आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • NASA Reported: June Is The Warmest Month, Even In July; India's Worst Drought In 100 Years

नासाचा अहवाल : जून आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना, जुलैदेखील विक्रमी; भारताला १०० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाची झळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जून महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण महिना ठरल्याचे नासाने म्हटले आहे. गेल्या महिन्यात जागतिक सरासरी तापमान ०.९३ अंश सेल्सियस एवढे नोंदवण्यात आले. याआधी २०१६ मध्येदेखील अशीच काहिली झाली होती. तेव्हा जूनमध्ये ०.८२ अंशाहून जास्त तापमान होते. १९५१ ते १९८० यामधील माहितीवर आधारित ही गणना आहे. त्यामुळेच यंदा युरोप, युरेशिया व आर्क्टिकमध्येही ऐतिहासिक उष्णतेचे साक्षीदार ठरले आहेत. 

 

तापमान वाढीने  अनेक देशांत १०० वर्षांचा विक्रम मोडला, फ्रान्स १३ ठिकाणी झळा

> जूनमध्ये युरोपात उष्णतेची लाट होती. शंभर वर्षांपासून एवढ्या उष्णतेचा अनुभव न घेतलेल्या देशांमध्ये अखेरच्या आठवड्यात सर्वाधिक उष्णतेची झळ अनुभवली. 
 

> फ्रान्समध्ये १३ ठिकाणी उष्णतेचा सार्वकालिक विक्रम मोडीत गलारगुएस-ले-माँट्यूक्समध्ये  ४५.९ सर्वाधिक उष्णता होती. २००३ मध्ये येथे सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सियस  तापमान होते. 
 

> अमेरिका नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फर्मेशनच्या अहवालानुसार जानेवारी २०१९ मध्ये जमीन व समुद्राच्या तापमानात ०.८७ अंश सेल्सियसने वाढ झाली. त्यामुळे २०१९ मध्ये जानेवारी हा तिसरा सर्वात उष्ण महिना ठरला.

 

> युरोपच्या उष्णतेसाठी सहारा वाळवंटातून वाहणारे उष्ण वारे कारणीभूत आहे. वर्ल्ड मेटोरॉलिजी असोसिएशनच्या मते, २०१९ युरोपच्या इतिहासातील सर्वात उष्ण ठरले. जर्मनीने ४० अंश उष्णता अनुभवली. 
 

भारताला १०० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळाची झळ : देशात सरासरी तापमान ३ ते ५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहिले. १०० वर्षांत पाचव्यांदा जून सर्वात उष्ण महिना ठरला. जुलैमध्येही हीच काहिली जाणवू लागली आहे. देशाचा जवळपास ४० टक्के भाग दुष्काळाने होरपळला आहे. 
 

जुलैमध्येही उष्णतेने बेहाल : हवामान विभाग
कॅलिफोर्नियातील हवामान तज्ञ जे.के. हॉसफादर म्हणाले, जुलैदेखील उष्णतेने बेहाल करू लागला आहे. जुलैतदेखील २०१७ मधील विक्रमाला मोडून काढत सूर्य जास्त आग आेकू लागला आहे. संपूर्ण जुलै महिना असाच राहिल्यास पृथ्वीवरील सर्वात जास्त उष्ण जुलै म्हणून याची नोंद घ्यावी लागणार आहे, असे पेन्सिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतील तज्ञ मायकल मान यांचे म्हणणे आहे. 
 

भारतातील स्थितीही वाईट : १२५ शहरांत तापमानाचा पारा ४० अंशांहून पार

यंदा देशातील १२५ शहरांत तापमानाचा पारा ४० अंशांहून पुढे गेला. जागतिक बँकेच्या साऊथ एशियाज हॉट स्पॉट्स या अहवालानुसार अशीच स्थिती राहिल्यास उष्णता व पावसाअभावी लोकांच्या जीवनमानात १० टक्क्यांची घट होऊ शकते. त्यामुळे ३० वर्षांत ६० कोटी लोकांवर प्रभाव पडू शकतो. मेडिकल जर्नल द लान्सेटच्या म्हणण्यानुसार २०१७ मध्ये उष्णतेमुळे भारताच्या ७५ अब्ज तासांचा तर जगभरात सुमारे १५३ तासांचा अपव्यय झाला आहे. जगातील एकूण श्रमहानीपैकी निम्मी श्रमहानी भारतात झाली, हे यावरून स्पष्ट होते.