आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये व्यावसायिकाची हत्या, सहा लाखांची रोकड लुटली ; व्यापाऱ्यांमध्ये दहशत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यावसायिकाची सहा लाखांची रोकड लुटून खून केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. ८) रात्री १० वाजता उघडकीस आला होता. हल्लेखोरांच्या मागावर पाच पथक कार्यान्वित करण्यात आले असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू करण्यात येत आहे. व्यावसायिकावर सांगली येथे त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकाराने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून संरक्षण मिळविण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर परिसरातील बापू बंगला येथील सुपर ग्राहक बाजार या शॉपीचे संचालक अविनाश शिंदे यांच्यावर रात्री चार हल्लेखोरांनी हल्ला करत त्यांचा खून केला व तब्बल सहा लाखांची रोकड लुटून नेली. नियोजनबद्ध केलेल्या लूट आणि खुनाच्या प्रकाराने पोलिस यंत्रणा चक्रावली आहे. माहितगाराचे काम असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. उपआयुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहळदे , दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांच्या मागावर पाच पथके पाठविण्यात आले आहे. 


रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू... 

लुटमार, दरोडा आणि इतर गुन्ह्यांतदेखील सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही धरपकड पाेलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. रात्री काही संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी पाेलिस अधिकाऱ्यांनी केली. मात्र, काही माहिती हाती लागली नसल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. 


व्यापाऱ्यांमध्ये दहशत 
घडलेल्या प्रकाराने इंदिरानगर आणि शहर व परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच इंदिरानगर येथे व्यावसायिकाची सहा लाखांची रोकड लुटून खून केल्याची घटना ताजी असताना कॉलेजरोड येथे पायल नावाच्या युवतीचाही संशयास्पद मृतदेह व्यावसायिक संकुलाच्या टेरेसवर आढळून आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच खुनाच्या या दोन घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिस यंत्रणेने तातडीने सुरक्षिततेच्या दृष्टीने याेग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे. 


प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये झाला कैद 

घडलेला प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे, मात्र स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत आहेत. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये संशयितांच्या पळून जाताना्या हालचाली दिसून आल्या आहेत. चौघे हल्लेखोर एकाच दुचाकीवरून फरार झाल्याचेदेखील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. यानुसार आता पाेलिस यंत्रणेचा तपास सुरू आहे. 


व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी 
इंदिरानगर परिसरातील धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. परिसरात गस्त वाढवण्याची मागणी तसेच व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संबंधित निवेदनावर व्यापारी संघटना अध्यक्ष शेखर दशपुते व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...