आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलवाद्यांकडून गडचिरोली जिल्ह्यात दोन गावकऱ्यांची गोळ्या घालून हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून पाळल्या जाणाऱ्या पीपल्स गुरिला आर्मीच्या स्थापना दिवसाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यात दोन नागरिकांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सूरजागड प्रकल्पाचे समर्थन केल्याच्या संशयावरून या दोघांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

एटापल्ली तालुक्यात पुरसलगोंदी येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मासू पुंगाटी (५५) आणि ऋषी मेश्राम (५२) अशी हत्या झालेल्या गावकऱ्यांची नावे आहेत. यापैकी मासू पुंगाटी हा नक्षलवाद्यांचाच समर्थक असल्याची नोंद पोलिसांकडे आहे, तर ऋषी मेश्राम हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी रात्री सशस्त्र नक्षलवादी पुरसलगोंदी गावात दाखल झाले. त्यांनी मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम यांना गावाबाहेर नेऊन त्यांची गोळ्या घालून हत्या केली. आज सकाळी पुरसलगोंदी-आलेंगा रस्त्यावर दोघांचे मृतदेह आढळून आले. या गावाजवळच सूरजागड पहाडावर लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीचे लोहखनिज उत्खननाचे काम सुरू आहे. नक्षलवाद्यांचा हा प्रकल्पास तीव्र विरोध आहे. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने मध्यंतरी प्रकल्पाचे काम बंद पडले होते, परंतु आता काम पुन्हा सुरू झाले आहे. मासू पुंगाटी व ऋषी मेश्राम या दोघांनी प्रकल्पाचे समर्थन केले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्यात आल्याचे गडचिरोली पोलिसांना वाटते. 

विशेष म्हणजे नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह आजपासूनच सुरू झाला आहे. नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील हत्ती कॅम्पचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या ठिकाणी वन विभागाने अनेक हत्ती पाळले असून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या घटनेमुळे पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. २७ नोव्हेंबरच्या रात्री नक्षलवाद्यांनी कोरची तालुक्यातील भीमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय मुलाची गोळी घालून हत्या केली होती. तो पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय नक्षलवाद्यांना होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.