आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - बीड लोकसभेचा गड ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आता आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे . दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी बीडमध्ये एकाच दिवशी एकाच मार्गावर रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. अर्ज भरण्याच्या दिवशी सभेसाठी पाहिजे ती जागा मिळाली नसल्याने राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिस व जिल्हा प्रशासनावर आरोप केले. त्यानंतर रॅली काढून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. तर भाजपनेही प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत दुपारी रॅली काढून जाहीर सभा घेतली. या जाहीर सभेत मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांच्यावर चौफेर टीका करत त्यांना अाव्हान दिले. एकंदर बीडच्या जागेसाठी बजरंग सोनवणे आणि डॉ. प्रीतम मुंडे यांच्यात लढत होत असली तरी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
१९९४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच २००४ च्या बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जयसिंगराव गायकवाड हे ४ लाख २५ हजार मते घेऊन विजयी झाले होते. २००४ नंतर सलग दोन टर्म राष्ट्रवादी काँग्रेसला बीड लाेकसभा मतदार संघात विजय मिळवता आला नाही. २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश आडसकर यांचा लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी १ लाख २० हजार मतांनी पराभव केला. तर २०१४ च्या निवडणुकीत पुन्हा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांचा १ लाख ३६ हजार ४ ५४ मतांनी पराभव केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर २०१४ च्या पोट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिला नाही. त्यामुळे खासदार म्हणून त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे या विजयी झाल्या होत्या. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली असून उमेदवार बजरंग सोनवणे हे डॉ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात लढत आहेत. यंदाच्या निवडणुकीत बीडची जागा मिळवायचीच असा चंग राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला आहे. सोमवारी सुरुवातीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन पोलिस व जिल्हा प्रशासनाने आम्हाला ज्या ठिकाणी जागा हवी आहे त्या ठिकाणी सभेसाठी परवानगी दिली नाही, असे आरोप केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सभेसाठी चांगली जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने युवक नेते संदीप क्षीरसागर यांच्या साथीने बीडमध्ये विशाल रॅली काढली. धनंजय मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीडला लागलेला कलंक मंत्री पंकजा मुंडे या पुसू शकल्या नाहीत. त्यांनी बीड जिल्हा भकास केला. सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आमच्या सभेसाठी परवानगी दिली जात नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.
विरोधकांनी भाषणाचा चुकीचा अर्थ लावला
डॉ. प्रीतम मुंडे यांनी आक्रमक भाषण केले. मुंडे साहेबांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत असून मी बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे पाच वर्षांपूर्वी म्हणाले होते. परंतु माझ्या भाषणाचा विरोधकांनी चुकीचा अर्थ काढून या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही रेल्वेत बसून येऊ असे म्हणाले नव्हते. विरोधकांना मी संसदेच्या सभागृहात दिसत नाही तर मग बीड जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गाची कामे कशी झाली, असा सवाल प्रीतम यांनी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.