गणेश विसर्जन / ढोल ताश्याच्या गजरात ओझरचा राजाला निरोप; बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं 

मंडळाने उत्सव काळातील अतिरिक्त खर्च टाळून साकारले विविध सामाजिक उपक्रम 
 

प्रतिनिधी

Sep 12,2019 07:10:00 PM IST

ओझर - पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत लाडक्या ओझरचा राजाला निरोप देण्यात आला. यावेळी पिंपळगाव येथिल कादवा नदी पात्रात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गेल्या 10 दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता ओझरचा राजाची महाआरती ओझर गावातील पत्रकारांच्या हस्ते करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. दरम्यान डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशाच्या तालावर गणेशभक्त थिरकताना दिसत होते. गणेशमूर्ती व सजावटीवर होणारा भरमसाट खर्च, शासनाचे सारे नियम गुंडाळून मोठमोठ्या आवाजात होणारा डॉल्बीचा वापर व त्यातून होणारे ध्वनिप्रदूषण, टाळत ओझरचा राजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी केला जाणारा विशेष खर्च कमी करून तो खर्च गेल्या 10 दिवस असलेल्या गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत ओझरचा राजा मेनरोड मित्र मंडळाने रक्तदान, तसेच शालेय परिसरात वृक्षारोपन केले. गणेश मिरवणुका व सजावटीवर नेमका खर्च करून आर्थिक अपव्यय टाळता येणे शक्य आहे. या वाचलेल्या निधीतून समाजाचे देणे फेडण्याचे प्रयत्न केल्याने गणेशोत्सवाला खरा 'अर्थ' गवसला. असे मंडळाच्या वतीने सांगितले गेले. यंदा कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना ओझरचा राजा मंडळाच्यावतीने दानपेटीतील रक्कम दिली जाणार आहे. असे मुख्य प्रवर्तक मनिष मंडलिक यांच्याकडून सांगितले.

गणेश विसर्जनासाठी नाचत गाजत मिरवणूक निघाल्या. घरगुती गणरायाला येथील असलेल्या बाणगंगा नदी असलेल्या वेशीजवळील नदीकाठी, मठाजवळील बंधाऱ्यावर विसर्जन करण्यात आले, तर ओझरचा राजाला पिंपळगावजवळील कादवा नदीत विसर्जन केले. लहान मुले ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणा देत होते. तसेच येथील विविध मित्रमंडळांनी दुपारनंतर मिरवणुकीला सुरुवात केली.


सुतार गल्लीजवळील इच्छापूर्ती गणेश मंडळाने सुरुवात केली. त्यानंतर कासार लेन मित्रमंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर मेनरोड येथील ओझरचा राजा मित्रमंडळाने मिरवणूक काढली. नंतर शिवाजी चौक रुपेश्वर मित्रमंडळ, वीर तानाजी चौक मानाचा राजा मित्रमंडळ, राजे शिवछत्रपती मित्रमंडळ, हिंदुहृदयसम्राट सर्कलचा इच्छामणी गणेश, महाराणा फ्रेंड सर्कल, शिंदे मळा मित्रमंडळ, संभाजी चौक मित्रमंडळ, यंगस्टार मित्रमंडळ, अमर मित्रमंडळ, कन्सारा मित्रमंडळ, मोरया फ्रेड सर्कल आदि मंडळांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. यावेळी ओझरकरांनी गणरायावर होणारी पुष्पवृष्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. परिसरात सर्वत्र रिमझिम पाऊस असूनही उत्साह ओसंडून वाहत होता.गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करत ढोल ताशाच्या तालावर नाचत तरुणाईने बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं साकडं घालून भावपूर्ण निरोप दिला. यावेळी ओझर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, पोलिस उपनिरीक्षक अजय कवडे,गोपनीय पोलिस कॉन्स्टेबल संतोष ब्राम्हणे, बाळासाहेब पानसारे,विश्वनाथ धारबळे,भास्कर पवार,बालकदास बैरागी, अनिल काळे,नागेश गायकवाड, अरुण गायकवाड, भूषण शिंदे, नितीन करडे, गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव,बंडू हेंगडे,जालिंदर चौघूले, आदी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

X
COMMENT