आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक रोडच्या मुलीस 34 लाखांचे पॅकेज, जपानी कंपनीत निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक रोड : बंगळुरू येथील जैन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या नाशिक रोडच्या शिवानी राजू लवटे हिची जपानमधील टोकियो शहरातील क्लासमेथड कंपनीने निवड केली असून तिला वार्षिक ३४ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. याशिवाय तेथे राहण्याचा, जाण्या-येण्याचा खर्च, व्हिसा हे सर्व खर्च कंपनी करणार आहे. विशेष म्हणजे नाशिक रोडला जयभवानी मार्गावर शिवानीचे वडील उदरनिर्वाहासाठी दिवस-रात्र रिक्षा चालवतात. एका रिक्षाचालकाच्या मुलीस मिळालेले हे यश पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला आहे.

मुलगी हुशार, मग तिला शिक्षणात काहीही कमी पडायला नको म्हणून राजू महादू लवटे यांनी अहोरात्र कष्ट घेतले. जयभाई हायस्कूल या मराठी माध्यमात शिकलेल्या शिवानीनेही वडिलांचे हे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून जीव तोडून अभ्यास केला.

दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन शिवानीने डेटा सायन्स विषय निवडला. बारावीनंतर तिला बंगळुरू येथे पाठवावे, असा आग्रह गोखले महाविद्यालयाचे शिक्षक हिमप्रसाद पाटील यांनी शिवानीच्या वडिलांकडे धरला. मात्र, यासाठी लागणारा पैसा हे एक आव्हान होते. ते स्वीकारून वडिलांनी तिला बंगळुरूच्या जैन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर इन टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला. विशेष म्हणजे या युनिव्हर्सिटीमध्येही तिला मूळ मराठी असलेले जयंत बोकेफोडे यांचे मार्गदर्शन लाभले.

देशातील ५ विद्यार्थ्यांची जपानी कंपनीत निवड, शिवानी एकमेव मुलगी

शिक्षणासाठी काढले कर्ज
शिवानीच्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र बँकेतून कर्ज घेतले आहे. त्याचे हप्ते ते रिक्षा चालवून मिळणाऱ्या उत्पन्नातून फेडत आहेत.

एवढ्या दूर पाठवायचे
मुलीस इतक्या दूर पाठवायची थोडी भीती वाटत आहे. परंतु उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेतला. -उज्ज्वला लवटे, आई.

मुलीचा अभिमान वाटतो
मुलींच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडू द्यायचा नाही, हा निश्चय केला होता. आज मुलीने विश्वास सार्थ ठरवला याचा अभिमान वाटतो. -राजू लवटे, वडील

क्लास मेथडमध्ये निवड
जपानची क्लास मेथड ही सॉफ्टवेअर तयार करणारी कंपनी असून या कंपनीने भारतातून यंदा पाच विद्यार्थ्यांची निवड केली असून यात शिवानी ही एकमेव मुलगी आहे.
 

बातम्या आणखी आहेत...