आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंभर उद्यानांना महापालिका बनवणार 'ऑक्सिजन बूस्टर', पडीक उद्यानांमध्ये 247 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची लागवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकेकाळी गुलशनाबाद अशी ओळख असलेली नाशिक नगरी हरित करण्याबरोबरच सुदृढ युवा पिढीच्या दृष्टीने महापालिकेने तयार केलेल्या ४५१ उद्यानांची सध्या देखभाल-दुरुस्तीअभावी झालेली दुरवस्था लक्षात घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्धा किंवा एक एकरातील शंभरहून अधिक उद्यानांना 'ऑक्सिजन बूस्टर' बनवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील मध्यवर्ती आणि दाट वस्तीमधील सध्या पडीक असलेल्या उद्यानांमध्ये दुर्मिळ अशा वनस्पतींची लागवड केली जाणार असून, जेणेकरून तेथील ऑक्सिजनची पातळी वाढेल व प्रदूषणाच्या समस्येवर ताे एक रामबाण उपायही ठरेल. 

 

महापालिका क्षेत्रात सध्या प्रदूषणाचा मुद्दा कळीचा ठरला असून एकेकाळी चांगल्या हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकची ती ओळख पुसली जाते की काय अशी भीतीही निर्माण होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे होणारी वृक्षतोड, औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या माध्यमातून तसेच वाहनांद्वारे होणारे प्रदूषण चिंतेचा विषय झाला आहे. दरम्यान, प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी दरवर्षी महापालिका मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करते. तसेच, स्वयंसेवी संस्था व जागृत नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली आहे. त्याचाच म्हणून परिणाम म्हणून अलीकडेच झालेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत तब्बल ४८ लाख वृक्ष आढळून आले आहेत. शहराची सुमारे १९ लाख लोकसंख्या गृहीत धरली तर साधारण एका व्यक्तीच्या मागे अडीच झाडे असे प्रमाण सध्या दिसत असले तरी ही झाडे पर्यावरणाचे संतूलन राखण्याच्या दृष्टीने पुरेशी नाहीत. जवळपास ५० टक्के झाडे गिरीपुष्प व गुलमोहराची आहेत. त्यांचा पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा फायदा नसल्यामुळे ऑक्सिजनची पातळी योग्य राखण्यात अडचणी येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

 

दरम्यान, प्रदूषणाची पातळी राखण्यास मदत करण्याबरोबरच शहरांमधील उद्यान अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून ठिकठिकाणी ऑक्सिजन पोस्टर निर्माण करण्याचा विडा उचलला आहे. 

 

महापालिकेचा दुहेरी फायदा 
महापालिकेच्या अर्धा व एक एकरावरील पडीक उद्यानांचे यानिमित्ताने संवर्धन होऊन प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होईल. त्याबरोबरच, स्थानिक नागरिक या उद्यानाचे जतन करतील. विद्यार्थ्यांना या निमित्ताने निसर्गातील दुर्मिळ वनस्पतींची ओळख होईल. - शिवाजीराव आमले, उद्यान अधीक्षक, महापालिका 

 

काय आहे ऑक्सिजन बूस्टर 
२४७ प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून त्यातून जास्तीत जास्त ऑक्सिजन निर्माण करण्याचा हा प्रयत्न असेल. प्रथम सहा प्रभागात छोट्या उद्यानांमध्ये ऑक्सिजन बूस्टर ठरणाऱ्या झाडांची लागवड केली जाईल. त्यानंतर प्रत्येक प्रभागामध्ये एक याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यामध्ये वृक्षलागवड होणार आहे. 

 

विद्यार्थ्यांना दुर्मिळ झाडांची ओळख 
शहरातील उद्यानामध्ये दुर्मिळ झाडांची लागवड केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या निसर्ग सहली आयोजित केल्या जाणार आहेत. या ठिकाणी कडूनिंब, निलगिरी, आवळा, बेल, आपटा, पळस, शिसव, टेंभुर्णी, वड, उंबर, पिंपळ, रक्तचंदन, अंबाडा, साग अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...