आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट रोड नको, पण ट्राफिक आवर, पर्यायी मार्गावरील कोंडीने वाहनधारक हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - स्मार्ट रोडच्या पुढच्या टप्प्यातील कामाच्या पार्श्वभूमीवर अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केल्यानंतर पर्यायी मार्गावर वाहतूक पोलिस व महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे सोमवारी (दि. २६) वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला. या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करतच जावे लागले. या प्रकारामुळे 'स्मार्ट रोड नकाे, पण ट्रॅफिक आवर', असे म्हणण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. 

 

स्मार्ट रोडच्या पहिल्या टप्प्यात शासकीय कन्या विद्यालय ते सीबीएस सिग्नलदरम्यान कामे पूर्ण करण्यात आली आहेत. आता या मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात करण्यात आल्याने रविवारपासून त्र्यंबकरोड ते अशोकस्तंभ या मार्गावरील वाहतूक एकेरी मार्गाने वळविण्यात आली. मात्र, वाहतुकीचे नियोजन न करण्यात आल्याने अशोकस्तंभ, रविवार कारंजा, केटीएचएम महाविद्यालय मार्ग, गोळे कॉलनी, घारपुरे घाट परिसरात वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या प्रकाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. 

सर्वच पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा 

एमजी रोड परिसरात वाहतुकीची काेंडी झाली होती. रेडक्रॉस सिग्नल ते मेहेर सिग्नल रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तसेच रविवार कारंजा परिसर, गोळे कॉलनी भागातही काेंडी झाली. 

 

सीबीएस परिसरातील विद्यार्थ्याचे हाल 
सीबीएस परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना या प्रकाराचा सर्वाधिक फटका बसला. या ठिकाणांहून मार्गक्रमण करताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करावा 
आदर्श विद्यालयात रोज ४५०० विद्यार्थी येतात. या मार्गावरील वाहतुकीत बदल केल्याने, तसेच रस्त्याच्या कामामुळे बसद्वारे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे महापालिका व पोलिसांनी लक्ष द्यावे. - रमेश आहिरे, मुख्याध्यापक 

 

प्रचाराच्या नावाखाली नियम धाब्यावर 
वाहतूक मार्गात बदल केल्याने रविवार कारंजा परिसरातही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यातच, नामको बँकेच्या निवडणुकीनिमित्त या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी तसेच अनेक व्यापाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवत चारचाकी वाहने रस्त्यावरच उभी केली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. विशेष म्हणजे, सर्वसामान्यांवर तातडीने कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांनी या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. 

 

बातम्या आणखी आहेत...