पाण्यासाठी ५-६ वेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही काहीच झाले नाही. ६५० गावकऱ्यांना रोज डोंगर पालथा घालून खाली आटलेल्या नदीतून झरे खोदून पाणी आणावे लागते, असे या पाड्यावरील भीका पाडवी आणि रजीला पावरा सांगतात. रोज तीनवेळा पाणी भरावे लागते. एकदा पाणी भरण्यासाठी एक घागर भरायला किमान तीन तास लागतात. रात्री पाण्यासाठी गेलेल्यांवर बिबट्याच्या हल्ल्यांच्याही घटना घडल्या आहेत. पावसाळ्यात पाणी नेताना अनेकांचा पाय घसरून मृत्यूही झाल्याची माहितीही त्यांनी दिली.


आदर्श शेतकरी बनला रसवंती चालक
न्याहली गावातील हिंमत माळी यांना दुष्काळामुळे शेती सोडून रसवंतीवर उदरनिर्वाह करावा लागत आहे. २००८ मध्ये त्यांना सह्याद्री कृषी सन्मान, २०१० मध्ये नंदुरबार कृषी समाज भूषण, २०१३ मध्ये महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळाला. त्यांनी शेतात ४ बोअर घेतल्या. पहिल्यांदा ४००, नंतर ६५०, तर शेवटच्या बोअरला ७५५ फुटांंवर २ इंची पाणी लागले. त्यांनी १० एकरात ऊस लावला. ४०० रुपये प्रतिटँकरने ते ७ टँँकरपोटी रोजचे २८०० रुपये खर्च करत आहेत. आता रसवंतीच्या गाड्यावर त्यांना गुजराण करावी लागतेय.


दोन गावात एक टँकर सुरू आहे
अक्राणी तालुक्यातील गौऱ्याच्या बोदलापाडा व कुंदलचा गुगलमाळ पाडा या २ गावांत एक टँकर सुरू आहे. नंदुरबार तालुक्यात ५२ खासगी विहिरी अधिग्रहित आहेत. ४ विहीर खोलीकरण, १५ विंधन विहिरी व १५ गावांत तात्पुरती नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे. नवापूर तालुक्यातील एका गावात तात्पुरती नळ योजना सुरू केली आहे. शहादा तालुक्यात ७ विंधन विहीरी, तीन तात्पुरत्या नळ योजना तर तळाेद्यात एक विंधन विहीर तयार करून दिली. - बालाजी मंजुळे, जिल्हाधिकारी, नंदुरबार

X
COMMENT