आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पात्रता परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण असलेल्या सात हजार शिक्षकांच्या नोकरीवर संक्रांत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याची कार्यवाही सुरू झाली अाहे. नवीन वर्षाच्या प्रारंभीच नाशिकसह राज्यभरातील सुमारे सात हजारांहून शिक्षकांना नोकरी गमावावी लागणार अाहे. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना पुन्हा एक संधी देण्यास केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयानेही नकार दिल्याने ३१ मार्च २०१९ पर्यंत टीईटी न झालेल्या अशा सात हजारांहून अधिक शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार अाहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था अाणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या अाणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे अादेश शिक्षण विभागाकडून देण्यात अाले होते. मात्र, त्यानुसार कारवाई न झाल्याने संबंधित शिक्षकांवर सेवा समाप्तीची कारवाई करण्यासाठी शिक्षण अायुक्त अाणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाला पुन्हा एकदा प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचे अादेश देण्यात अाले अाहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली अर्हता पूर्ण करण्यासाठी १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदत देण्यात अाली होती. या मुदतीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय २४ अाॅगस्ट २०१८ रोजी घेण्यात अाला होता. मात्र, राज्याच्या शिक्षण विभागाकडून या शिक्षकांना अतिरिक्त संधी देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे विनंती करून तूर्तास टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना सेवेतून न काढण्याच्या सूचना देण्यात अाल्या होत्या. मात्र, राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात अालेली विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ३ जूनला फेटाळली. त्यामुळे टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची २४ अाॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे सेवा समाप्त करण्याचे अादेश देण्यात अाले अाहेत.

...तर जानेवारी २०२० पासून वेतन नाही

खासगी शिक्षण संस्थांमधील अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कारवाई संबंधित संस्थांनी करावयाची अाहे. ज्या शिक्षकांची सेवा समाप्त केली जाणार नाही, त्यांचे जानेवारी २०२० पासून वेतन दिले जाणार नाही, असेही शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात अाले अाहे.

अनेक वर्षे सेवेत असणाऱ्या शिक्षकांना यातून वगळावे

एकीकडे राज्य शासनाने भरती प्रक्रिया बंद केली. दुसरीकडे शिक्षण संस्थांनी रिक्त होणाऱ्या जागांवर शिक्षकांची भरती केली. त्यातील अनेक शिक्षक गेल्या अाठ ते दहा वर्षांपासून कार्यरत अाहेत. टीईटी सुरू होण्यापूर्वी या शिक्षकांना नोकरीवर घेण्यात अाले होते. त्यामुळे या शिक्षकांना विशेष बाब म्हणून टीईटी परीक्षेच्या अटीतून वगळण्यात यावे. अन्यथा मुख्याध्यापक संघातर्फे राज्यभरात अांदोलन केले जाईल. -एस. बी. देशमुख, सचिव, जिल्हा मुख्याध्यापक संघ

शिक्षकांच्या माहिती संकलनाचे काम सुरू

नाशिक जिल्ह्यातील टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत ही माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली जाईल. शिक्षण संचालनालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत कार्यवाही केली जाईल. -वैशाली झनकर, शिक्षणाधिकारी, जि. प. नाशिक
 

बातम्या आणखी आहेत...