आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरणस्नेही श्री गणरायाच्या आगमनासाठी नाशिककर सज्ज...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गणेश स्थापनेसाठी नाशिक नगरीने या वर्षी शाडू मातीच्या मूर्तींना उत्स्फुर्त अन् उदंड प्रतिसाद देत, पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलल्याचे दिसते. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक सज्ज झाले आहे. गुुरुवारी (दि. १३) सकाळी ११.०८ वाजेपासून स्थापना मुहूर्ताची सुरुवात होणार आहे. चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असणारे बाप्पांच्या आगमनानिमित्त शहरवासीयांच्या उत्साहाला उधाण आले आहे. 


शाळा, महाविद्यालये, हाऊसिंग कॉलनी, सेवाभावी संस्था, संघटना आणि इतर संस्थांमध्येदेखील शाडू मातीच्या मूर्ती आणि पर्यावरणपूरक सजावटीवर भर दिला जात आहे. शाडू मूर्तीच घेण्यावर यंदा भाविकांचा भर राहिल्याचे चित्र सर्वत्र दिसले. गणेश चतुर्थीनिमित्ताने गणपती आगमनाची संपूर्ण तयारी झाली आहे. कापडी-प्लायवूडचे मखर, लाकडी आरास, फुलांची आरास अशा नानाविध पर्यावरणपूरक आरास करून स्वागतासाठी घरोघरी तयारी पूर्ण झाली आहे. शाडू मातीच्या मूर्ती, काळ्या मातीचे बियाणे टाकलेल्या मूर्ती, हस्तकलेतून तयार केलेले मातीचे बाप्पा या सगळ्याच पर्यावरणस्नेही बाबींकडे भाविकांचा कल वाढलेला दिसतो. 


यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी ११ वाजून ०८ मिनिटांनी सुरू होणार. त्यानंतर दुपारी १ वाजून ३४ मिनिटांपर्यंत घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करता येईल. मुहूर्ताची वेळ फक्त दोन तासांची असल्याने तयारी पूर्ण झाली असली तरी हीच वेळ साधण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसते. 


अशी करा गणेशस्थापना 
- गणपतीची मूर्ती चौरंगावर नियोजित ठिकाणी ठेवावी. 
- पहिल्यांदा कपाळी टिळा लावावा. देवापुढे पान-सुपारी विडा ठेवावा. 
- देवाला नमस्कार करून, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन पूजा सुरू करावी. 
- हातात अक्षता घेऊन मनोभावे गणेशाचे नाव घेऊन अक्षता गणेशाच्या चरणी अर्पण कराव्यात. 
- श्रीगणेशाचे नाव घेऊन कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. त्याचबरोबर गंध, अक्षता, फुले, हळद-कुंकू वहावे. 
- गणपतीच्या अंगावर दुर्वा किंवा फुलांनी पाणी शिंपडावे. 
- गणपतीच्या चरणांवर गंध, फूल, अक्षता आणि पाणी अर्पण करावे. 
- गणेशाच्या मूर्तीवर पाणी शिंपडावे, चरणांवर पंचामृत वहावे, अक्षता वाहाव्यात. 
- गणपतीच्या मूर्तीला गंध लावावे, हळद, शेंदूर, फुलं, हार, कंठ्या, दुर्वा वाहाव्यात. 
- धूप, अगरबत्ती ओवाळावी. दीप, निरांजन ओवाळावे. 
- गणपतीला नैवेद्य, प्रसाद अर्पण करावा. 
- देवाची आरती म्हणावी. 

बातम्या आणखी आहेत...