गणेशोत्सव / ब्रह्मदेवाने स्थापलेल्या ९ गणपतींचे ‘नवगण राजुरी’; नऊ गणेशांचे अधिष्ठान, म्हणून नवगण हे नामाभिधान

पूर्वेकडील महामंगलेश्वर, पश्चिमेचा शेषाब्दिधिष्ठित, दक्षिणेचा मयुरेश्वर, उत्तरेकडील उत्तिष्ठ गणेश अशा एकूण ५ गणेशांची स्थापना 

दिनेश लिंबेकर

Sep 09,2019 09:38:00 AM IST

बीड - महाराष्ट्रात श्रीगणेशाची अष्टविनायक रूपे प्रसिद्ध आहेत, परंतु मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामधील नवगण राजुरी हे गाव नऊ गणपतींसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या गावात नऊ गणेशांचे अधिष्ठान असल्यामुळे ‘नवगण’ असे नामाभिधान या गावाला मिळाले. ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या करून या नवगणांची स्थापना केली आहे. त्रेतायुगात रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी या गणेशाचे दर्शन घेऊन सीतेचा शोध केला होता. आजही मंदिरात श्रीरामाच्या पादुका आहेत. राजुरी गावाच्या परिसरात ऋषी-मुनींचे आश्रम होते. पश्चिमेला बाल्व ऋषींचा आश्रम होता म्हणूनच या डोंगरी भागाला बालाघाट असेही म्हटले जाते.


पूर्वेकडील महामंगलेश्वर
प्राचीन काळापासून राजुरी हे ९ गणेशांचे पीठ असून अनादी सिद्धस्थान आहे. अनेक ऋषी-मुनींच्या पदस्पर्शाने व प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या तपोबलाने ही भूमी सिद्ध झालेली असल्यामुळे या भूमीची पवित्र व पावन भूमी म्हणून ओळख आहे. पूर्वी हा भूप्रदेश दंडकारण्य म्हणून ओळखला जात असे. येथे दंडक नावाचा राजा राज्य करत होता. विरळ वस्ती असलेल्या अरण्याचा हा प्रदेश राजा दंडक या नावाने ओळखला जात असे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने स्वत: तप करण्यासाठी भगवान विष्णूकडून ही भूमी मागून घेतली. ती आज राजुरी ग्रामक्षेत्र होय. या भूमीत ब्रह्मदेवाने कठोर तप केले.


पश्चिमेचा शेषाब्दिधिष्ठित :

ब्रह्मदेवांनी यज्ञाच्या आरंभी अग्रपूजेसाठी वेदोच्चारांमध्ये गणेशाची स्थापना केली. तो निर्विघ्नेश्वर होय. ती मूर्ती मंदिरात विराजमान आहे. तिला उत्सवमूर्तीही संबोधले जाते.


दक्षिणेचा मयूरेश्वर :

सत्ययुगात त्रिपुरासुर शंकराच्या वराने उन्मत्त झाला होता. (तिन्ही पुरांवर ज्याची सत्ता तो त्रिपुर) तिन्ही लोकांत त्याची सत्ता होती. त्याने सर्व देव जर्जर केले. तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव, विष्णू, इंद्रदेवांनी त्याच्याशी युद्ध केले. तेव्हा देवाचा पराभव झाला. देवांची सर्व शस्त्रे निष्फळ झाली. झालेल्या पराभवावर विचार-मंथन झाले तेव्हा शंकराच्या लक्षात आले की, आपण गणेश पूजन केले नाही. भगवान शंकराने रांजणगावी गणेशाची स्थापना केली. ब्रह्मदेवांनी राजुरी क्षेत्री तप केले व सर्व देवांसह यज्ञ करून गणेश स्थापना केली.


उत्तरेकडील उत्तिष्ठ गणेश :

यज्ञ समारंभ सुरू असताना असुरी (राक्षसी) शक्तीचा त्रास होऊ लागला, यज्ञात विघ्ने येऊ लागली. तेव्हा त्याच भूमीवर एकाच चौकोनी शिळेवर ४ गणेशांची स्थापना केली. त्यांची चारही बाजूंना अवलोकन दृष्टी असावी म्हणून चारही दिशांना ४ गणेशांची स्थापना केली. पूर्वेकडील महामंगलेश्वर, पश्चिमेचा शेषाब्दिधिष्ठित, दक्षिणेचा मयुरेश्वर, उत्तरेकडील उत्तिष्ठ गणेश अशा एकूण ५ गणेशांची स्थापना केली. त्यांची आसने व वाहने निरनिराळी आहेत. ४ गणेशमूर्ती 4वेदांचे रूप व ब्रह्मदेवस्वरूप मानल्या जातात. म्हणूनच गणेश उपासनेवेळी ब्रह्मणसूक्त म्हटले जाते. त्यानंतर ४ सीमांवर ४ गणेशाची स्थापना केली. शिरापूरचा श्री वरद, तिप्पटवाडीचा त्रिपुरनंदन, लिंबारुईचा संगमेश्वर व राजाबाई टेकडीवरील चिंतामणी अशा नवगणेशांची स्थापना प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी केली.

X
COMMENT