शहरात 12 अपघातप्रवण / शहरात 12 अपघातप्रवण क्षेत्रे; रम्बलर लावणार, वाहतूक सुरक्षा माेबिलिटी सेलच्या बैठकीत हिरवा कंदील

Dec 18,2018 10:40:00 AM IST

नाशिक - तारवालानगर चाैकाप्रमाणे शहरातील अन्य १२ अपघातप्रवण क्षेत्रे जाहीर करीत या ठिकाणी तातडीने झेब्रा क्राॅसिंग पट्टे, गती राेखण्यासाठी रम्बलर लावण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या माेबिलिटी सेल बैठकीत घेण्यात अाला. विशेष म्हणजे, शहरातील अनेक रस्त्यांवरील स्पीड ब्रेकर्सची मागणीही धुडकावून लावत तातडीने रम्बलर लावण्याचे अादेश देण्यात अाले.

महापालिका अायुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली माेबिलिटी सेलची बैठक झाली. या बैठकीला पाेलिस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. शासनाच्या परिपत्रकानुसार अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पाॅट) शोधून त्यावर लघुत्तम व दीर्घकालीन उपाययोजना करणे अपेक्षित अाहे. त्यानुसार समितीची स्थापना करण्यात अाली. अायुक्त समितीचे अध्यक्ष असून या समितीसमाेर शहरात साधारण १२ अपघातप्रवण क्षेत्र असल्याची माहिती ठेवण्यात अाली. याठिकाणी तातडीने रम्बलर्स, कॅट आय, मार्गदर्शक फलक लावण्याबराेबरच दीर्घकालीन उपाय याेजण्यासाठी एका त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करावी, असा निर्णय झाला.


या बैठकीत शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उपआयुक्त रोहिदास बहिरम, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता रामसिंग गांगुर्डे, उपपरिवहन अधिकारी विनय आहिरे, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक फुलदास भोये, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपप्रकल्प संचालक दिलीप पाटील, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, देवेंद्र बापट, प्रमोद लाड, उद्यान अधीक्षक शिवाजी आमले अादी उपस्थित होते.


पाच ठिकाणी नवीन सिग्नल
शहरात नव्याने पाच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित असून त्यापैकी पपया नर्सरी, त्र्यंबकरोड, प्रिं. टी. ए. कुलकर्णी चाैक, विहितगाव चौक, नाशिकराेड येथे सिग्नल यंत्रणा बसविण्यास मंजुरी देण्यात आली अाहे. येथील अतिक्रमणे तातडीने दूर करण्याचे अादेश अायुक्त गमे यांनी दिले. कर्मयोगीनगर चौक येथे सिग्नलऐवजी वाहतूक बेट उभारण्याचे निश्चित करण्यात आले. शहरात अवजड वाहनांस प्रवेशास मज्जाव करण्याबाबत वाहतूक शाखेमार्फत अधिसूचना काढून कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले.


सीईअाेंनाही अायुक्तांचा दणका; टाइमबाउंड प्राेग्राॅम करा

स्मार्ट सिटीतील अनेक याेजना संथगतीने सुरू असून स्मार्ट सिटीमार्फत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या पायलट रोडच्या कामाचा विषय निघाल्यानंतर अायुक्त गमे यांनी सीईअाे प्रकाश थविल यांना टाइमबाउंड प्राेग्राम करून रस्ता लवकरात लवकर सुरू करावा, असे अादेश दिले. लाेक कंटाळले असून अाता लवकर काम झाले पाहिजे. या ठिकाणी वाहतुकीविषयी अन्य मागणी असल्यास पाेलिसांची मदत घ्या, समन्वय साधा, अशाही कानपिचक्या दिल्याचे समजते.


सिटी सेंटर माॅलजवळ तिरकीच पार्किंग
स्मार्ट सिटी अंतर्गत २८ ठिकाणी ऑन स्ट्रीट स्मार्ट पार्किंग व पाच ठिकाणी ऑफ स्ट्रीट पार्किंगचे काम अनेक वर्षांपासून भिजत पडले अाहे. महापालिकेने निश्चित केलेल्या जागांवर पार्किंग याेग्य की अयाेग्य याबाबत तातडीने ना हरकत दाखला देण्याच्या सूचना गमे यांनी दिल्या. त्याबराेबरच सिटी सेंटर माॅलजवळील रस्त्यावरील वादग्रस्त ठरलेली तिरकी पार्किंगच याेग्य असल्याचा सूर माेबिलिटी सेल तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर त्यानुसार पाेलिस अायुक्तांशी चर्चा करून प्रायाेगिक तत्त्वावर त्याची काही दिवस अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला. स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा प्रकल्पाचे प्रस्ताव मंजूर असून त्याबाबत शहर वाहतूक विभागाने त्याचे अवलोकन करून वाहतूकविषयक बाबींचे नियोजन करावे, अशाही सूचना दिल्या.

X