political / विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात मुंबईत किमान निम्म्या जागा, जागावाटपावरुन आघाडीत पेच निर्माण हाेण्याची शक्यता

शहरांवर फाेकस : जागावाटपावरुन आघाडीत पेच निर्माण हाेण्याची शक्यता
 

विशेष प्रतिनिधी

Jun 14,2019 10:44:00 AM IST

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईत निम्म्या जागा हव्या आहेत, अशी मागणी राष्ट्रवादीने पुढे केली आहे. या मागणीमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाआघाडीत मुंबईतील जागावाटपावरून मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


लाेकसभा निवडणुकीत २०१४ प्रमाणेच केवळ चार जागांवर समाधान मानावा लागणाऱ्या राष्ट्रवादीने विधानसभा निवडणुकीसाठी मात्र जाेरदार तयारी सुुरू केली अाहे. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार अाढावा बैठका घेत अाहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळपासून कोकण आणि मुंबईतील विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आढावा घेतला जात आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती होती.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीची राज्यात १९९९ पासून आघाडी आहे. आजपर्यंत मुंबईत राष्ट्रवादीच्या वाट्याला विधानसभेच्या कमी जागा आल्या आहेत. या वेळी आपल्याला बरोबरच्या जागा हव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी पवारांकडे केली आहे.


विसाव्या वर्धापनदिनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ‘शहराकडे चला’ असा मंत्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मुंबईत जागा अधिक मिळण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात सचिन अहिर म्हणाले, मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला विधानसभेच्या किमान २ जागा मिळायला हव्यात. आघाडीत विधानसभेला ५०-५० टक्के जागावाटप होणार असेल तर मुंबईतही त्याच सूत्राने जागा मिळाल्या पाहिजेत.’

बारामतीच्या पाण्यावरून दिशाभूल : जयंत पाटील
पुणे जिल्ह्यातून बारामतीला सोडण्यात येणारे पाणी कमी करण्याच्याफडणवीस सरकारच्या निर्णयासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘बारामतीच्या पाण्यासंदर्भात आघाडी सरकारने घेतलेले निर्णय न्यायच होता. इतर कोणत्याही भागावर अन्याय करण्याची भूमिका त्यात नव्हती. भाजप-शिवसेनेचे सरकार मात्र अाता त्यासंदर्भात जनतेची दिशाभूल करत आहे.’

X
COMMENT