आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तुम्ही तुमचा देश सांभाळा’: नसीरुद्दीन शहांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान यांना फटकारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘पाेलिसाच्या मृत्यूपेक्षा गाईच्या मृत्यूला महत्त्व दिले जाते.  आपल्या देशात माेठ्या प्रमाणावर विष पसरवले जात आहे, अशा परिस्थितीत मला माझ्या मुलांची काळजी वाटते,’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी जाहीरपणे व्यक्त केली हाेती. या वक्तव्याचा धागा पकडत भारतीय पंतप्रधानांवर टीका करण्याची संधी साधणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांंचाही नसीरुद्दीन यांनी रविवारी चांगलाच समाचार घेतला. इम्रान खान यांनी आधी आपला देश सांभाळावा, त्यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयावर भाष्य करू नये, असे ते म्हणाले. 

 

उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये काही दिवसांपूर्वी गाेहत्येवरून भडकलेल्या हिंसाचाराबाबत दु:ख व्यक्त करत नसीरुद्दीन शहा यांनी चिंता व्यक्त केली हाेती. देशातील वातावरण बिघडत असल्याचे सांगताना त्यांनी ‘माझी मुले घराबाहेर पडली तर त्यांना लाेक घेरून तुम्ही हिंदू आहात की मुसलमान, असा सवाल करतील. तेव्हा मुले काय उत्तर देतील,’ असा प्रश्न शहा यांनी उपस्थित केला हाेता. 

 

या वक्तव्याचा धागा पकडत लाहाेरमधील कार्यक्रमात पंतप्रधान इम्रान खान म्हणाले हाेते, ‘भारतात जे काही सुरू आहे ते तेथील मुस्लिमांविराेधातील असहिष्णुतेचे उदाहरण आहे. आता पंतप्रधान माेदींना आम्ही दाखवून देऊ की, अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाती ते.’ इम्रान यांच्या या वक्तव्याचा शहा यांनी रविवारी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चांगलाच समाचार घेतला. ‘७० वर्षांपासून आमच्या देशात लाेकशाही आहे. त्यामुळे इम्रान यांनी आमची काळजी करू नये,’ असा टाेला नसीरुद्दीन शहा  यांनी लगावला.

 

नसीरुद्दीनला अजून किती स्वातंत्र्य हवे : अनुपम खेर

नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यावर अभिनेते अनुपम खेर यांनी टीका केली. ‘अनेक वर्षांपासून भारतात राहत असलेले नसीरुद्दीन शहा यांना अजून किती स्वातंत्र्य हवे आहे,’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शहा साेशल मीडियावरही ट्राेल झाले आहेत. यापूर्वी असेच वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता आमिर खान यालाही टीकेचा भडिमार सहन करावा लागला हाेता.

बातम्या आणखी आहेत...