आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयनतारांचे भाषण आता विश्व साहित्य संमेलनात; मलेशियातील शब्द विश्व संमेलनातून जगभर पाेहाेचणार असहिष्णुतेविराेधातील विचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्येष्ठ इंग्रजी लेखिका तथा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची नयनतारा सहगल यांना ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रण नाकारल्याचा काेतेपणा यवतमाळच्या आयाेजकांनी केल्याच्या विराेधात महाराष्ट्रभरातून संताप व्यक्त केला जात आहे. असहिष्णुतेविराेधात परखड लेखन करणाऱ्या नयनतारा यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला असला तरी ते ज्वलंत विचार आता जगभर पाेहाेचवण्याच्या दृष्टीने साहित्य क्षेत्रात चळवळ जाेर धरू लागली आहे.

 

मलेशियातील क्वालालंपूर येथे ११ जानेवारीला हाेणाऱ्या शब्द विश्व साहित्य संमेलनात नयनतारा यांच्या भाषणाचा संपादित भाग वाचून दाखवला जाणार आहे. प्रा. ज्योती भगत यांच्या आवाजात जगभरातील रसिकांना हे भाषण ऐकता येईल, अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय सिंगलवार यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. यवतमाळच्या संमेलनात नयनतारा हेच भाषण करणार हाेत्या, मात्र त्यातील अनेक मुद्दे सरकारविराेधात असल्यानेच त्यांचे निमंत्रणच रद्द केल्याचा आराेप हाेत आहे. नयनतारा यांच्या समर्थनार्थ यवतमाळच्या संमेलनावर बहिष्कार टाकणारे साहित्यिक व साहित्यप्रेमी आता राज्यात ठिकठिकाणी एकदिवसीय प्रतिसंमेलन घेण्याची तयारी करत आहेत. ११ जानेवारी राेजी अंबाजाेगाईत हाेणाऱ्या प्रतिसंमेलनात उद‌्घाटनाच्या भाषणापूर्वी नयनतारा सहगल यांचे भाषण वाचून दाखवण्यात येणार आहे. औरंगाबादेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वतीनेही ११ जानेवारी राेजीच असेच एकदिवसीय संमेलन घेतले जाणार आहे. त्यातही नयनतारा यांचे भाषण वाचून दाखवले जाईल, अशी माहिती संमेलन कृती समितीचे सदस्य लाेकेश कांबळे यांनी 'दिव्य मराठी'शी बाेलताना दिली. मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डाॅ. ऋषिकेश कांबळे, जयदेव डाेळे, आसाराम लाेमटे, पी. विठ्ठल, प्रतिभा अहिरे, वीरा राठाेड यांच्यासह यवतमाळच्या साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकणारी मराठवाड्यातील बहुतांश साहित्यिक मंडळी व साहित्यप्रेमी लाेक या संमेलनात सहभागी हाेणार असल्याचे आयाेजकांनी सांगितले. 

 

विद्राेही साहित्य संमेलनाचेही नयनतारा यांना निमंत्रण 
विद्राेही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. बाबूराव गुरव यांनी सांगितले की, 'यवतमाळच्या आयाेजकांनी नयनतारा यांना निमंत्रण नाकारून महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर बदनामी केले आहे. मात्र नयनतारा यांचे परखड विचार महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पाेहाेचवण्यासाठी आता आम्ही पुढाकार घेणार आहाेत. आगामी विद्राेही साहित्य संमेलनात आम्ही नयनतारा सहगल यांना निमंत्रित करणार आहाेत. साहित्य रसिकांकडूनच पैसे जमवून त्यांच्या विमान प्रवासाचा खर्च करू, मात्र त्यांना नक्कीच संमेलनात आणू.' 

बातम्या आणखी आहेत...