आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घरात’तर शिरलात...  ‘मनात’ कधी शिरणार...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनाथ द. सकुंडे  

‘प्रेक्षकांचं मनोरंजन करणं म्हणजे त्याला फक्त गुदगुल्या करणं’ हे समीकरण कामाचं नाही, गुदगुल्यातनं जे हास्य निर्माण होतं ते क्षणिक असतं, ते फार काळ लक्षात राहत नाही. नंतर कुणी परत गुदगुल्या केल्या तर आधीच्या गुदगुल्या विसरून जातो माणूस. क्षणिक हास्य निर्माण करण्यासाठी फक्त गुदगुल्याच करत राहणार असाल तर ते हास्य विस्मृतीत जात राहण्याची प्रक्रिया सुरूच असते, हे विसरता कामा नये. डोळ्यांत अश्रू किंवा आनंदाश्रू आणणारे, ‘ख्या-ख्या’ नको, पण खुदकन हसू वाटावं अशी कथानकं पेरली तर ही ग्लानी झटकली जाईल हे मात्र नक्की. पण ‘ही मराठी मालिकांना आलेली ग्लानी आहे’ हे तरी मराठी मालिकांच्या पुढाऱ्यांनी समजून घ्यायला हवं. ते समजून घ्यायचं तर आत्मचिंतन करायला हवं. हे आत्मचिंतन करून काही उपाय केले तर ‘प्रेक्षकांच्या घरात’ असलेल्या सध्याच्या मालिका ‘प्रेक्षकांच्या मनात’ल्या ठरतील.
एक राजा स्वत:च्या मनोरंजनासाठी एक गोष्टीवेल्हाळ मनुष्य पदरी बाळगून असतो. "एका गडाला वेढा पडलाय, गडावर एक महाराणी अडकून पडलीय, महाराणी व्याकुळलीय, तिचे सैनिक हतबल झालेत, कारण शत्रूचं सैन्य अधिक प्रबळ आहे...' ही गोष्ट ऐकण्यात राजा तल्लीन झालेला आहे. गोष्टीवेल्हाळ माणूस महाराणीची गोष्ट सांगून राजाचं मस्त मनोरंजन करतोय... आणि अचानक त्या गोष्टीवेल्हाळ माणसाला हजच्या यात्रेला जाण्याची इच्छा होते. भावनेचा विषय असल्याने राजा त्याला हजला जाण्याची परवानगी देतो, मात्र गोष्ट सांगण्यासाठी पर्यायी माणसाची व्यवस्था करण्यास सांगतो आणि वरून ‘नेमलेल्या माणसाने नीट मनोरंजन केलं नाही तर तुझी नोकरी गेली म्हणून समज’ अशी तंबीही देतो. पर्यायी माणसाची व्यवस्था करून गोष्टीवेल्हाळ माणूस हजला रवाना होतो.

काही महिन्यांनी तो परत येतो आणि राजाला भेटतो... "राजे, आपलं मनोरंजन होण्यात कसलीही कसूर झालेली नाहीय ना?' असं राजाला विचारतो... "नहीं तो, बहुत खूब, अच्छी कहानी बताई आपके शागीर्द ने' राजाचं उत्तर ऐकून गोष्टीवेल्हाळ माणूस सुखावतो आणि गोष्ट सांगण्यासाठी नेमलेला पर्यायी माणूस अर्थात शागीर्दला भेटतो... गोष्टीबद्दल शागीर्दशी चर्चा करतो. "महाराणी अजून गडावरच अडकून आहे, गडाला अजूनही शत्रूचा वेढा पडलेलाच आहे. महाराणी अजूनही व्याकुळलेलीच आहे. तिचे सैनिक अजूनही हतबलच आहेत.' शागीर्दशी चर्चा केल्यावर गोष्टीवेल्हाळ माणूस थक्क होतो, तो गोंधळून जातो... गोष्टीवेल्हाळ माणसाला प्रश्न पडतो की, गोष्टीतली सगळी परिस्थिती जैसे थे आहे, गोष्ट पुढे सरकलेलीच नाहीय, तरीही इतके महिने राजाचं मनोरंजन झालं कसं?

राजा-गोष्टीवेल्हाळ माणूस आणि शागीर्दचा वरील किस्सा निव्वळ काल्पनिक आहे, कुणाकडून ऐकलाय ते आठवेना, पण सध्या मराठी मालिकांच्या चाललेल्या प्रवासाचं चपखल वर्णन हा किस्सा करतोय असं वाटतं... म्हणजे बघा, एकेकाळी गोट्या, एक शून्य शून्य, हॅल्लो इन्स्पेक्टर, दामिनी, आभाळमाया, प्रपंच, वादळवाट, पिंपळपान, श्रीयुत गंगाधर टिपरे वगैरे मालिका प्रेक्षकांना रक्तामांसाइतक्याच महत्त्वाच्या वाटायच्या. प्रेक्षकांचा भवताल रंगवून-ढवळून काढायच्या त्या मालिका. संस्कृती-संस्काराची पेरणी करत मातीचा सुगंध द्यायच्या त्या मालिका. गालावर हास्य-डोळ्यांत समाधान आणि मनात मूल्यांची पेरणी एकाच वेळी करणाऱ्या मालिका आता कुठे दिसतात का? हा प्रश्न स्वत:लाच विचारला तर ओठांवर निव्वळ कुत्सित हास्य येतं. आताच्या मराठी मालिका चकचकीत, तंत्रपूर्ण आणि लॅव्हिश झालेल्या असल्या तरी जुन्या आदर्शवत मालिकांचा वारसा सांगतात का, हा एक प्रश्नच आहे. तो प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, पण हा प्रश्न फक्त प्रेक्षकांना पडून चालणार नाहीय. तर, तो प्रश्न निर्माते, चॅनल्सचे कर्तेधर्ते यांना पडायला हवा. मुख्यमंत्री मीटिंगमध्ये असताना त्यांना गिरणीतून पिठाचा डबा आणायला सांगणारी, मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर सांडगे वाळत घालणारी मिसेस मुख्यमंत्री जगात कुठे असेल का?, प्रेयसीसोबत सेल्फी काढल्यावर मोबाइलमध्ये खुद्द प्रेयसीच नागीण दिसणं, मालिकेतल्या ज्या पात्राला जवळच्या गावात बाजाराला पाठवलं जात नाही, त्या पात्राला थेट दुबईला नोकरीला पाठवलं जाणं तसेच सीमेवर सेवा बजावताना जखमी झालेला सैनिक सुट्टीवर घरी येतो आणि काही दिवसांनी त्याला प्रमोशनचं पत्र येणं, पण असं खरंच भारतीय सैन्यात होतं का? प्रमोशन देताना त्या सैनिकाचा फिटनेस तपासला जात नाही का? प्रमोशन दिलेल्या नव्या पदाचं ट्रेनिंग वगैरे काही नसतंच का? मराठी मालिकाविश्वात सध्या जे चाललंय ते प्रेक्षक म्हणून फारच हास्यास्पद वाटू लागलंय. "मनोरंजन करणं म्हणजे प्रेक्षकांना फक्त हसवणं आणि प्रेक्षकांना हसवण्यासाठी काहीही आचरटपणा करणं' हे नवं खूळ मालिकांच्या बाजारात कुठून आलंय, कोणास ठाऊक. बरं, "प्रेक्षकांना हसवण्यासाठी कोणतीही पातळी गाठली तरी चालते' हा आत्मविश्वास आणि प्रेक्षकांना गृहीत धरणं पुढे जाऊन किती हास्यास्पद ठरेल, याची जाणीव यांना नसावी का? म्हणजे खरं तर, अलीकडच्या "होणार सून मी या घरची', "दिल दोस्ती दुनियादारी' वगैरेंचा अपवाद सोडला तर कथा-दिग्दर्शनाच्या पातळीवर सृजनशील, चिकित्सक आणि तरल असं काही हल्लीच्या मालिका देतायत का?

स्वराज्यरक्षक संभाजी, स्वराज्यजननी जिजामाता, स्वामिनी इत्यादींसारख्या ऐतिहासिक आणि जय मल्हार, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, दत्तगुरू, लक्ष्मी-नारायण वगैरे अाध्यात्मिक मालिकांबद्दल प्रेक्षकांना काही तक्रार असण्याचं कारण नाही. कारण तो ज्याच्या-त्याच्या आस्थेचा विषय असतो. तसेच चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा, दोन स्पेशल, सूर नवा ध्यास नवा किंवा नागराज मंजुळेनं ताकदीनं साकारलेलं ‘कोण होणार करोडपती’ वगैरे कार्यक्रम कथाबाह्य असल्याने त्यावरही प्रेक्षकांच्या मनात फार अढी असण्याचं कारण नाही. पण, कथानक असलेल्या ज्या इतर मालिका सध्या प्रेक्षकांना रमवण्याच्या नावाखाली गंडवण्याचं काम करतायत, हे मराठी मालिकांच्या परंपरेला शोभणार नाही हे मात्र खरं.तुम्हाला आठवत असेलच की, पूर्वी दूरदर्शनवर आठवड्यातून एकदाच एपिसोड असायचा. रानात राबणारा शेतकरी, नोकरदार, व्यवसाय-धंदा करणारा आणि शाळा-कॉलेजात असणारा प्रेक्षक आठवडाभर कथेचं पूर्वसूत्र मनात-डोक्यात ठेवून असायचा. हल्ली रोज एपिसोड असूनही कालच्या भागात काय झालं हे कथेचं पूर्वसूत्र दाखवावं लागतं, यावरून मालिकाकर्ते आणि प्रेक्षकांमधल्या नात्याची वीण सैल होत चाललीय का, अशी भीती वाटू लागते. "पूर्वी फार मालिका नसायच्या आणि हल्ली अनेकानेक चॅनल्सवर अनेकानेक मालिकांचा रतीब रोजच्यारोज घातला जातोय, प्रेक्षकांनी तरी किती लक्षात ठेवायचं?' असा प्रतिवाद यावर होऊ शकतो, पण तरीही प्रेक्षक एपिसोडची वाट बघतील, त्यांच्या डोक्यात कथानक राहील, प्रेक्षकाला त्याचं आयुष्य मालिकांत दिसेल, असं दम असणारं कथानक देण्याचे कष्ट कुणीच घेत नसल्याचं जाणवल्यावाचून राहत नाही. 

खरं तर, डेलीसोपचा फंडा हिंदीतून मराठीत आलाय, पण तो जेव्हा आला, तेव्हा जो सकसपणा होता तो आता अतिसूक्ष्म अपवादाने दिसतो. म्हणजे, मराठीत डेलीसोप जेव्हा आल्या तेव्हा कथानकांत किती निरागसता, सजगता, सृजनशीलता आणि चिकित्सकता असायची. नवनव्या प्रयोगांची तोरणं रोजच्यारोज प्रेक्षकांच्या मनोद्वारावर लावली जायची. प्रेक्षकांच्या मनोरंजनाच्या ताटात इतक्या सकस पदार्थांची रेलचेल असायची की ती पात्रं अजूनही लोकांच्या मनात रुंजी घालत राहतायत. मालिकांची ती चव आता हरवत चाललीय, हे मात्र खरं. ती पूर्ण लुप्त होण्याआधी जागं व्हायला हवं.

एकेकाळी ‘मराठी सिनेमे चालत नाहीत, प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन मराठी सिनेमे बघत नाहीत’ अशी ओरड सिनेमा करणारे करत असायचे. तेव्हाही मराठी सिनेमा सध्याच्या मराठी मालिकांसारखा याच ग्लानीत होता. ‘सासू-सून-हळद-कुंकू’च्या बाहेर मराठी सिनेमा जात नव्हता. नितळ, शुभ्र, स्व‍च्छंदी अशा पोषक, रम्य वातावरणात प्रदूषणाची कुबट लाट यावी, तशी लाट त्या काळी मराठी सिनेमांच्या कथानकांत मुक्काम ठोकून होती. ‘मराठी प्रेक्षकांना जे देऊ, ते तो खाईल’ असं गृहीतक बनून गेलं होतं. पण, श्वास नावाचा सिनेमा आला आणि मरगळलेला सिनेमा कात टाकू लागला. कथानकांतल्या गृहीतकजन्य प्रदूषणाची जळमटं गळून पडली. मराठी प्रेक्षकाच्या अभिव्यक्तीची कक्षा किती प्रगल्भ आहे याची जाणीव मराठी सिनेनिर्माते-दिग्दर्शकांना झाली. अन् त्यानंतर मराठी सिनेमा मळवाट सोडून स्वत:ची वेगळी वाट चोखाळू लागला. मराठी सिनेमाने निर्माण केलेली नवी वहिवाट कधी एक्स्प्रेस-वेसारखी वेगवान होती, कधी पाऊलवाटेसारखी तरल होती, कधी गूढ-गम्य होती. तर कधी बुरसटलेल्या विचारांचा अंत्यविधी करणारी आणि सामाजिक भान-मानवतेचा संदेश देणारी होती. त्यानंतर ‘मराठी प्रेक्षकांच्या ताटात नवं काही पडलं की तो चवीने खातो, मात्र ते सकस-पोषक असायला हवं’ याची समज मराठीबाह्य लोकांनाही झाली. म्हणून तर हिंदीसह इतर भाषांतील कर्त्यांनी मराठी सिनेमे बनवायला घेतले आणि मराठी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. पूर्वी हिंदीसह इतर भाषांतले सिनेमे मराठीत यायचे, आता तर मराठी सिनेमाने इतर भाषांवर स्वारी करून दाखवलीय. ‘श्वास’ नंतर जे झालं, ते सर्वांच्या समोर आहेच. पण, प्रश्न उरतो तो आपल्या मूळ मुद्द्याचा. अर्थात मराठी मालिकांच्या कथांचा.

‘मराठी मालिकांच्या पटकथा-संवादांचं लेखन करताना जास्त डोकं चालवायचं नाही, मराठी मालिका बघणारा प्रेक्षक बिनडोक असतो, हे लक्षात ठेवूनच कथा-पटकथा-प्रसंग-संवाद लिहायचे, ग्राहकाला बिनडोक समजून करायचा जगातील एकमेव धंदा म्हणजे मालिका लिहिणं’ असं एका प्रसिद्ध निर्मात्याने मला सांगितलं होतं. ऐकल्या-ऐकल्या हसावं की रडावं असं झालं. हा असाच पूर्वग्रह आणि मानस असेल तर ‘ठणठण गोपाळ’… याशिवाय काय बोलणार?

‘प्रेक्षकांचं मनोरंजन करणं म्हणजे त्याला फक्त गुदगुल्या करणं’ हे समीकरण कामाचं नाही, गुदगुल्यातनं जे हास्य निर्माण होतं ते क्षणिक असतं, ते फार काळ लक्षात राहत नाही. नंतर कुणी परत गुदगुल्या केल्या तर आधीच्या गुदगुल्या विसरून जातो माणूस. क्षणिक हास्य निर्माण करण्यासाठी फक्त गुदगुल्याच करत राहणार असाल तर ते हास्य विस्मृतीत जात राहण्याची प्रक्रिया सुरूच असते, हे विसरता कामा नये. डोळ्यांत अश्रू किंवा आनंदाश्रू आणणारे, ‘ख्या-ख्या’ नको, पण खुदकन हसू वाटावं अशी कथानकं पेरली तर ही ग्लानी झटकली जाईल हे मात्र नक्की. पण ‘ही मराठी मालिकांना आलेली ग्लानी आहे’ हे तरी मराठी मालिकांच्या पुढाऱ्यांनी समजून घ्यायला हवं. ते समजून घ्यायचं तर आत्मचिंतन करायला हवं. हे आत्मचिंतन करून काही उपाय केले तर ‘प्रेक्षकांच्या घरात’ असलेल्या सध्याच्या मालिका ‘प्रेक्षकांच्या मनात’ल्या ठरतील. घरापेक्षा मन मोठं असलं की संसार सुखाचा होतो. ‘रोज धावपळ करत असल्याने, अनेक तणावांमुळे लोकांना घरात बसून रडायला आवडत नाही, लोकांना हसायला आवडतं’ असंही काहीजण बोलतात, ते खरंही असेल, मात्र, ‘लोकांना घरात बसून रडायला आवडत नसलं तरी, लोकांना घरात बसून शिकायला, रमायला आणि जगणं बघायला नक्की आवडेल, असं काही देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची?’ याचाही विचार व्हावा.

‘सैनिकांना मुलगी दिली तर तिच्या आयुष्याचं कसं होईल?’ असा अतिशय जुनाट आणि स्वार्थी विचार ग्रामीण भागांत काही काळ असायचा, अगदी अलीकडच्या काळातही तसा विचार काही लोक करायचे, त्यावर माझा लेखक मित्र तेजपाल वाघनं खासगीत बोलताना खंत व्यक्त केली, पुढे जाऊन त्यावर मालिका आली, जिचं नाव ‘लागिरं झालं जी’ असं होतं. ती मालिका आता संपली, मात्र ‘लय असत्याल मनमौजी, लाखात एक माझा फौजी’ असं म्हणणारी सैनिकाची बायको अखिल महाराष्ट्रानं पाहिली. त्या मालिकेतून सामाजिक संदेश दिला गेलाच, पण आरोग्यदायी ‘तूर्तास कडू’ औषध विनोदाच्या गोड मधातून दिलं गेलं. ‘देशाच्या सेवेत असणाऱ्या सैनिकालाही मुलगी द्यायला हवी’ हा संदेश नंतर त्या मालिकेच्या कथानकातून दुर्दैवाने बऱ्यापैकी वजा झाला किंवा लेखकाच्या विस्मरणात गेला होता. तरीही, त्यातून गाव, पार, रान दाखवलं तर गेलंच, पण गावची माणसं, गावातील बायका आणि त्यांचं जगणं, गावातली तरुण पोरं आणि त्यांचा भवताल दाखवला गेला. मागे वळून पाहताना सामाजिक संदेशाचा दिवा हातात घेतलेल्या मराठी मालिका गेल्या काही काळात दिसल्याच नाहीत.

सध्या ‘ह. म. बने, तु. म. बने’ नावाची एक मालिका ‘सोनी मराठी’वर सुरूय. एका कुटुंबाची कथा. पण तरीही जागतिक मानवतावादाला वळसा घालेल असं तिचं कथानक आहे. पूर्वी ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिका प्रेक्षकांची जशी संवेदना चाळायची, तशीच ही मालिका. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’चा सुगंध ‘ह. म. बने, तु. म. बने’ बघताना जाणवत राहतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘ह. म. बने, तु. म. बने’ ही मराठी मालिका तामिळ आणि तेलगू भाषेत डब करून, त्या भाषांतील प्रेक्षकांची मनं रमवली जातायत. माझ्या माहितीप्रमाणे मराठी मालिका इतर भाषांत डब होण्याची हा पहिलीच आणि ऐतिहासिक घटना असावी. मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याला मुलगी देण्यासाठी खाली-वर बघितलं जात असण्याच्या काळात ‘नवरी मिळे नवऱ्याला’सारखी मालिकाही आता दिसू लागलीय. भले तिची मांडणी अजून विषयकेंद्रित असायला हवी. पण, समाजभान बाळगल्याने तिचंही कौतुक करायला हवं. आता मराठी मालिकांचं विश्व ज्या ठिकाणी उभं आहे तिथं उभं राहून दूरवर नजर टाकली तर, ‘ह. म. बने, तु. म. बने’ची चव देणारं कथानक लांबवर नजरेसही पडत नाही. टिंगल-टवाळी, गम्मत-जम्मत असायला हवीच, पण ती ताटातल्या लोणच्याइतकीच, लोणच्यापेक्षा जास्त प्रमाणात इतर सकस पदार्थ ताटात असायला हवेत. लोणच्याचं प्रमाण वाढलं की खोकला येतोच. हे मराठी मालिकाकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. मराठी सिनेमांच्या कथानकांतून हरवलेला ऑक्सिजन श्वास नावाच्या सिनेमाने शोधून दिला, तद्वत मराठी मालिकांबाबतही व्हायला हवं. मराठी संस्कृती, साहित्याची सावली आणि मराठी मातीचा गंध असणारं चंद्रमौळी सौंदर्य कथानकांत दिसलं तरच आगमनावेळी घेत होत्या तसा ‘पुन्हा श्वास’ मराठी मालिका घेतील असं वाटतं, तूर्तास इतकंच.

लेखकाचा संपर्क : 9870408702