आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद्रयान-२ उतरत असलेल्या ठिकाणी २०२४ मध्ये नासा मानव पाठवणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - चांद्रयान-२ चंद्रावर उतरत असलेला भाग म्हणजे दक्षिण ध्रुव आहे. आजपर्यंत कोणताही देश पाेहोचू न शकलेला हा चंद्राचा प्रदेश आहे. इतर देश मिशन चंद्रावर उत्तर ध्रुवापर्यंत मजल मारू शकले आहेत. लँडर विक्रम व रोव्हर प्रज्ञान चंद्राच्या दक्षिण ध्रुवात ७० अंशाच्या अक्षांशावर दोन क्रेटर- ‘मंजिनस-सी’ व सिमपेलियस-एन’ या दरम्यानच्या मैदानी भागात उतरतील.  इस्रोच्या म्हणण्यानुसार चांद्रयान-२ ला दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण चंद्राचा बहुतांश भाग उत्तर ध्रुवाच्या तुलनेत सर्वाधिक वेळ काळोखात राहतो. त्यावरून येथे पाणी व खनिज सापडण्याची शक्यता आहे. सूर्य तळपतो तेव्हा या भागातील चंद्राचे तापमान १०० अंशांवर पोहोचलेले असते. सूर्यास्तावेळी तापमान उणे १७० अंशांवर गेलेले असते. त्याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही क्रेटर आहेत. ते अतिशय थंड स्वरूपाचे असतात. त्यात जीवाश्माच्या खाणाखुणा आढळल्या आहेत. इस्रोच्या या मोहिमेवर सर्वाधिक लक्ष नासाचे आहे. कारण याच भागात २०२४ मध्ये अमेरिकेची अंतराळ संस्था मानव पाठवणार आहे. त्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेद्वारे नासाला आपल्या मोहिमेसाठी महत्त्वाची माहिती मिळू शकते. त्याआधारे नासाला मानवी मोहिमेचा मार्ग आणखी प्रशस्त होऊ शकतो. चंद्राच्या याच भागात जीवसृष्टीची जास्त शक्यता व्यक्त केली जाते.
 

तामिळनाडूच्या चंद्रनार मंदिरात प्रार्थना
लँडर विक्रमच्या चंद्रावरील मोहिमेला यश मिळावे यासाठी तामिळनाडूच्या तंजावर येथील चंद्रनार मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली. चंद्रनार श्री कैलाशनाथन मंदिराचे व्यवस्थापक व्ही. कन्नन म्हणाले, चांद्रयानासाठी शुक्रवारी सायंकाळी एक विशेष पूजा केली. याआधी २००८ मध्ये चांद्रयान-१साठीदेखील पूजा केली होती. आम्ही १५ जुलैपूर्वी काहीही प्रार्थना केली नव्हती. तेव्हा चांद्रयान-२ पाठवले जाणार होते.
 

लँडर विक्रम व रोव्हर प्रज्ञान यांच्यात संवाद...
इस्रोचे चांद्रयान-२ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. चांद्रयानचे दोन भाग (लँडर विक्रम व रोव्हर प्रज्ञान) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. तिसरा भाग ऑर्बिटर चंद्राला परिक्रमा करत आहे. त्यात लँडर विक्रम व रोव्हर प्रज्ञान चंद्रावर १४ दिवसांच्या मुक्कामी असतील. कल्पना करा, यादरम्यान रोव्हर प्रज्ञान व विक्रम आपसांत काय संवाद साधतील बरे ? कदाचित त्यांच्यातील संभाषण काहीसे असे असेल...
 

विक्रम : मित्रा प्रज्ञान, आतापर्यंत कोणीही न आलेल्या चंद्रावर आलो. त्यावर किती खर्च झाला? 
प्रज्ञान : मित्रा, इस्रो त्यावर ९७८ काेटी रुपये खर्च करू लागले आहे. मोहिमेचा खर्च हॉलीवूडच्या ‘अॅव्हेंजर्स-एंडगेम’ (२५६० कोटी रुपये) पेक्षा कमी आहे. त्यावरून  ही मोहीम किती किफायती आहे हे त्यावरून लक्षात येऊ शकेल. 

विक्रम : अरे, तुला तर बरेच काही माहिती आहे. चल, मला चंद्राबद्दल आणखी माहिती दे ?
प्रज्ञान : चंद्राचे वातावरण पृथ्वीसारखे नाही. गुरुत्वाकर्षणही पृथ्वीसारखे नाही. पृथ्वी व चंद्रातील मूलभूत फरक तुला धूळयुक्त वादळावरून समजून येईल. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. कधीतरी माणूस येथे वस्ती करेल, असे संशोधकांना वाटते. 
विक्रम : आपण चंद्रावर का बरे जात आहोत ? 
प्रज्ञान : आपण चंद्राची उत्पत्ती व त्यातील परिवर्तनाबद्दलची तथ्ये जाणून घेऊया. येथील मुक्कामात आपण तत्त्व, तापमान, वातावरण, रसायनांबद्दलचा अभ्यास करूया. त्यात आपला मित्र ऑर्बिटरही आपल्याला मदत करेल. 
विक्रम : ऑर्बिटर..? हा कोण आहे ? 
प्रज्ञान : ऑर्बिटरही आमच्यासोबत माेहिमेवर आहे. अमेरिकेच्या अपोलो-११ मोहिमेत मायकलने निभावलेल्या भूमिकेसारखीच ऑर्बिरटचीही भूमिका असेल. आपण त्याच्या मदतीने येथवर पोहोचलो. आपण चंद्राच्या जमिनीवर उतरून अभ्यास करू व तो चंद्राच्या ऑर्बिटमध्ये परिक्रमा करेल. ऑर्बिटर चंद्रावर उतरणार नाही. 
विक्रम : बरे. मग ऑर्बिटरचे काम काय आहे ? 
प्रज्ञान : तो चंद्राच्या पृष्ठभागाचे मापन करेल. आपण मिळालेली तथ्येही त्यालाच पाठवू. तो येथे हायड्रॉक्सिल (ऑक्सिजन व हायड्रोजन) व पाण्याच्या अणूंचा शोध घेईल.  
विक्रम : अरे मला तर चंद्रावर एकाच जागी स्थिर राहावे लागेल, असे मी ऐकलेय ? 
प्रज्ञान : होय. ऑर्बिटरचे काम चंद्राची परिक्रमा करणे आहे. तू एकाच जागी राहशील. मी मात्र चंद्राच्या पृष्ठभागावर भटकंती करेल. भटकंती करताना मला दिसणाऱ्या सर्व गोष्टींच्या नोंदी करेल व सर्व संदेश थेट पृथ्वीवर आपल्या कार्यालयात तुला पाठवेल. तुझे मुख्य काम म्हणजे कार्यालयातील संशोधक, ऑर्बिटर व मला संदेश पाठवणे तसेच संदेश मागवणे असे आहे. तसे तर मलाही खूप दूर जाता येणार नाही. मी केवळ अर्धा किलोमीटरपर्यंतच जाऊ शकतो. त्याचा वेगही प्रती सेकंद एक सेंटिमीटर एवढाच असेल. 
विक्रम : खरंच मित्रा, फार कष्टाचे काम आहे. बरं काम संपवून आपण पृथ्वीवर कधी परतणार ?  
प्रज्ञान : आपण कधीही परतू शकणार नाहीत. हेच आपले अंतिम उद्दिष्ट आहे. कधीतरी पृथ्वीवरून कोणी येईल. तेव्हा त्याला आपण येथे नक्की भेटू.